माणसे: अरभाट आणि चिल्लर - १२

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ११  पासून पुढे.

आम्हाला कसलीच माहिती नव्हती.  पण आम्ही काही बोलायच्या आतच नानू बापटाने होय म्हणून टाकले.  मास्तरांचा इसाळ कमी झाला नव्हता, पण तेवढ्यात तातू सामंताने विचारले, “सर तुम्ही कधी गडकरी यांना भेटला होता का प्रत्यक्ष?” "भेटला होता का? भेटला होता का?” हातवारे करत मास्तर पुढे सरकत म्हणाले, तेव्हा नानू बापट तर गाठ मारल्याप्रमाणे आक्रसला. मास्तर म्हणाले, “मी इतक्या वेळा पुण्याला गेलो ते काय तेथले टांगे आणि अनेक मारुती मोजायला की काय? मी त्यांना दोनदा पाहिले. एकदा मी एकटाच गेलो होतो. त्या वेळी मी त्यांना पाहिले. पण त्या वेळी पायांतील शक्तीच गेली, आणि मी बावळटपणे पाहत राहून तसाच परतलो. दुसर्‍या खेपेला मात्र मी एका लेखकाची विनवणी करून त्याला बरोबर घेऊन गेलो. ते दोघे खूप बोलले, पण मला मात्र एक शब्द बोलायला झाले नाही. येताना मी त्यांच्या घरासमोरील पिंपळाची चार पाने घेऊन आलो. ती मी अगदी जपून ठेवली होती. त्यांतील दोन पाने मित्रांना दिली. एक माझ्यासाठी हवे.” मग ते मला म्हणाले, “पुढे कधी तरी तू गडकरी यांचा अभ्यास केलास, तर तुला ते उरलेले पान देईन.” नंतर अनेक वर्षांनी मी गडकर्‍यांच्या कविता, त्यांची नाटके वाचली. पण त्याआधीच मास्तरांकडून ते पिंपळपान मला मिळायचे नाही, हे ठरून गेले होते.

पण मनातील बर्‍याच जळफळाटाचा आजच निचरा करायचे मास्तरांनी ठरवले होते की काय कुणास ठाऊक! ते म्हणाले, “गडकर्‍यांनी एकदा एका फुटक्या तपेलीवर कविता केली म्हणून कुणी तरी त्यांचा उपहास केला. म्हणे फुटकी तपेली अगर एखादे टमरेल हा काय कवितेचा विषय होतो की काय? आता यावर काय बोलणार कपाळ! भोपळ्यांनो, ते सारे कविता कोण करते यावर अवलंबून असते. एखाद्या झुरळाने हिमालयावर कविता केली म्हणजे का ती हिमालयाएवढी होते? उलट, बर्न्स नावाच्या एका कवीने नांगराचे टोक लागून मेलेल्या उंदरावर कविता लिहिली आहे, आणि त्यात माणसाच्या लहान, असहाय जीवनाचे प्रतिबिंब पडले आहे. आणखी एका कवीने, आता मला नाव आठवत नाही, तर एका गाढवावरच कविता लिहिली आहे.”

त्यावर तातू सोडून इतर सर्व पोरे हसली.

“तर त्या कवितेत गाढव म्हणते, अरे, मला पाहताच सगळे जण खिदळतात. मला गोड आवाज नाही, रूप नाही, काही नाही. उरलेले सारे सामान कसेबसे एकत्र आणून कंटाळत दैवाने मला निर्माण केले, असला प्राणी मी. पण लक्षात ठेवा, माझ्याही आयुष्यात भाग्याचा एक दिवस येऊन गेला आहे.  जीजसने जेरुशलेममध्ये प्रवेश केला, त्या वेळी त्याने शृंगारलेला घोडा किंवा उंट यांची निवड केली नाही. तो मान मला मिळाला होता.”

या तासाला आमचे भाषांतर कोपर्‍यात पडले. मग मास्तर रागारागाने पुन्हा खुर्चीत जाऊन बसले, व लिहिण्यासाठी त्यांनी फाइल उघडली असेल नसेल तोच घंटा झाली.

