आजी गेली तेव्हा मी अमेरिकेत होते. १३ जानेवारी,२००१-भोगीचा दिवस. सकाळी मुलगा आणि नवरा आपापले डबे घेऊन गेले. घरातले आवरत एकीकडे मी मेल पहात होते. सासूबाईंचा मेल होता. दुःखद निधन. मी घाईघाईने मेल पाहिला, " अरे देवा!!" आजी गेली होती. बराच वेळ मला काहीच समजत नव्हते. रडूही येत नव्हते. हे खरे आहे ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजही बसत नाही. मी आईला फोन लावला. आईने सांगितले की फारसा त्रास न होता आजी गेली. तीन-चार तास हॉस्पिटल मध्ये होती. बोलतही होती. अटॅक आला होता. डॉक्टरांनाच सांगत होती, मला काही कुठे दुखत नाही. लवकर घरी पाठवा. पुन्हा एक अटॅक आला आणि गेली.