कामथे काका (भाग २७ वा)

                                  काकांची रात्र श्रेयाच्या तापामुळे जागरणात गेली. त्यांना त्याचं काही वाटलं नाही. पण ते साधनाला मात्र फोन करू शकले नाहीत. बुधवार उजाडला. त्यांच्या मनात आलं, दरोड्याला फक्त दोन दिवस (की रात्री? ) बाकी आहेत, जणू लग्न दोन दिवसांवर आलंय. आज काय घडणार काय माहीत?   कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. काम दिलेलं होतं. सकाळी श्रेयाचा ताप उतरला. तिने काकांना पुन्हा धरून ठेवले. ती बागेत जाण्याचा हट्ट करू लागली. आता मात्र नीता वैतागली. "काही जायचं नाही बागेबिगेत. काल ताप कोणाला आला होता.? परत डॉक्टर काकांकडे जाऊन इंजक्शन कोणाला घ्यायचंय. " मग मात्र ती त्या भीतीने गप्प झाली. काल डॉक्टर म्हणालेच होते, " जर उद्या ताप उतरला नाही तर तिला हॉस्पिटलमध्ये  ऍडमिट करावं लागेल". पण तसं काही झालं नाही. काकांची एक काळजी तर नाहीशी झाली.   मग ते अकरा वाजेपर्यंत निघाले.  मुंब्र्याला जायचं म्हणजे सगळा दिवसच जाणार, आपल्याला साधनाकडे जायला कितपत जमणार आहे कोण जाणे . जाताना नीता म्हणाली, " जरा लवकरच या. हे पण आज जरा लवकर येतो म्हणालेत. खरंतर यांना कितपत जमेल कोण जाणे .. " ते जास्त वेळ रेंगाळले नाहीत , नाहीतर ती दुसरं काही कामं मागे लावायची. ते बाहेर पडले. गाडीत बसले आणि त्यांनी साधनाला फोन केला. आज यायला जमणार नसल्याचं त्यांनी तिला कळवलं. " मुंब्रा! " इथे आपण कधीच गेलो नाही, सगळीच मुसलमान वस्ती. त्यांच्या मनात आलं. तासाभराने ते मुंब्र्याला पोहोचले.  पत्ता विचित्र होता. : "मुंब्रा शीळफाटा. खडी सेंटर के पीछे. " हा काय पत्ता आहे? ते वैतागले. नावही बूढा चाचा.    पावसाळा असल्याने चिखलराड  जमली होती. त्यातून रस्ता काढीत ते निघाले. ते असेच करायचे एखादा विभाग सापडला की ते चालत  सुटायचे. कुठे तरी माग लागेल आणि अचानक सापडेल असा त्यांचा अंदाज असायचा. पण डोक्यावरचं ऊन आणि वातावरणातला ओलसरपणा यांनी ते घामाघूम झाले. मग त्यांच्या लक्षात आलं, आता विचारलं पाहिजे. म्हणून समोरच्याच एका हार्ड्वेअरच्या दुकानात शिरले. तिथे बसलेला लांडा दाढी कुरवाळीत म्हणाला, " कहिये चाचा, क्या दे दूं.? " मग त्यांनी विचारलं. " ये खडी सेंटर कितना दूर है? और कैसा जानेका? "......

