अमेरिकायण! (भाग १५ : धोबीघाट)

आपल्याकडे कपडे धुणे हा दैनंदिन भाग आहे पण अमेरिकेत हा एक साप्ताहिक (कधीकधी पाक्षिक  ) सोहळा असतो. आठवडाभराचे कपडे एकत्र मोठ्या यंत्रात यथास्थित खंगाळल्यानंतर तेवढ्याच मोठ्या यंत्रात ते वाळायला घातले जातात. अमेरिकेत घरे मोठी असल्याने काही घरांतच ही यंत्रे असतात. पण बऱ्याच ठिकाणी कपडे धुणे हा सार्वजनिक प्रकार असतो आणि त्यासाठी "लाँड्रामार्ट" नावाचे सार्वजनिक कपडे स्वच्छतालय ठिकठिकाणी दिसेल. याला आम्ही धोबीघाट म्हणतो. आपल्या धोबीघाटावर जसे अनेक धोब्यांना एका वेळी कपडे धुवायची सोय असते तसेच हे, फक्त धोब्यांऐवजी तेच काम करणारी यंत्रे रांगेत लावलेली असतात.

आपल्याकडे धोबी या संस्थेने समाजव्यवस्थेवर बराच परिणाम केला आहे. एके काळी हा धोबी बऱ्याच जणांच्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा घटक असे. कालांतराने त्याची जागा "वॉशिंग मशीन" नावाच्या निर्बुद्ध पण सोयीच्या यंत्राने घेतली. तेव्हापासून अनेकांची चोरलेले कपडे, तुटलेली बटणे, पडलेले डाग, उसवलेले खिसे यांपासून सुटका झाली खरी पण त्याचबरोबर अनेकांच्या दुपारच्या गप्पा, चाळीतील इतरांच्या खबरा, प्रत्येकाच्या कौटुंबिक माहितीचा खात्रीशीर स्रोत, आणि भरपूर वावड्यांचा जनक हरवला. अमेरिकेतील हे धोबीघाट मात्र सोयीबरोबरच सामाजिक एकोप्यात महत्त्वाचा वाटा उचलून आहेत असं माझं स्पष्ट मत आहे.

इथली यंत्रही आपल्या घरगुती यंत्रांपेक्षा बरीच 'शांत' असतात. कपडेही स्वच्छ धुतले जातात. एकतर अमेरिकेत धूळ हा प्रकार फार कमी असल्याने कपडे आधी फारसे मळतच नाहीत. त्यामुळे असेल, पण कपडे स्वच्छ निघतात हे नक्की. कपडे धुण्यापेक्षा वाळण्याचं यंत्र म्हणजे अहो आश्चर्यम! कपडे संपूर्ण कोरडेठाक होऊनच बाहेर येतात. म्हणजे इतके की घाई असेल तर कपडे धुऊन, वाळवून तुम्ही इथूनच ते परत अंगावर चढवून बाहेर जाऊ शकता. [float=font:vijay;size=25;breadth:200;color:22A220;]पावसाळ्यात कपडे न वाळल्याने इस्त्री करून किंवा गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून कोरडे करावे लागणाऱ्या मला हा बदल म्हणजे एक क्रांतीच होता.[/float] त्यात इथे वासाचे कागद मिळतात ते ह्या सुकवायच्या यंत्रात घालायचे. अहाहा! त्याचा मंद सुवास कपड्यांवर आठवडाभर तर सहज दरवळत असतो.

या अमेरिकन धोबीघाटावर बरीच प्रजा जमते. इतकी वेगवेगळी लोकं इथे येतात की माणूस बघायचा छंद असलेल्या मला इथे खेळण्यांच्या दुकानात मुलांना होतं ना तसं व्हायला होतं. ही दुकानं मुख्यतः स्पॅनिश/मेक्सिकन मंडळींची असतात. त्यांचीही चिन्यांप्रमाणे लेकुरे उदंड असतात नि हे दुकान त्यांचे खेळायचे मैदान असल्याप्रमाणे ही पिलावळ यथेच्छ पळापळ करत असते. मी ज्या धोबीघाटावर जातो तिथे त्या मालकिणीची एक लहान मुलगी आहे २-३ वर्षाची असेल. तिला सांभाळायचं सोडून आमच्या मालकीण बाई मूळच्या धोबीजातीला जागून बाकी जमलेल्या भगिनीसमाजात गप्पा टाकत असतात. आणि ह्या चिमुरडीलाही वाळवायच्या यंत्राचं काय आकर्षण आहे देव जाणे ती सतत त्या यंत्रात जाऊन बसायला धडपडत असते. . तिला "व्वा!"करून ओरडू ही शकत नाही( इथे मुलांना ओरडणं क्रूर समजलं जातं आणि इथली माणसं असं करणाऱ्या पालकांकडे राक्षस तर त्या मुलांकडे राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या कोकरासारखं पाहतात असा एक समज आहे. मूल असेल तर ठीक पण जर तुम्ही जनावराकडे (पक्षी: पाळीव) चुकूनही वाईट कटाक्ष टाकलात तरीही ह्याच प्रतिक्रियेचं वाच्य रूप पाहायला मिळेल याची खात्री बाळगावी  )