एकदा एका तासाला त्यांनी "सौंदर्य" नावाचा धडा घेतला. त्यांनी त्या लेखाच्या अगदी चिंधड्या करून टाकल्या. वैतागाने त्यानी पुस्तक टेबलावर आपटले व ते खुर्चीत बसले.

“कशाला असले धडे पुस्तकांत घेतात कुणास ठाऊक! एखाद्याला जेवायला बोलवावे आणि त्याच्यापुढे मेलेली एक बेडकी ठेवावी, तसला प्रकार आहे हा!” ते चिडून म्हणाले. त्यांनी तपकिरीची डबी उघडली, पण आपण नुकतीच तपकीर घेतली आहे हे त्यांच्या ध्यानात आले, व त्यांनी ती फटदिशी बंद केली. पण मास्तरांचा हा राग त्या फडतूस निबंधामुळे निर्माण झालेला नसावाच. कारण हाच निबंध आदल्या वर्षी देखील होताच, व त्या वेळच्या वर्गाला त्यांनीच तो शिकवला होता.

“म्हणे गडकर्‍यांची माणसे साध्या माणसांप्रमाणे बोलत नाहीत ! शब्दांना धरबंद कसा घालावा, हे त्यांना कधी समजलेच नाही. काशी-भोपळ्यांनो, अरे, त्यांच्या पात्रांप्रमाणे बोलता येत नाही म्हणून आपण ओशाळे व्हायचे की त्याचाच टेंभा मिरवायचा? आम्ही सामान्य माणसे बोलतो ते तोंडात डिंकाची बाटली घेतल्याप्रमाणे. एखादे नृत्य पाहावे आणि ओरडावे, सामान्य माणसे असे कधी चालतात की काय? तुम्ही जन्मताच कर्मदरिद्री जन्मलात, पण दारिद्र्याची पताका मिरवण्यात तुम्हाला अभिमान. तुम्ही विष्णूला देखील म्हणाल, “छातीवर कौस्तुभमणी मिरवायचा म्हणजे देवा, जरा जास्तच झाले! किती सामान्य लोकांकडे कौस्तुभमणी असतो?” आणि दररोजची, दररोजची भाषा म्हणून तुम्ही गवगवा करता, त्या भाषेत आम्ही काय दिवे लावतो? कशासाठी ती वापरतो? - तर मोलकरीण अजून आली नाही काय? राकेल संपले आहे! आला वाटते पुन्हा हा खवीस सकाळीच पैसे उसने मागायला! अहो, देतो की तुमचे पाच रुपये. का कुठे पळून चाललो आहे? आता काय करणार ऐन वेळी? परटाने पॅंटची सारी बटणेच तोडून टाकली आहेत! ए बाई, मला जरा आणखी थोडा वेळ झोपू दे. ऐन वेळी झोपेत असता, आरडाओरड करून भूकंप करणे हा सगळ्याच सती सावित्रींचा हक्क आहे की काय? - असले दिव्य उद्गार काढायला? आणि यासाठी गडकरी कशाला हवेत? उंदराची पिटके मारायला तानाजी कशाला हवा?” तातू सारे शांतपणे ऐकून घेत होता, व प्रभाकर त्याला सतत खुणा करत होता. पण त्याला तसल्या चिथावणीची गरजच नव्हती. तो आधीच तयार होऊन राहिला होता. तो म्हणाला, “पण सर, त्यांची माणसे फारच लांब लांब बोलतात. शेवटचे वाक्य ऐकल्यानंतर पहिले वाक्य काय होते हे ध्यानात राहत नाही.”

“ए चिलम्या, डझन भोपळ्या, एक सांगून ठेवतो, चांगले लक्षात ठेव.” थोडे फिरून येऊन मास्तर म्हणाले. त्यांच्याकडे दांडपट्टा असता तर त्यांनी या वेळी एक पलट देखील फिरवली असती. “हे बघ, गडकरी म्हणजे एक धबधबा आहे. तो आपल्याच जल्लोशात जाणार. तो लहान-मोठा करायला काही एखादा नळ नव्हे. तसले काही पाहिजे असले तर चौथ्या मजल्यावरील नळासमोर जाऊन बसा, आणि सद्गगदित होऊन घसा वाटेल तेवढा भरून आणा! त्यासाठी गिरसप्पाच्या धबधब्याकडे कशाला जाता शेण खायला?”