अभंग # ८.
संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥
एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्ण दाता ॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥
भिन्नपाठः मनोमार्ग= मनोमार्गे ,एकतत्त्व= एकतत्त्वीं
ज्ञानदेव संसारी सामान्यजनांसाठी भगवंतप्राप्तीचा "नामस्मरण" मार्ग हरिपाठातून सांगत आहेत. नाम हे संतसंगतीशिवाय मिळत नाही आणि मिळाले तरी टिकत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. किंबहुना सर्वच संतांचा हा अनुभव आहे. म्हणूनच तुकाराम महाराज, "न लगे मुक्ती धनसंपदा । संत संग देई सदा ॥" हे मागणे भगवंताकडे मागतात. योगमार्ग हा सामान्यजनांसाठी सहज नाही याची जाणीवही ज्ञानदेवांना होतीच.म्हणूनच त्यापासून दूर राहण्याचा सल्ला हरिपाठाच्या पाचव्या अभंगात ते देतातच. "तू मन हे मीचि करी" हे जरी भगवंतांनी गीतेत सांगितले असले तरी आपले मन हे सहजच इंद्रियांना सन्मुख आहे. इंद्रिये स्वभावतःच बहिर्मुख आहेत. स्वस्वरूपाच्या विसरात आपली जाणीव देहबुद्धीच्या अधिष्ठानावर विषयात सुखाचा शोध घेऊ लागते. स्वरूपाच्या विसरात नांदणाऱ्या जाणीवेच्या संकल्प-विकल्पात्मक स्फुरणाला मन असे संबोधिले जाते. इंद्रियांच्या द्वारे सुखाच्या आशेने मन विषयांकडे धाव घेते. ही मनाची गती म्हणजेच अधोगती होय. मनाच्या ह्या अधोगतीला "उफराट्या नामे" वळवून देहबुद्धीचे रुपांतर आत्मबुद्धीत करणे आणि "आनंदाचे डोही आनंद तरंग" अनुभवणे संतांना अभिप्रेत असते. भगवंताच्या सान्निध्यात राहण्याची योग्यता मनाला येणे म्हणजेच मनाचे "उन्मन" होणे हे नामस्मरणात अभिप्रेत आहे. "उन्मनीच्या सुखाआड । पांडुरंग भेटी देत॥" असे जे म्हटले आहे ते उगाच नाही. माणसाच्या मनात जागेपणी विचारांचा प्रवाह सतत चालू असतो. भगवंताच्या मार्गात वाटचाल सुरू झाली की तो प्रवाह क्षीण होऊ लागतो. मन स्थिर होत जाते. अखेर विचारशून्य होऊन कोणतीही वृत्ती उठत नाही. मन बहिर्मुख होण्याचे टाकून अंतर्मुख होऊ लागते. समजणे, उमजणे आणि आकळणे ह्या ज्ञानप्राप्तीच्या ३ पायऱ्या आहेत. जाणीव जशी तरल होत जाते तसा ह्यामध्ये विकास होत जातो. मनाच्या या आत उतरण्याच्या प्रक्रियेलाच संतांनी सांगितलेला अध्यात्ममार्ग म्हणतात. आत उतरता उतरता मन सूक्ष्म आणि निर्मळ होते. पवित्र झालेले असे मन भगवत्स्वरूपच होते.
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥
भगवंताचे नाम वाचेने अखंड घेणे, स्मरणात स्फुरणे हा वास्तविक जीवाचा भाव, स्वभाव म्हणजे स्वधर्म होय. या स्वधर्माला जीव मुकला म्हणूनच तो अखंड सुखाला आंचवला. या स्वधर्माची दीक्षा देण्यासाठी संत साधकाला नाम देतात. नामातून देवाची स्मृती जागृत होते, प्रेम उत्पन्न होते. साक्षात शिवही रामनामाचाच जप करत असत. रामजप हा त्यांचा आत्माच होता. आत्मा म्हणजे प्रिय असण्याची परमसीमाच.