आपल्या आवाजाला योग्य अशा कोणत्या पट्टीत गावे हे आपण नक्की कसे ठरवायचे?
गायक कोणत्या पट्टीत गातो आहे ते मूलस्थान, ती पट्टी, आपल्याला / ऐकणाऱ्याला कशी कळणार कशी ?
याआधीच्या लेखात वरील दोन प्रश्न उपस्थित केले होते, त्यांची उत्तरे या लेखात पाहू.
आपली पट्टी ठरवणे
यासाठी तशी पेटी अत्यावश्यक आहे असे नाही, पण असल्यास आधाराला हाताशी घेऊया.
मध्य सप्तकातली पां १ कळ दाबून तो स्वर स्वतःच्या आवाजात (आऽऽऽऽ असा) लावा. सहज लागेल. मग मंद्र सप्तकातली पां ७ कळ दाबून तो स्वर लावा. असे मागे मागे जात सर्वात खालचा कोणता स्वर आवाजाला त्रास न होता किंवा आरामात लागतो तो शोधून काढा. या स्वराला आपल्याला मंद्र पंचम करायचे आहे.
(उदाहरणादाखल, समजा मंद्र काळी ४)
आता या स्वराला सा मानून सा-रे-ग-म हे स्वर म्हणा व कुठे येऊन पोचलात तो स्वर पकडा (ओळीने पेटीच्या कळी मोजल्या तर हा ६वा स्वर येतो, म्हणजे मंद्र काळी ४ पासून सुरुवात केली की आपण मध्य काळी १ ला आलो).
ही तुमची प्रायोगिक पट्टी (म्हणजे येथे काळी १). हिला आता मूळ सा म्हणूया.
आता ही कितपत जमते हे पहाण्यासाठी स्वर वर-वर न्या - सारेगमपधनीर्सा. आणखी वर चला - र्सा-र्रे-र्ग, इथपर्यंत त्रास न होता आवाज जातोय का?
हा स्वर (तार सप्तकातला गंधार) नीट, स्वच्छपणे म्हणता येत असल्यास हीच तुमची पट्टी असे समजता येईल. अर्थात तुमच्या आवाजाचा आवाका एवढा असेल असे येथे गृहीत धरलेले आहे. आवाजाला थोडा ताण देऊन यापेक्षा एक स्वर खाली किंवा वर बहुधा म्हणता येतोच.
अशा पद्धतीने ठरवलेली पट्टी बहुतेक प्रकारच्या गायनाला चालते, कारण गायनाचा बराच मोठा भाग मध्य सप्तकात असतो. आता एखाद्या गाण्यात मंद्र पंचमाच्या खालचे किंवा तार गंधाराच्या वरचे स्वर असू शकतात. असे गाणे म्हणण्यासाठी तात्पुरती पट्टी वर-खाली करून बघावे. शंभरात एखादे गाणे आपल्या आवाजाच्या आवाक्यापेक्षा जास्त लांबचे स्वर मागणारे असते (उदा. मंद्र ग किंवा तार ध) ते गाणे आपल्याला म्हणता येणार नाही असे समजावे. चुकीच्या स्वरात किंवा पट्ट्या बदलून गाण्यापेक्षा हा समजूतदारपणा बरा.
काही वेळा एखादे उडते गीत गाण्यासाठी वरीलप्रमाणे ठरवलेल्या पट्टीच्या मध्यमाला सा समजून गायिले तर अधिक प्रभावी होऊ शकते. याला मध्यमात गाणे असे म्हणतात. अशा गीताचा स्वरआवाका बहुधा एका सप्तकापुरताच असतो, त्यामुळे अडचण येत नाही.