त्यांना न्याहाळीत तो म्हणाला, " ये पता पूछनेवाले तुम दुसरे आदमी हो. अभी अभी एक जनको बताया मैने. पर आप जरा अलग दिखते हो. " 
काका काहीच बोलले नाहीत. इकडे तिकडे पाहून तो दबक्या आवाजात म्हणाला" क्यूं बूढा चाचासे मिलना है क्या? उसको मिलने सदियोंमे कभी कोई आता है. आप जैसे जंटलमॅनको उससे क्या काम पडा? "   काकांना कळेना बूढा चाचा हा असा काय माणूस आहे की ज्याच्याबद्दल हा माणूस खालच्या आवाजात बोलतोय आणि दुसरा माणूस कोण? ज्याने हा पत्ता विचारला.   त्याने काकांना रस्ता दाखवला. सरळ डोंगरावर जायचं पार खडी तयार करण्याचा ड्रम लागे पर्यंत आणि तिथे विचारायचं. आत्ता कुठे त्यांना त्या पत्याचा अर्थ लागला. बचक बचक असा चिखलात आवाज करीत ते निघाले. पंधरा वीस मिनिटं चालल्यावर एका डोंगराच्या पायथ्याशी ते आले. तिथे मनुष्य वस्ती अशी नव्हतीच. मग मात्र त्यांना सुरुंगाच्या स्फोटाचे आवाज आले. काही माणसे ते काम डोंगर माथ्यावर करण्यात गुंतली होती. तर काही माणसे खडी तयार करण्याच्या यंत्राजवळ काम करीत होती. म्हणजे ही दगडाची खाण होती तर. एका पायवाटे वरून जाताना त्यांना एक रंगवलेली पाटी दिसली. त्यावर खडी पाडणाऱ्या कंत्राटदाराचे नाव लिहिलेले आढळले. " मोहम्म्द इम्रान झैनुद्दिन खान " असं होतं. खाली एक लाल रंगातील सूचनावजा ताकीद पण  लिहिलेली आढळली. "ये रास्ता आम आदमीके लिये बंद है. ब्लास्टिंग होती है. जानको खतरा.  जख्म होनेपर कॉंट्रॅक्टर जिम्मा नही लेंगा. " तिथे दोन हाडकं आणि कवटी पण रंगवलेली होती. तरीही ते पुढे गेले. दोन चार मिनिटं चालल्यावर कोणीतरी ओरडले, "ए, कौन जा राहा है? बोर्ड पढा नही क्या? " तो एक ब्लास्टिंग करणारा कामगार होता. मग काका त्याच्या जवळ जात म्हणाले, " मुझे बूढा चाचासे मिलना है. " त्याने त्यांच्याकडे आपादमस्तक पाहिले. आणि डाव्या हाताने त्याने रस्ता दाखवला. "वहां उधर बोगदा है, उधरीच है. " तो निघून गेला. आता खडीच्या ड्रमचा मोठा "रगड, दगड, रगड दगड " हे शब्द उच्चारताना जो आवाज होतो तसा आवाज येत होता. मध्येच सुरूंगाच्या स्फोटाचे आवाज येत होते. जवळ जवळ साडे बारा  वाजत होते. ऊन भाजून काढीत होते. एकही झाड नसलेला तो भाग काकांना लवकरच आवडेनासा झाला. जी झाडं होती ती पण निष्पर्ण. कदाचित पावसाळ्यात त्यांना पालवी फुटत असावी.  
                                                  ते चढत चढत पाय वाटेने पुढे निघाले. खडीच्या ड्रमच्या डाव्या बाजूने वळले. वरती थोड्या अंतरावर डोंगरावर एक काळसर गुहे सारखा भाग त्यांना दिसला. लांबून उंच दिसणारा डोंगर अजून बराच उंच होता. उंचीवर आल्याने म्हणा, किंवा काहीही म्हणा
त्यांना वारा वाहत असल्याची जाणीव झाली. पण गरम वारा.... त्यांच्या अचानक डोक्यात आलं, आपल्या आधी कोण आलं असावं. त्यांनी आठवून पाहिलं. सूर्या? स्वतः दादा? की अकडा? की आणखीन कोणी? त्यांचा संशय विरेना. पण ते चालत असलेल्या खालच्या अंगाने काण्या चालत होता. ज्याला सूर्याने त्यांच्या पाळतीवर ठेवलं होतं. आता ते दमले होते. त्यांना तहान पण लागली होती. खडीचे आवाज थोडे विरळ 
झाले होते. त्यांना आता बोगद्यासारखा दिसणारा भाग दिसला. तो बोगदा नव्हताच. नैसर्गिक रित्या तयार झालेला खिंडीसारखा भाग होता. त्यालाच लोक बोगदा म्हणत असावेत. आणखी दहापंधरा मिनिटात ते खालून न दिसणाऱ्या पण एका मध्यम आकाराच्या झोपड्यापुढे उभे राहिले. झोपड्याला दरवाजा असा दिसला नाही. बाहेरच्या ओटीसारख्या भागात एक मुसलमान म्हातारा दात कोरीत बसला होता. त्याचं जेवण झालं असावं किंवा सारखं दातात काहीतरी अडकत असावं. अंगावर निळ्या रंगावर निळ्याच रंगाच्या उभ्या रेघा असलेला एक दोन ठिकाणी उसवलेला शर्ट आणि त्याच रंगाची किंवा मूळ रंग हरवत चाललेली लुंगी त्याने गुंडाळली होती. बाजूला विड्यांचं बंडल पडलं होतं.  
