अमेरिकायण! (भाग १२: शिकागो[१- आगमन])

डिस्कव्हरीवर "ग्लोब ट्रेकर" मधे  तो इआन राईट वेगवेगळ्या देशात एकटं फिरतो. माझी तशी फार फार वर्षांपासूनची इच्छा होती; की त्याच्यासारखं केवळ एक बॅग पाठुंगळीला लाऊन कुठेतरी भटकून यायचं. सगळं स्वतःच स्वतः ठरवायचं, बुकींगपासून ते काय बघायचं, कसं बघायचं ते. अश्यावेळी अमेरिकेत ओमाहात राहणाऱ्या कॉलेजच्या मित्राचा फोन आला. आम्हाला बरेच दिवस भेटायचं तर होतच पण कुठे हा प्रश्न होता. आम्ही न्यूयॉर्क नको आणि ओमाहा नको म्हणून मधलं "शिकागो" मुक्रर केलं.

माझा मित्र त्यावेळी शिकत असल्याने त्याला कोणतही प्लॅनिंग करायला वेळच नव्हता. त्यामुळे ती अख्खी सहल नियोजित करण्याचं काम माझ्यावर येऊन पडलं. अर्थात यात कठीण काही नसतं, पण कधी केलं नसल्याने नाविन्य जरूर होतं. अमेरिकेत जालावर सगळ काही आरक्षित करता येतच पण त्यातही लवकर आरक्षण केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्या सुट देतात. त्यामुळे सगळ्यात स्वत, सोईचं असं सगळं बघून विमान आणि हॉटेलचं आरक्षण केलं. तिथे फिरायचं कुठे, बघितल'च' पाहिजे अशी ठिकाणं, तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इ. माहिती जालावरून, तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून मिळवण्यात वेळ जात होता. जाण्याचा दिवस आला तेव्हा मी कधी कुठे असेन, तिथे जाणार कसं, तिथे खायला काय आहे (हे मी नेहेमी विचारतो हे आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, तेव्हा मी कुठेही जायचा बेत आखायला लागलो की मंडळी पर्यटनस्थळांबरोबरच  जवळची उत्तम उपहारगृह जरुर सुचवतात) हे सांगण्या इतपत तयारीत होतो. पुढे आमच्या बरोबर, माझ्या कॉलेजमधील अजून एक मैत्रिण आणि तिच्या ऑफिसातील चौघे, असा एकूण सात जणांचा कंपू तयार झाला होता. यातलं कोणिही कधीही शिकागोला आलेलं नव्हतं, त्यामुळे सगळे जण माझ्या 'प्लॅन'वर अवलंबुन होते. आणि वर माझ्या प्रिय मैत्रिणीने "ऋषिका प्लॅन है तो अपने को कुछ देखनेका जरूरत नही है" असं सगळ्यांना सांगून हात झटकून घेतले होते  . (मी मुंबईतला असल्याने केवळ मराठी मित्र-मैत्रिणी असतील असा समज बाळगण गैरच. तेव्हा क्वचित इंग्रजी व हिंदी वाक्य खपवून घ्यावीत. या सहलीत केवळ मी व माझा मित्र असे दोघेच मराठी होतो. बाकी दोन तमिळ, एक बंगबंधू,एक मल्याळी आणि एक गुजराती असा सारे जहंसे अच्छा माहौल होता )

तर अश्या गदारोळात शिकागोला जायचा दिवस उजाडला. ऑफिसातून मी थेट "ला गार्डिया" (की लग्वार्डिया?) विमानतळावर गेलो. विमानतळ कसला एस.टी.स्टँड म्हणा हवंतर!! सुरक्षाकवच वगैरे पार करून गेलो. आत माझं दार (गेट) जिथे आहे तिथे जाऊन बसावं असा विचार केला. त्या टर्मिनल मधे गेलो तर काय, हीऽऽ तोबा गर्दी! बसायला सोडाच साधं उभं रहायलाही जागा नव्हती. बघितलं तर विमानं फार उशीरा होती अशातला काही भाग नव्हता. मंडळी तर अगदी जमिनीवर वगैरे बसली होती. सगळे जण हे तर इथलं नेहमीचच आहे अश्या अविर्भावात मस्त मजेत होती. कोणी खात होतं, पोरं पायांतून सैरावैरा पळत होती, काहींचं मनसोक्त धुम्रपान चाललं होतं, झालच तर ज्युस, कॉफी वगैरे होतंच. या सगळ्या प्रकारने त्या टर्मिनलला अक्षरशः फलाटाचं रूप आलं होतं. माझ्यासाठी हा धक्काच होता. अमेरिका म्हणजे कसं, सगळ छान, स्वच्छ, टापटीप, रेखीव, नियोजनबद्ध अश्या सगळ्या कल्पनांना उभा छेद देणारी ही स्थिती होती. विमानं तर लोकल्ससारखी येत होती. एक आलं की आधीचे प्रवासी उतरायचे, दुसरे चढायचे आणि विमान लगेच पसार. विमान लँड होण्यात आणि उडण्यात जेमतेम अर्धातास मधे असेल.

