'सेतू' हा आमचा नागपूरमधला अभिनव उपक्रम.एखादा विषय घ्यायचा उदा. शिकवणी वर्गाची गरज, मुलांचा आहार, मुलांना वाचनाची आवड कशी लावता येईल इ. व त्या विषयातील तज्ञाला बोलावून त्यांच मार्गदर्शन व चर्चा असा महिन्यातून एकदा कार्यक्रम घेत असतो. चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू असूनही दर भेटीत वेळेच्या अभावी आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी, छंद, मुलांची ओळख होत नव्हती. आपाआपसांत ओळख व्हावी, संवाद साधता यावा ह्या हेतूने एक सहल काढायची ठरलं! सणवार नाही, परीक्षा नाही असा सगळा विचार करुन, ६-७ सप्टेंबर ह्या तारखा वडगावला जाण्यासाठी ठरवल्या होत्या. पाहुणे येणार आहेत, मुलांच्या गीतापठणाच्या स्पर्धा आहेत, घरात कोणाला तरी बरं नाही अशी अनेक कारणं ऐकायला मिळाली तेव्हा वाटलं ३० सीटरचीच बस ठरवावी. पण हो-नाही करता-करता २ वर्षापसून ५० वर्ष वयापर्यंतचे ४५ जण तयार झाले आणि ५० सीटर बस ठरवावी लागली. १५ जणांचे पैसे जमा झाल्यावर आमच्या संस्थेची(सेतु-A conscious parent forum) संस्थापक स्नेहा आणि मी अविनाश देऊस्कर सरांना भेटायला गेलो. प्रसिद्धी परामुख असलेल्या सरांची आणि माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. सरांनी आयोजित केलेल्या पहिल्या मुलींच्या कुलु-मनाली गीर्यारोहण कॅम्पला स्नेहा गेली होती. सध्या गीर्यारोहणा व्यतिरिक्त मोठमोठ्या एमएनसीज व कारपोरेट वर्ल्डच्या लोकांना ट्रेनिंग देण्यात व्यस्त असल्याचे शांत, मृदू व मितभाषी अविनाश सरांनी सांगितलं. आम्ही आमचा कार्यक्रम सांगितला. "तुमचा मुख्य उद्देश पालकत्व आहे, त्यादृष्टीने मी काही खेळ घेईन," सर म्हणाले. पाचच मिनिटात आमची भेट आटोपली आणि आम्ही त्यांच्या खोलीतून बाहेर पडलो. दारातच सरांच्या पत्नी भेटल्या. स्नेहाला पाहून त्यांना इतका आनंद झाला की काय बोलू न काय नको असं झालं.त्यांच्या नेतृत्वाखाली केलेली २२२१८फुट 'भृगुपंथ शिखर'चढाईची मोहिम यशस्वीरित्या पार पाडून आल्याबद्दल आम्ही त्यांच अभिनंदन केलं. मनमोकळ्या विमला नेगी-देऊस्कर हिंराठीत मोहिमेच वर्णन सांगत होत्या. आणि हो मुलांच व नवऱ्याच कौतुक करायला विसरल्या नाहीत. " मी काही केलं नाही, मी फक्त त्यांच्या शाळेत जाण्याऱ्येण्याच्या व जेवणाच्या वेळा सांभाळल्या," त्यांना मध्येच अडवत सर म्हणाले. आता ६ तारखेला भेटायच ठरवून आम्ही त्या दोघांचा निरोप घेतला. आम्ही ६ तारखेला भारतीय वेळेनुसार निघालो. शिरस्त्याप्रमाणे गाडीत गाण्याच्या भेंड्यांचा खेळ सुरू झाला. गाणाऱ्यांच्या व गाडीच्या सुरात सुर मिसळण्यात कोणीच मागे नव्हते. पोहचेपर्यंत अंधार पडला त्यामुळे धरण बघण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवसावर ढकलल्या गेला. चहा व मुलांसाठी बोर्नव्हिटा तयार करुन आमची वाट पाहत होते. चहापाणी आटोपल्यावर १० मिनिटात मोठ्या छत्रीखाली गोळा व्हायला सरांनी सांगितलं. पालक आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांना तयार करून २० मिनिटात गोळा झाले. रोजच्या शाळा, अभ्यास, शिकवणीवर्गाला जखडलेल्या मुलांना हुंदडायला मोकळं रान मिळाल होतं, त्याचा पुरेपुर फायदा घ्यायला ते आई-बाबांकडे न बघता सज्ज झाले होते.