भुंवया कानाकडे उंचावलेल्या उभट नाकाच्या ब्रिजवर जुळलेल्या होत्या. थोड्या पांढऱ्या होत्या. खालचे अनुभवी तपकिरी रंगाचे लपवाछपवीत तज्ञ असलेले डोळे काडीवर आलेल्या दातातील घाणीकडे बघत होते. जिवणी बरीचशी आत वळलेली आणि सुरकुत्यांच्या डिझाइनमध्ये लपलेली होती तिथल्या लहानश्या चौथऱ्यावर पडलेल्या काकांच्या सावली मुळे म्हाताऱ्याने वर पाहिले. आपल्या वृद्ध डोळ्यांनी समोरच्या काकांना अजमावीत त्याने "आइये, तश्रीफ रखीये. म्हणून तिथेच पडलेल्या जुनाट खुर्चीकडे बसण्यासाठी बोट दाखवले. काका बसले. मग म्हाताऱ्याने आत तोंड वळवून म्हंटले, " अरे झीनत बेटी, जरा पानी ले आना और परदा करना. " आतल्या दरवाज्याच्या पडद्या आडून एक बालिश हात जर्मन सिल्व्हरचा पेला धरून पुढे आला. चाचाने तो घेऊन काकांच्या हाती दिला व म्हणाला, " मेरी नातीन, है गांवसे आयी है.
लीजिये. "......... पाण्याची गरज त्यांना होतीच. ती जास्त असणार हे जाणून त्याने परत आतून पाणी मागवले. ते पिऊन काका म्हणाले, " मुझे दादाने भेजा है. " म्हाताऱ्याने तर्जनी आणि अंगठा एकमेकावर चोळीत विचारले, " कुछ दिया है? "    ....... काका समजले. खिशात हात घालून त्यांनी दोन लाख रुपये असलेले पाकीट काढून त्याच्या हातावर ठेवले. बुढ्ढ्याचे डोळे लकाकले. जमेल तेवढे गोड हसून म्हणाला, " कहने की जरूरत नही. सब मालूम है मुझे. इंतजाम हो जायेगा. आप सिर्फ कभी चाहिये वो बता दीजिये. बाहेर काण्या, काका कुठे गेल्येत हे पाहून परतीच्या रस्त्याला लागला सुद्धा. त्याचं काम एवढंच होतं की ते कुठे जातात, हे पाहणं. निदान सध्यातरी त्याला असच सांगण्यात आलेलं होतं. बुढा चाचा केवळ जबाबी माणूस होता. तो सवाल करीत नसे. फक्त जबाब देत असे. मग तो म्हणाला, " आप इतने दूरसे आये है, खाना खाके जाईये. जलदीही तयार होगा. " पण काकांना या लोकांकडे जेवण्याची संवय नव्हती. त्यांचे आढेवेढे पाहून तो म्हणाला, "शायद आप हमारे साथ खाना नही चाहते. कोई बात नही. " मग काकांनी त्याला त्यांना रविवार पासून खोली हवी असल्याचे सांगितले. "आप बेफिकर रहिये, लेकीन चाय तो पिते जाईये. " त्याने आत चहा करण्यास सांगितले. आता तरी आतल्या मुलीचं दर्शन होईल असं त्यांना वाटलं पण परत चहाही तसाच दिला गेला. मग काका उठले. त्याने सलाम केला. आता खाली जाताना ऊन पाठीवर पडणार असल्याने त्यांना बरं वाटलं. त्यांनी विचार केला, मगाशी चेहरा भाजून निघाला, आता पाठ. असो. त्यांनी उतरताना काळजी घेण्याचं ठरवलं. त्यांच्या अनुभवानुसार डोंगर चढायला सोपा पण उतरायला कठीण. केव्हा पाय सरकेल, नेम नाही. परतताना ते लवकरच स्टेशनला पोहोचले. मगाचची उघडी दुकानं आता बंद झाली होती.  
