कॉलेजात असताना मी भरपूर लांब केस ठेवले होते. रस्त्यात पोरी देखील वळून वळून बघत असत. त्या नजरा मत्सराच्या होत्या की 'काय ध्यान आहे' अशा अर्थाच्या होत्या यावर विचार करून मी त्रास करून घेत नसे. मला फार अभिमान होता केसांचा, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं! लांब केस ठेवण्याचं माझं ध्येय माझ्या बापाने न्हाव्याकरवी खुंटवलं. आपल्या पोटावर पाय आणणाऱ्या लोकांचा कट उधळलाच पाहीजे या विचाराने पेटून त्या दिवशी न्हाव्याने एकदम मिलीटरी कटच मारला आणि दुप्पट पैसे लावले. हाय! हाय! मेरे बालोंके टुकडे हजार हुए कोई इधर गिरा कोई उधर!
कॉलेज संपून नोकरी लागेपर्यंत मी 'पांढरकेशी' झालो होतो.