प्रिय तू ,
आठवतं तुला मी म्हणलं होतं ,'तू जे म्हणशील तशीच वागीन मी' , पण त्याचा अर्थ तू असा घेशील असं कधी वाटलंच नव्हत मला. सुरुवात तशी खूप छान झाली आपल्या नात्याची. तुझी माझी ओळखच इतक्या नाट्यपूर्ण रितीने झाली होती...आठवतंय तुला? माझ्या १२ वी चा रिझल्ट होता त्यादिवशी आरुष् बरोबर आला होतास तू कॉलेजवर! त्यादिवशी खरं तर चुटपुटती ओळख झाली होती तुझी-माझी.मला आलेलं टेन्शन बघून म्हणाला होतास, "अगं १२ वी ची परीक्षा देणा-यांचं कौतुकच वाटतं बघ मला!! अगं आम्ही डिप्लोमा ला ऍडमिशन घेतली तीच मुळी १२ वी ला घाबरून!! एवढी परीक्षा दिलीस नेटाने आणि आता काय घाबरतेस? " रिझल्ट लागला माझं पुढचं कॉलेज सुरू झालं आणि त्याबरोबरच आपल्या भेटी गाठी पण. कधीतरी अगदी अचानक होणारी भेट, म्हणजे तू तासन् तास कॉलेज बाहेर उभा राहूनही अगदी नकळत घडली असं भासवणारी,कधी एखादी कॉफी of course आरुष् आणि आभा बरोबरची , कधी माझं सहज लांबच्या रस्त्याने क्लासला जाणं, तर कधी एकमेकांना उगीचच ब्लँक कॉल टाकणं. इतरांसमोर कबूल न करताही मनातनं मानलेलं एक अव्यक्त नातं दोघांच्याही नजरेत , वागण्या- बोलण्यात मिसळून गेलं होतं. किती सुरेख दिवस होते ते. थोडी थोडकी नाही चांगली ४ वर्ष. आता मी ही स्वप्न पाहत होते, नोकरी, लग्न.आपल्या नात्यानेही आता समजूतदारपणा, प्रगल्भता धारण करायला सुरुवात केली होती आणि अचानक काय झालं कोणास ठाऊक , अगदी एखादा प्रसंग नाही सांगता येणार मला पण...तुझ्या नजरेतला संशय जाणवला मला.संशय?.आणि तोही आरुष् आणि माझ्याबद्दल? मला प्रथमच काहीतरी खटकलं.खरं तर तुझा संशय माझ्यासाठी नवीनं नव्हता, पण जशी नात्यातली नवी नव्हाळी संपून नात्याने समजूतदारपणा धारण करायला सुरुवात केली ,तसं तसं मला तुझं माझ्यावरचं लक्ष ठेवणं जाचक वाटायला लागलं.माझं कुठल्याही मित्राशी हसून-खेळून बोलणं तुला चुकीचं वाटायला लागलं. नात्याचं ओझं मला खांद्यावर, मनावर आणि आयुष्यावर जाणवायला लागलं.