                              इकडे काण्याने सूर्याला फोन करून तपशीलवार माहिती दिली. सूर्याला संबंध लागेना. काका आणि मुंब्र्याला? कशाला?....
तो विचार करीत राहिला. त्याला समजेना. मग त्याने गुड्डीकडे जायचे ठरवले. परंतू दादाने आत बोलावल्याने त्याने सध्या ते रहित केलं.  
                  *********                     ********           ********         ********         ********         ********       ********         ********         **********
                           
                              कॉन्स्टे. सावंत   स्टेशनला पोहोचला तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत होते. तो बराचसा भिजला होता. त्याच सुमारास एसीपी खंडागळेना कमिशनर ऑफिसमधून त्यांच्या पीएचा फोन आला. त्यांना कमिशनर साहेबांनी भेटायला बोलावलं होतं. एरव्ही कडक शिस्तीने वागणाऱ्या खंडागळेना जरा आश्चर्य आणि थोडी भीती वाटली. तरीही ते स्वतःवर ताबा ठेवीत महत्त्वाच्या प्रकरणांचा अद्ययावत तपशील घेऊन व काही सांख्यिकी विवरण पत्रं ( म्हणजे गुन्ह्यांची एकूण संख्या, तपास पूर्ण झालेली प्रकरणे, तपासांतर्गत असलेली प्रकरणे वगैरे ) घेऊन निघाले. तसे ते व्यवस्थित होतेच. त्यांना कोणत्याही मीटिंगच  किंवा वरिष्ठांच्या  भेटीचं टेन्शन येत नसे आणि ते असल्या गोष्टींमध्ये यशस्वी होत. त्यामुळे असल्या बाबतीत त्यांच्या सल्ल्यानुसार बरेच अधिकारी वागत असत. असेच ते आत्ता आत्मविश्वासाने निघाले होते. पण  आज  मन कुठेतरी त्यांना चावत होते. कारण अचानक फोन करून बोलवून घेणं. ते गाडीत बसले. आणि सीपी ऑफिसकडे निघाले.  ते आल्याची वर्दी कमिशनर साहेबांना दिली गेली. एक दोन सेकंदात ते केबिन मध्ये प्रवेशले. कडक सलाम ठोकीत ते योग्य अंतर ठेवून उभे राहिले. कमिशनर साहेब जितके ऊग्र असायला हवेत तितकेच ऊग्र होते. पण त्यांचंही मत खंडागळेंबाबत बरं होतं. सहजासहजी ते कोणालाही चांगलं म्हणत नसत. त्यांनी बरं आहे, असं म्हंटलं की ती कारवाई चांगली झालेली आहे असं समजावं.  खाली मान घातलेल्या साहेबांनी मान वर केली. आणि बसण्याची खूण केली. खंडागळेंनी महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती आणलीच असेल, याची त्यांना कल्पना होतीच. पण त्यांनी त्याबाबत काहीही विचारणा न करता त्यांना मिसिंगच्या तक्रारींबाबत विचारलं. नेमकी तेवढीच माहिती खंडागळेंकडे रिक्त होती. म्हणजे अशा तक्रारी निकालात काढलेल्या होत्या. म्हणून खंडागळे म्हणाले, " सध्या तरी आमच्याकडे एकही मिसिंगची तक्रार प्रलंबित नाही सर. " त्यांच्याकडे न पाहता साहेबांनी बाजूचा खण उघडला. एक पाकीट पुढे केले. म्हणाले, " मग हे काय आहे?   वाचा"... पाकिटातून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडून आलेलं पत्र होतं आणि त्याला जोडलेली मिसिंगची तक्रार होती. ते पाहून खंडागळे साहेबांना धक्काच बसला. त्यांच्या कार्यालयाकडून मिसिंगची तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार होती. ते पत्र होतं. साठे मामांचं. त्यात परत शेवटी सदर प्रकरणी काही कारवाई न झाल्यास ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याची धमकीपण दिली होती.  