हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात पुरुष पार्श्वगायकांमध्ये महंमद रफी, किशोरकुमार आणि मुकेश हे नेहमीच सम्राटपदी राहिले. त्यांच्या तुलनेत हेमंतकुमार, मन्नाडे, तलत महमूद, महेंद्र कपूर यांना नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याचा अर्थ त्यांची प्रतिभा कमी होती असा नाही. पण यश हे नेहमी फक्त प्रतिभा आणि गुणवत्ता यावरच अवलंबून असत नाही. चित्रपटसृष्टीसारख्या बेभरवशाच्या व्यवसायात तर नाहीच नाही. हेमंतदांचा धीरगंभीर 'बेस' हीच त्यांची मर्यादा ठरली. चॉकलेटी चेहऱ्याच्या देव आनंदसाठी आपण हेमंतदांचा खर्ज चालवून घेतला खरा, पण तो केवळ त्या दोघांवरच्या आणि एकंदरीतच संगीतावरच्या आपल्या प्रेमाखातर. मन्नाडे तर फारच कमनशिबी. शास्त्रीय संगीताचा जबरा अभ्यास, सुस्पष्ट, दाणेदार आवाज, रागदारीची उत्तम जाण.. यशस्वी गायक होण्यासाठी लागणारे सगळे गुण असूनही या गायकाला शेवटी मेहमूदसारख्या विनोदी नटासाठी आवाज द्यावा लागला.