काही जण इतके कपडे आणतात की एकतर ते महिन्याभराने कपडे धूत असावेत किंवा मग शेजाऱ्यांचे कपडेही धुवायला आणत असावेत असा संशय येतो. बरं बरेच कपडे आहेत म्हणून मोठं मशीन घेतील असं नाही तर त्या कपड्यांचं वर्गीकरण करून रोजचे कपडे एका यंत्रात, आतले कपडे दुसऱ्या, सफेद कपडे अजून एका, मोजे-रुमाल इ. चौथ्या, बाहेरचे कपडे पाचव्या अश्या प्रकारे जवळ जवळ ५-६ यंत्र अडवून बसतात. साधारणतः शनिवार-रविवारी इथे इतकी गर्दी जमते की बऱ्याचदा यंत्र अडवायला आम्हाला महाराष्ट्र परिवहन खात्याच्या बसेसमधून प्रवास केल्याचा अनुभव उपयोगी यायचा. म्हणजे असं की 'एस.टी.' आल्यावर जसं लोकं रुमाल टाकून जागा अडवतात, तसं मशीन रिकामं झालं रे झालं की रुमाल-मोजा-टाय अगदी जवळ काहीच नसेल तर अगदी अंगावरील एखादा कपडा टाकून लोकं यंत्र अडवतात. वर एखादा गड जिंकल्यासारखा त्यांचा चेहरा आणि त्यावरच्या विजयी मुद्रा बघण्यालायक असतात. (सध्या आम्ही गुरुवारी धोबीघाटावर जात असल्याने ही मजा आता मिळत नाही   )

हा धोबीघाट म्हणजे बऱ्याच जणींच हक्काचं "गॉसिप सेंटर" (चकाट्या पिटायचं केंद्र  ) असतं. सध्या कुठे "सेल" आहे, कुठे कोणती वस्तू "वॉव" आहे, कुठे वस्तू विकत घेतल्यास तुम्हाला "सो चिऽऽप" चा दर्जा मिळू शकतो, सध्याची कोणती सिरियल नॉटी आहे, मुलांच्या डायपर बदलण्याबद्दलच्या शंका, ब्रोकोली घालून करता येण्याचे पदार्थ, अबक नटीची लफडी, येत्या सणाबद्दलची तयारी, माझी मुलगी/मुलगा कशी/कसा ग्रेट आहे चे पाढे इ. काहीही तुम्हाला ऐकायला मिळू शकतं यासाठी वय, धर्म आणि नागरिकत्व यांच्या सीमा नाहीत. भारतीय, स्पॅनिश, अमेरिकन.. संमिश्र... बायकांचा घोळका कोणताही असो. हक्काने गॉसिप होणारच.

याशिवाय विविध प्रकारचे नवरे हाही इथला अगदी बघणेबल प्रकार. खाली मान घालून कपडे धुवायला आलेले नवरे, बायकोने नाईलाजाने बरोबर आणलेले नवरे (केवळ ओझ्याचे बैल), पोराला सांभाळायची सोय म्हणून आलेले नवरे, नुकतंच लग्न झालेले 'प्रेमळ' नवरे, केवळ टीव्ही बघण्यासाठी आलेले नवरे, आपली बायको सोडून प्रत्येकीकडे बघणारे "काणे" नवरे, कोणाशीही इच्छा नसताना बोलू पाहणारे उतावीळ नवरे अशी या इथल्या नवरे मंडळींची ढोबळ वर्गवारी करता येईल. नवऱ्यांशिवाय इथे येणाऱ्या पुरुषांमध्ये असणारे "धूमकेतू" विद्यार्थी आणि आमच्यासारखे फुकट वेळ काढायला आलेले बॅचलर्स असतातच. विद्यार्थी धूमकेतू यासाठी की ते केवळ कपडे यंत्रात टाकायला त्या दुकानात येतात. कपडे , साबण वगैरे सगळं एकदमच टाकतात आणि पुढच्या ४० मिनिटांसाठी गायब.

आता एक माझ्याबरोबर झालेली गंमत सांगतो. मी एकदा कपडे धुवायला गेलो होतो.. समोर रिकामं यंत्र दिसल्यावर धाड घालून खिशातला रुमाल सरकवला. आणि नंतर कपडे आणून बाकीचे कपडे यंत्रात घालून ठेवले. मग लक्षात आलं की साबण आणायचाच राहिला होता. म्हणून परत जाऊन साबण आणला. एक यंत्र चालू करून त्यात साबण टाकला आणि टीव्ही बघत बसलो. ५-१० मिनिटांनी एक बाई तावातावात माझ्याकडे आली आणि बोलली की तू ते यंत्र चालू केलयस का? म्हटलं हो. तर ती म्हणाली त्यातले माझे कपडे कुठे आहेत? मी घाबरलो. म्हटलं त्यात तुमचे कपडे नव्हते. जाऊन पाहिल्यावर घोळ लक्षात आला. मी चुकून वेंधळेपणाने माझ्याऐवजी त्याच बाईच यंत्र चालू केलं होतं  . माझ्या यंत्रातले कपडे 'टुकटुक' करत यंत्राच्या काचेच्या खिडकीतून माझ्याकडे हसत पाहत होते. तिच्या यंत्रात फक्त "टाईड" आहे हे ऐकल्यावर त्या बाईने सुटकेचा निःश्वास टाकला ! नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक

तर असा हा धोबीघाट, माझ्या टाईमपासचं हक्काचं केंद्र! एकदा जाऊन बघाच इथे अमेरिकाच दिसणार नाही तर अमेरिका भेटेल आणि तुमच्याशी बोलेलसुद्धा!

-ऋषिकेश

(शु.चि" बंद आहे  )