साठे मामा त्यांना भेटलेच नसल्याने ते याबाबत अनभिज्ञ होते. मग त्यांना आश्चर्या बरोबर राग येत गेला. म्हणजे हे साठे मामा आपण सोडून कोणाला भेटले आणि त्यांना कोणी पिटाळले हे त्यांना कळेना. खंडागळेंचा चेहरा वाचीत साहेब म्हणाले, " काय?  कसं वाटतंय? अशी कामं करता का? एका ज्येष्ठ नागरिकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याची ती तक्रार आहे, यावर तुम्हाला काय म्हणायचंय? " त्यांच्या आवाजाला धार होती....... खंडागळे निः शब्द झाले. ते पाहून साहेब पुढे म्हणाले, " मला दोन दिवसात अहवाल हवाय तुमचा, तोही कारवाईसहित. "...... खंडागळेंना हलका घाम येत असल्याची जाणीव झाली. बाहेर पावसाला ऊत आला होता.  बोलणं पूर्ण  झालं असलं तरी  उठताही येत नव्हतं. ते शिस्तीला धरून झालं नसतं. त्यांच्याकडे न पाहता साहेब म्हणाले, " यू मे गो नाऊ. " मग खंडागळे उठले. शिरस्त्या प्रमाणे सलाम ठोकला आणि केबिन बाहेर आले. प्रथम त्यांनी खिशातला रुमाल काढून  घाम पुसला.  ते पीएच्या समोर जरा वेळ बसले. ते रिकामे झाल्यावर म्हणाले, " टेक केअर, संधी साधून मी बोलीन साहेबांशी. काळजी करू नका पण अहवाल लवकर येऊ द्या. " चहा पाणी इकडच्या तिकडच्या बातम्या झाल्यावर खंडागळे  जायला निघाले. तेव्हा पीए साहेब म्हणाले, " प्रमोशनला ड्यू आहात, सांभाळून राहा " असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी दिला.  
                                     सणसणत्या डोक्याने खंडागळे आपल्या ऑफिसमध्ये परत आले. आल्या आल्या त्यांनी सगळ्याच हाताखालच्या अधिकाऱ्यांची मीटिंग बोलावली. त्यात त्यांना साहेबांनी दिलेलं पत्र सगळ्यांकडे दिले. तेव्हा इन्स्पे. श्रीकांत चांगलेच घाबरले. उरलेल्या अधिकाऱ्यांना जायला सांगून त्यांनी इन्स्पे‌. श्रीकांतची खबर घेतली. शेवटी ते म्हणाले, " तुम्हाला काय वाटलं? मी तुम्हाला भविष्याचा सल्ला देण्यासाठी घरी बोलावलं याचा अर्थ तुम्हाला कामांमधून सूट मिळाली? "   श्रीकांत काहीच बोलले नाहीत. मग खंडागळे म्हणाले, " मी तुम्हाला या प्रकरणाबद्दल कारणे दाखवा नोटीस देऊ शकतो, पण तसं न करता तुम्हाला या तीन दिवसांच्या अवधीत कारवाई करायला सांगतोय. मला शुक्रवारी तुमचा अहवाल पाहिजे. तो नुसता मोघम नको तर योग्य कारवाई करून प्रकरण निकालात काढल्याचा पाहिजे. निघा आता. " श्रीकांत आपल्या जागेवर आले. त्यांना काहीही सुचत नव्हते. हे काय होऊन बसलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यांनी सकाळी साठेमामांना भेटण्याचं
ठरवलं. आणि सावंतला हाक मारली. सावंत जणू काही वाटच बघत होता. रात्रीचे आठ वाजत होते. तरीही न कंटाळता तो श्रीकांत सरांकडे आला. त्याने सगळीच माहिती त्यांना तपशीलवार दिली. त्यावर ते म्हणाले, " सूर्याच्या ऑफिसवर नजर ठेव. नक्कीच लवकरच काहीतरी घडेल. आणि हो, उद्या आपण साठे मामांना भेटायला जाणार आहोत त्या म्हातारीची जागाही पाहून येऊ. "   सावंतची थोडी निराशा झाली. त्याला वाटलं साहेब परत त्याचं कौतुक करतील. त्याने पण आता काहीतरी अशी माहिती घेऊन येतो की जिचा चांगलाच उपयोग होईल, असं ठरवून तो बाहेर गेला.  