शेवटी माझं विमान फलाटाला लागलं. आधीचे प्रवासी उतरले. आम्ही बाहेर रांग लाऊन उभेच होतो. शेवटचा प्रवासी बाहेर जाताच, लगेच आमची रांग आत सोडली.  आत मात्र सगळं देखणं होतं. नव्या कोऱ्या उश्या, मंद गंध, हलकं संगीत आणि सुहास्य वदनाच्या हवाईतारका. (मला आकाशात तारका असणंच जास्त जास्त योग्य वाटतं.. अर्थात एअर इंडियाच्या समपेशींना हवाईवनिता म्हणावसं वाटतं हा भाग अलाहिदा  ). त्या तारकांनी इतक्या झटपट विमानाची स्वच्छता कधी केली देव जाणे. हं तर.. मला अजूनही विमान फार फार आवडतं. ला गार्डिया वरून विमान उडल्या उडल्या, बाहेर न्यूयॉर्क पसरलेलं दिसलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले. त्या उंचीवरून  पहिलेलं ते न्युयॉर्क पाहुन माझी अवस्था 'अनिर्वचनीय' झाली. ते शहर काचेला नाक लाऊन बघतच राहीलो. हळुहळू ते दृश्य डोळ्यापुढून सरकलं पण नजरेपुढून जाईना. ते दृश्य मनात घोळवेपर्यंत वायुमैल-दरमैल करत शिकागो आलं अशी उद्घोषणा झाली. बाहेर संध्याकाळ झाली असल्याने दिवे लागले होते. ते शिकागोचं पहिलं दर्शन! अनंत तारका जमिनीवर पुजक्या पुंजक्यानी पसराव्यात आणि त्यातुनच विविध आकार भासून सुंदर नक्षत्रे जन्मावीत असं ते दृश्य! रात्री जमिनीवरून आकाश जितकं मोहक दिसतं तितकच आकाशातून प्रकाशमान जमिनीला बघत राहावंस वाटतं.

तर एकदाचे आमच्या विमानाचे पाय जमिनीला लागले. बाहेर येताच पुन्हा ला गार्डिया सारखी बेफाम नाही पण गर्दी होतीच. आता इथे माझ्या मित्राचं विमानही त्याच सुमारास उतरणार होतं. त्याला भ्रमणध्वनी करून पाहिला. तो पोहोचलेला होता. मला एकदम आठवलं, पुर्वी कॉलेजात असताना आम्ही असे बोलायचो की आपलं आयुष्य इतकं वेगळ्या वाटांना लागेल की आपण कधी कुठे भेटू याचा नेम नाही. आणि खरच, रोजच्या रोज भेटणारे, सतत एकत्र असणारे, एकत्र गमती करणारे, एकत्रच शिक्षा भोगणारे आम्ही दोघे आता दोन वर्षांनी भेटत होतो तेही दूर देशी एका पूर्ण अनोळखी शहरात. मला फार उत्सुकता होती त्याला भेटायची. तो दिसला आणि फार बरं वाटलं, अमेरिकेत आल्यापासून आपलं म्हणावं असं कोणीतरी पहिल्यांदाच भेटलं होतं. सतत परक्यासारखं राहताना अशी मित्राची भेट म्हणजे काय हे दुरदेशी राहिल्याशिवाय नाही कळणार. इथे आल्यावरच जास्त जाणवतं की आपल्याकडे काय होतं. असो! तर तो दिसल्यावर आम्ही अत्यानंदाने एकमेकांना मिठी मारली आणि जाणवलं की आजूबाजूची मंडळी एकदम चमकून पहायला लागली. मग जाणवलं की ही अमेरिका आहे. इथे मित्र असला तरी मिठी मारणं विचित्र समजलं जातं. (मला तरी हे त्यांच्या कुजक्या/कोत्या विचारसरणीचं हे द्योतक वाटतं). ण इथे कोणाला पर्वा होती. आम्हाला कोण ओळखत होतं. हा विचार आला आणि या अनोळखी जागी भटकण्याची मजा अजुनच वाढली.

