२५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!

कल्पवृक्ष ही माणसानी केलेली कल्पना मोठी मजेशीर आहे. कल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे, असा वृक्ष की ज्याच्या खाली बसल्यावर 'इच्छा आणि तृप्ती' यात वेळेचं अंतर शून्य होतं! इकडे इच्छा की तिकडे तृप्ती! या कल्पनेमागची मानसिकता महत्त्वाची आहे; इच्छा आणि तृप्ती यातला सेतू कर्म (किंवा काम) आहे आणि माणूस कामाला कंटाळला आहे! याचं  सुप्त कारण त्याहून मजेशीर आहे आणि ते म्हणजे काम हेच जीवनातल्या तणावाचं मुख्य कारण आहे! 

कुणीही वरून काहीही दाखवो जे लोक निगुतीनं काम करताना दिसतायत त्यांनी कामाची अपरिहार्यता जाणली आहे, कल्पवृक्षाची व्यर्थता जाणली आहे आणि त्यावर विचार करायचं सोडून देऊन स्वतःला कामाला जुंपून घेतलंय. ते 'जवाबदारी आणि लोकलज्जा' या दुहेरी पेचात अडकण्यापेक्षा काम हा पर्याय बरा मानून खाली मान घालून काम करतायत.

दुसरी एक अपवादात्मक गोष्ट सर्वांना आकर्षित करते ती म्हणजे काही लोक अत्यंत मनापासून स्वतःचं काम करताना दिसतात  पण या लोकांच्या बाबतीत दोन घटना घडलेल्या आहेत, एकतर ते त्यांचा नैसर्गिक कल असलेलं काम करतायत आणि दोन, त्यांच्या दृष्टीनं भविष्यकालीन परिणाम अत्यंत महत्त्वाचा आहे! म्हणजे 'मा फलेषु कदाचन' वगैरे काही नाही, फळ मिळणार याची त्यांना खात्री आहे आणि मजा म्हणजे हे लोक अपवादात्मक असल्यामुळे ते पुन्हा  नियमच सिद्ध करतायत!

जवळ जवळ प्रत्येकाला रोजच्या कामाच्या बाबतीत चुकून जरी काही वेगळा विचार आला तरी तो दडपून टाकावा लागतो. बहुदा, रिटायर झाल्यावर बघू, मुलांची लग्न झाल्यावर बघू, एवढं लोन फिटलं की झालं वगैरे सांगून स्वतःची समजूत काढावी लागते आणि कामावर  हजर व्हावं लागतं.

त्यातून आध्यात्मिक पर्याय बघावा तर तो 'निरीच्छा' असा स्वच्छ सांगितला जातो. आता इच्छा सोडली तर जीवनातली मजाच गेली हा प्रत्येकाचा अनुभव आहे. निसर्गदत्त महाराज तर म्हणतात की 'इच्छा हीच शक्ती आहे' आणि ते खरं आहे अगदी किरकोळ इच्छा सुद्धा लावून धरल्या शिवाय पूर्ण होत नाही.

आता इच्छा धरावी तर हा श्लोक!

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,

मा कर्मफलेहेतुर्भूर्मा ते संगोSत्स्वकर्मणी... २(४७)

म्हणजे इच्छा धरावी तर गीता मध्ये येते आणि सोडावी तर मन जुमानत नाही, सगळी मजाच संपते आणि हा पेच कधीमधी असता तर बरं, रोज सकाळी उठल्यावर येणारा प्रश्न!

पाश्चिमात्य देशात बघा, लोक व्यवस्थित कामं करतात आणि भरपूर मजा करतात आणि भारतात बघा माणसाचं मूल्यमापनच तो करत असलेल्या कामावर, त्याची सामाजिक प्रतिष्ठा तो काय करतो याच्यावर अवलंबून आणि जबरदस्त भ्रष्टाचार! याचा अर्थ तिकडचे लोक कर्मयोगी किंवा फलाकांक्षा रहित आहेत असं नाही तर त्यांच्या पर्यंत हा श्लोक पोहोचलेला नाही त्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम नाही! काम करू का नको, काम केलं तर फलाकांक्षा धरू का नको, धरू तर किती धरू, माझा स्वधर्म काय, कामाशी संलग्न होऊ का नको, त्यांना हे प्रश्न नाहीत म्हणून ते जमेल ते आणि झेपेल ते काम जोमानं आणि प्रमाणिकपणे करताना दिसतात आणि मजा म्हणजे त्यांच्या या समग्रतेमुळे ते करत असलेल्या कामाला (मग ते वाट्टेल ते असो) अनायासे प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते आणि भ्रष्टाचार आपल्या सारखा तरी बोकाळलेला दिसत नाही. 

आता यातून मार्ग काय आहे? तुम्ही इथ पर्यंत माझ्या बरोबर आला असाल तर पुढचा लेख.

संजय