    ********           ***********         ***********         ************         ***********         ***********       **********     ***********     ***********
                                                      
                          काका आज  साधनाकडे न जाता सरळ घरी गेले. दुपारचे तीन  वाजत होते. इथेही त्यांचा पाठलाग काण्याने केला, कारण त्याला ते कुठे कुठे जातात हे कळवायचं होतं. त्यांच्या लवकर येण्याने नीताला जरा बरं वाटलं. अजून तरी श्रेयाला ताप आलेला नव्हता. आत्ता 
मात्र त्यांनी श्रेया करता कॅडबरी आणली होती. आल्या आल्या ते आत जाऊन श्रेयाला भेटले, आणि त्यांनी तिला चॉकलेट दिले. ती फारच खूश झाली. मग नीता म्हणाली, " बरं झालं आलात, हे अजून आलेले नाहीत. काय माहीत येतात की नाही? " पाच वाजल्यापासून  अचानक पावसाला सुरुवात झाली. दोन तीन तास चांगलाच पाऊस पडला.पावसामुळे चांगल्या आणि सरळ कामांची पंचाईत होते, पण वाईट कामांसाठी तो फायदेशीर असतो. लपून छपून करण्याची कामं चांगली होतात. याचा फायदा घेऊनच तर काण्या काकांच्या मागे लागायचा. तो सूर्याकडे गेला, तेव्हा दादा आणि सूर्या  केबिन मध्ये बसले असल्याने तो त्याला  भेटू शकला नाही. खरंतर आत्ता तसं त्याच्या जवळ सांगण्यासारखं काही नव्हतं. पण त्याला सूर्याकडून पैसे घ्यायचे होते. आजचं केलेलं कामही तसंच होतं. सूर्याचं लक्ष फारसं नाही असं पाहून दादा म्हणाला, " आज तेरा ध्यान नही है. कुछ खबर आनेवाली है क्या? " त्याने मानेनेच नाही म्हंटले. कारण आजच त्याला बूढा चाचा आणि काका यांच्या भेटीबद्दल बोलायचे नव्हते. त्याला पुढे काय होणार ते पाहायचं होतं. आजकाल दादाचं लक्ष एकूणच टोळीकडे कमी होतं असं त्याला वाटत होतं. टोळीची सूत्रं आपल्या हातात आली तर बरं होईल. असा विचार त्याच्या मनात इतक्या वर्षात प्रथमच आला. काहीतरी सोय केली पाहिजे. दादाचा काहीतरी वेगळा प्लान असला पाहिजे. आता काण्याला दादाच्या मागे लावावा म्हणजे बरं. दादाला झापणारा कोण आहे? त्या दिवशी मीटिंगमध्ये कोणाचा तरी फोन आला होता. हा पंधरा नंबरचा लॉकर दादाच का उघडणार आहे? कोणी सुटून येणार आहे की बाहेरून कोणी महत्त्वाचा माणूस येतोय. नक्कीच एकटया काकावर पाळत ठेवण्यापेक्षा दादावरची ठेवावी, हे बरं. असा विचार करून तो केबिन बाहेर पडणार तोच दादाला फोन आला. आवाज ऐकून दादाने सूर्याला बसण्याची खूण केली. तो दिवाणजींचा फोन होता. प्रिन्स साहेबांचे दिवाणजी खरंतर पेश्तूच्या रोजच्या मागण्यांना कंटाळले होते. कधी एकदा काय व्हायचा तो विधी होऊन गेला की पेश्तू नावाची भुमका बाहेर काढता येईल. प्रिन्स साहेबांना त्यांनी खूप समजावून सांगितलं होतं पण ते पुत्रप्राप्तीच्या नशेने पछाडलेले असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही...... "दादाजी सर, थोडी हिम्मत करके पूछता हूं, हमारे काम का क्या हुवा? कहां तक आया है? आप बूरा नही मानना. पेश्तू साबको आके अब दो महिना हो गया (नक्की किती महिने झाले हे त्यांना लक्षात नव्हतं) आप व्यस्त हो तो बादमे.... " त्यांनी वाक्य अर्धवट सोडले. त्याबरोबर दादा म्हणाला, " देखिये पैसा परसू पहुंचा दो, आपका काम सोमवार को पक्का हो जायेगा. लेकीन पहले दाम बादमे काम, ये ध्यानमे रखना. " आणि त्याने फोन बंद केला. मग सूर्याशी बोलण्या आधी त्याने हे काम ज्याला सांगितलं होतं त्याला फक्त मिस कॉल दिला. सूर्याला म्हणाला, " परसू दिवाणजी पैसा दे देंगे, मेरा मतलब है दो करोड. काम तो