प्रसार माध्यमांचा कांगावा वि. हिंदुत्वाचे राजकारण - माझे अनुभव / मत

सर्वप्रथम सांगायचे म्हणजे, राजकाराणाशी आजपर्यंत माझा फारसा संबंध कधीच आला नाही. बातम्या वाचायच्या आणि 'आपल्याला त्याचे काय' हे म्हणायचे, हीच भूमिका कायम होती. पण सध्या गाजत असलेल्या 'गुजराथ २००२- एक सत्य' ह्या तेहेल्काच्या संशोधनाचा एक व्हिडिओ सहज बघितला. आणि त्यात इतकी भयानक आणि कीळसवाणी द्रुश्ये दाखवली होती, की माझ्या मनाची शांतीच नष्ट झाली. आज ४-५ दिवसांनी सुद्धा त्याचा परिणाम जात नाही. म्हणून हा लेखन प्रपंच.

एकूण राजकारणामध्ये विशेष रस कधीच निर्माण झाला नाही परंतु प्रसार माध्यमांचा खोटेपणा मात्र नजरेसमोर आलेला आहे.

१९९५ सालची गोष्ट आहे. त्या वेळी आमच्याकडे 'टाईम्स ऑफ इंडिया' हा पेपर येत असे. त्यावेळेस 'हम आपके हैं कौन!' हा चित्रपट एवढा गाजला होता परंतु 'टाईम्स' ने त्या चित्रपटाला मागे सारून 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्याच चित्रपटाला इतकी प्रसिद्धी दिली की काही विचरू नका. नंतर १९९९ मध्ये शाहरुख खानचा 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आला. ह्यावेळेस तर टाइम्स ने कमालच केली. इतकी प्रशंसा केली की मी भारावून गेले व धावत जाऊन हा चित्रपट बघितला. चित्रपट मला आवडला ही गोष्ट निराळी पण त्यांनी ज्या प्रकारे हा 'मुघल-ए-आजम' असल्याचा आव आणला होता तेवढा काही नक्कीच खास नव्हता. शाहरुखा खानला फाल्तू प्रसिद्धी देण्याचा प्रकार जो तेव्हापासून सुरू झाला तो आजपर्यंत 'ओम शांती ओम' सारख्या चित्रपटापर्यंत अविरतपणे चालू आहे. ह्या प्रकारामुळे प्रसार माध्यमांवरचा विश्वास खूपच कमी झाला व जनतेची दिशाभूल करण्याची त्यांची किमया लक्षात आली. तसेच अल्पसंख्याकांना उचलून धरण्याची त्यांची व्रुत्ती आहे असे ठामपणे वाटायला लागले.

तसेच त्यानंतर व्यक्तीगत जीवनात विविध कारणांमुळे श्रीराम, रामायण, सनातन धर्म ह्याविषयींचा आदर हळूहळू वाढतच गेला. त्याचा एक अनुभव असा -

२००३ साली माझ्या मुलीच्या जन्मासाठी मी माहेरी म्हणजे पुण्यात आले होते. डोहाळजेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर 'आता पुढे बाळाचा जन्म होइपर्यंत काय करायचे?' असे मी आईला विचारले तेव्हा 'आता रामायण वाचायचे' असे कडक उत्तर मिळाले. 'आता रामायण कुठून वाचायचे' असा मी विचार करत होते. तेव्हा काही दिवसातच 'गीतरामायण' नावाच्या १० कॅसेटसचा आमच्या घरात शोध लागला. आई-वडिलांना विचारताच 'गदिमा नावाचे मोठे कवी होऊन गेले, त्यांनी लिहिलेली ही गाणी' अशी माहिती मिळाली. मग नाहितरी बाळाच्या जन्मासाठी रामायण वाचणे चांगले असते असे म्हणतात, मग ही त्याऐवजी ही गाणी ऐकायला काय हरकत आहे असा विचार करून मी 'गीतरामायणाची' सुरुवात केली. आणि गाण्यांच्या सुंदर शब्दांची मोहिनी मनावर एवढी पडली की आजपर्यंत ३ दा तरी त्याची परायणे झाली. शिवाय प्रभू रामचंद्रांची वीर-नायकाची ( ऍक्शन हीरो ) जी प्रतिमा गदिमांनी दाखवली आहे ती खरोखरच सुंदर आहे. त्याचा दुसरा प्रभाव असा की प्रभू रामचंद्रांबद्दल एक विशेष असा आदर आणि प्रेम निर्माण झाले. व ते कायमस्वरूपी राहील...

ह्या पार्श्वभूमी मुळे, हिंदुत्ववादी पक्षांबद्दल एक नकळत आपुलकी वाटू लागली. त्या शिवाय पी. एन. ओक ह्यांचे हिंदुत्व-इस्लाम ह्या विषयांवरचे संशोधनात्मक लेख, बाळ ठाकरे, नरेंद्र मोदी ह्यासारख्या नेत्यांची ओघवती वक्त्रुत्वशैली, त्यांचा वीरव्रुत्तीचा बाणा, शिवाय मोदींना असलेला मोठ्या मोठ्या लोकांचा ( अंबानी, टाटा, सिद्धू, इ. ) पाठिंबा ह्या मुळे हिंदुत्ववादी पक्षांचीच बाजू बरोबर आहे का असा विचार आल्याशिवाय राहत नाही.

आणि जर तेहेलकाचे प्रतिपादन खरे असे असेल तर मनुष्यांची अशी अमानुष हत्या झालेली पाहून हृदयाला वेदना होतात. किंवा कदाचित अशी प्रक्षोभक प्रतिक्रिया सामान्यजनांकडून उकळण्याच्या हेतूनेच हे केले नसेल ना? असेही वाटते...

पण [float=place:top;]एक नक्की वाटते की प्रसार माध्यमांना अशी बीभत्स दृश्ये दाखविण्याचा काही अधिकार नाही. जे सांगायचे आहे, ते सभ्यपणे लोकांपुढे आणता येते.[/float] उदा. 'गांधी' ह्या इंग्लिश चित्रपटामध्ये फाळणीनंतर झालेले हत्याकांड नेमकेपणाने जगासमोर ठेवले आहे. चित्रपटांना जसे सेन्सोर चे नियम आहेत, मग न्यूज व्हिडिओ हे सुद्धा दृश्य माध्यमच आहे ना? तेच नियम ह्यालाही लागू नाहित क? किमान एखादी सूचना तरी द्यायलाच हवी.

त्यातून एक बदल नक्की झाला की मी तरी आता ह्यापुढे 'तेहेलका' असा फलक असलेला व्हिडिओ / फोटो शक्यतो परत कधी बघणार नाही.

आणि 'तेहेलका' पाहून झालेला मानसिक त्रास घालविण्यासाठी आता पुन्हा 'गीतरामायण' ऐकायचे ठरवले आहे...

श्रीरामाचा विजय असो!!