विमानतळावर असणारे सगळे चकटफू नकाशे, माहितीपत्रकं, बस/ट्रेन/विमानं/शोज यांच्या वेळा इ. जे काही मिळेल ते उचललं. पुढे याचा उपयोग रस्ता शोधणे, वेळेवर गाड्या पकडून इष्ट स्थळी पोचणे यासाठी फार झाला. आम्ही स्वस्त म्हणून चायनाटाऊन मध्ये जागा घेतली होती. एकतर केवळ रात्र काढायला आणि सामान टाकायला जागा हवी असल्याने, उगाच पैसे घालण्यात मलातरी 'अर्थ' दिसला नाही. लगेच बॅगेतून रात्री लागणाऱ्या नकाशाच्या प्रिंटसचा गट्ठा काढला आणि बरोब्बर ठरवलेली गाडी पकडून चायनाटाऊनला वेळेत पोहोचलो. हॉटेल शोधायला फार त्रास नाही झाला. (पत्ता शोधणे यासारखं सोपं अमेरिकेत काही असेलस मला वाटतं नाही. तुम्हाला केवळ दिशेचं भान अस्लं आणि घर क्रमांक आणि रस्त्याचं नाव जवळ असेल तर हे फार सोपं आहे.) जागा ताब्यात घेतली. मस्त शॉवर घेतला आणि इतरांची वाट पाहत गप्पा मारत जमवलेल्या गट्ठ्यातील माहितीच्या आधारे दुसऱ्यादिवशीचा प्लॅन नक्की करून टाकला.

रात्री १० वाजेपर्यंत एक एक करत बाकी मंडळी आली. दोन्ही खोल्या सामान, माणसं आणि उत्साहं यांनी लगोलग भरल्या. सगळे गप्पा मारत बसले. बसेबोले पर्यंत १२ कसे वाजले कळलच नाही. तोपर्यंत  सगळ्यांना भुका लागल्या तर होत्या; पण रात्री १२ वाजता कोणतं हॉटेल उघडं असणार. शेवटी त्या चायनाटाऊन मधल्या एका चायनिज हॉटेलातच डेरा जमवला. हा कसा काय इतक्या रात्री उघडा होता देव जाणे. आमच्यातल्या दोघांना शुद्ध शाकाहाराची आवश्यकता असल्याचं सांगितलं.  तो मजेशीर संवाद असा होता.

"इस इट प्युअर व्हेज?"
"यस सार.. इत इज वेज"
"इज इट विथ चिकन?"
"यस"
"ईट हॅस एग्स?"
"यस"
"वी वॉंट राईस विदाऊट एग्स ऑर चिकन"

असं म्हंटल्यावर, असा पदार्थ असेलच कसा, असा चेहेरा त्याने केला. आणि डोळ्याची फट  जितकी विस्फारता येईल तितकी विस्फारून अतीव आश्चर्याने तो कीचनमधे लुप्त झाला. नशिबाने जेवण अगदीच बेचव नव्हतं. पण अजूनही तो "व्हेज चिकन राईस" आठवला की हसू येतं.

तर.. फार रात्र झाली होती.. सकाळी लवकर उठून शिकागो दर्शनाला सुरवात करायची होती. पण बऱ्याच दिवसांनी भेटलेली मित्रमंडळी, पूर्ण एकांत आणि पाऊलवाटेसारखे एकातून एक फुटणारे आणि न संपणारे विषय असल्यावर रात्र झोपण्यासाठी थोडीच असते. आम्ही रात्री कितीतरी वेळ गप्पा मारत होतो. कॉलेज, तेव्हाचे प्रोफेसर, केलेल्या करामती, काही जिंकलेले हरलेले क्षण, जुनी लफडी, नव्या खबरा अश्या अनेक विषयांची धुंदी चढत गेली आणि आत्ता पर्यंतची माझी अमेरिकेतील सगळ्यात सुंदर रात्र रंगत गेली...

(क्रमशः)

ऋषिकेश

टिपः शुद्धिचिकित्सकाशी संधान साधण्याचे काम गेले अनेक दिवस चालू आहे. तोपर्यंत कृपया अनेक चुकांसकट लेख वाचण्याची तसदी घ्यावी