सोमवार तक हो जायेगा. " सूर्याला जरा बरं वाटलं. तो म्हणाला, " लेकीन दादा इस बार काकाजीको इसमे मत लेना. " त्यावर दादा त्याची कीव करीत म्हणाला, " तुम समझोगे नही, देख पाप हमेशा बाटना चाहिये". म्हणजे तो पाप करीत होता हे त्याला मान्य होतं. त्यावर सूर्या फक्त मनात म्हणाला तेरेकोही मालूम, मै तो ये बैंकके कामके बाद तेरेको उडा दूंगा. तो बाहेर पडला. रस्त्यावर आल्यावर त्याला भेटलेल्या काण्याने त्या दिवसाची माहिती दिली. आणि पैशांसाठी हात पसरला. मग ते दोघे समोरच्या फुटपाथावरच हॉटेल मध्ये गेले. तिथे सूर्याने त्याला पैसे दिले आणि दादावर लक्ष ठेवण्यास आणि त्याच्या हालचालींची माहिती देण्यास सांगितले........ ते ऐकल्यावर मात्र काण्या घाबरला. "ये मुझसे नही होगा. डायरेक दादापर नजर रखनेका. "..... ‌ सूर्या मग म्हणाला, " ठीक है तू अब काकाजीपर कभी कभी नजर रखना, लेकीन दादा पर हमेशा रखना "   नंतर प्रथम काण्या हॉटेलच्या मागच्या दरवाज्याने बाहेर पडला. सूर्या मात्र पुढूनच बाहेर पडला. त्याला जायचं होतं गुड्डीकडे.  
                                            रात्रीचे साडेआठ होऊन गेले होते. साध्या कपड्यातला सावंत सूर्याच्या ऑफिसच्या  समोरच्या फुटपाथवरच उभा होता.   त्याला कल्पना नव्हती आल्यापासून दहा पंधरा मिनिटांच्या आतच सूर्या ऑफिसातून बाहेर पडेल.  कुणा जेमतेम पाच फुटी माणसाबरोबर सावंत उभा असलेल्या  फुटपाथवरच्या हॉटेलात गेलेला त्याने पाहिला.  हॉटेलचे नाव पाहिले, "कॅफे रश्मीन ". तो बुटका त्याला बिलकुल आवडला नाही. अशी बुटकी माणसं लबाड असतात, असं त्याचं स्वतःचं मत होतं. त्याचा मेव्हणाही असाच बुटका होता. त्यामुळे त्याची सारखी भांडणं होत असत. असो. जवळ जवळ अर्धातास गेला. मग सूर्या  एकटाच बाहेर आलेला दिसला. बुटका कुठे गेला कुणास ठाऊक. पण सूर्यावर लक्ष केंद्रित करणं भाग होतं. आता सूर्या पुन्हा ऑफिसजवळ आला. कालच्याच गाडीत तो बसला. आणि गाडी निघाली. आज मात्र त्याने पटकन टॅक्सी पकडली. ड्रायव्हरने त्याला ओळखून विचारले, " क्या साब पीछा करना है क्या? आप डरना नही, आप चाहे तो हम रुकेंगे आप के लिये, हमे ऐसा काम बहोत अच्छा लगता है. आखिर देशकी सेवा है.  क्या बोलते है? " बोलणारा सरदार होता.  प्रतिसादासाठी त्याने सावंत कडे पाहिले. सावंत म्हणाला, " जितना बोला है वही करना. "   सूर्याची गाडी फॉकलंडरोड नाक्याकडे गेली आणि हॉटेल डिलाइट जवळ थांबली. हे पाहिल्यावर सावंतने टॅक्सी सोडली. भाड्याबरोबर ड्रायव्हरला निराशाही मिळाली. सावकाश चालत सूर्या हलता दरवाजा ढकलून आत शिरला. आत जाऊन एखाद पेग मारायला हरकत नव्हती. पण सूर्या कुठे गेला हे शोधणं एवढं सोपं नव्हतं. म्हणून त्याने नाद सोडला. नंतर केव्हातरी दुसऱ्या कारणाने आतला भाग बघता येईल. आज बरं काम झालंय. त्या दिवशी पण ज्या कुणाला आणलं त्याला इथेच आणलं असणार. ज्याला आणलं तो कोण असावा? त्याने डोकं हलवून पाहिलं, पण त्याला कोणी आठवेना. किशा दादा तर नाही? त्याच्या मनात आलं. का तो म्हातारा ? (म्हणजे काका ), काका ती बाई जिची बांगडी मिळाली होती? खूप प्रयत्न करून पाहिला. पण सावंतला सुचेना. श्रीकांत सरांना नक्कीच सुचेल, नाहीतर त्यांनी सूर्यावर नजर ठेवायला कशाला सांगितलं असतं.? सबंध सेवेमध्ये श्रीकांतसरांनीच कौतुक केलं होतं. म्हणून तर तो मनापासून काम करीत होता. एका कौतुकाचा केवढा परिणाम होतो. असो. पण तो जर धोका पत्करून आत गेला असता तर त्याला फार महत्त्वाचं असं आज काहीतरी हाती लागलं असतं.  
                                        आत शिरलेला सूर्या तडक गुड्डीच्या केबिन मध्ये शिरला. तुकतुकीत चेहऱ्याचा गुड्डी अचानक आलेल्या सूर्यामुळे दचकला. तो कॉंप्युटरमध्ये अश्लील सीडी बघत होता. सूर्या त्याची लगबग पाहून म्हणाला, " किधर है श्रीपत? चल मेरे साथ, मै देखना चाहता
हूं. "  .... खरंतर गुड्डीला आत्ता श्रीपतकडे जायचं नव्हतं. त्याला एकदम आठवलं की श्रीपतच्या खोलीला कुलूप घातलेलं नाही. त्याला आज दुपारी जेवण त्याने पाठवलं होतं. पण तो जेवणारच या खात्री मुळे तो बघायला गेला नाही. आज रात्री जाऊच असा विचार करून तो हॉटेलचा धंदा बघत राहिला, आणि त्यात विसरला. नाहीतरी श्रीपत बरोबर आता यारी झालीच आहे मग धंद्याचंही ठरवू. तसा तो वाईट नाही हे त्याला जाणवले होते. पण अचानक सूर्या येईल आणि जावं लागेल असं मात्र त्याला वाटलं नव्हतं. आता काही उपाय नाही असं पाहून तो उठला उगाचच कोणतीतरी किल्ली घेत तो सूर्यामागे निघाला. ते बाजूच्या दोन तीन रूम सोडून अगदी एका कोपऱ्यात असलेल्या वाकड्या तिकड्या बांधलेल्या रुमकडे गेला. दरवाजा सताड उघडा होता. तो पाहून सूर्या भडकून म्हणाला, " लगता है  दादाकी ऑर्डर की कोई पर्वा नही है तुम्हे"
असे म्हणून सूर्याने पिस्तूल काढले. आतल्या बेडवर श्रीपत होता. त्याला पाहून गुड्डीचा जीव भांड्यात पडला. पण दुपारचं जेवण मात्र तसंच होतं. त्यांनी लाइट लावला. दिव्याच्या प्रकाशात सूर्याने बेडवरच्या श्रीपतकडे पाहिलं. मागून गुड्डी म्हणाला, " गल्ती हो गयी लेकीन वो भागा नही. " 
सूर्याला  वेगळीच शंका आली.   श्रीपतचे डोळे आढ्याकडे पाहत स्थिर झालेले दिसत होते. हात पाय ताठ झालेले होते. छळामुळे झालेल्या यातना आणि जखमेने निर्माण केले विष सबंध शरीराभर पसरलेले असावे. हात पूर्ण काळा निळा आणि सुजलेला होता. ठिकठिकाणी भुयारातल्या उंदरांनी कुरतडलेल्या जखमा दिसत होत्या. ते पाहून सूर्या म्हणाला, "अबे बेवकूफ वो भागा नही,  उड गया है. अब इसका जिम्म कौन लेंगा?
इसको ठिकाने कौन लगाएगा? दादाको क्या बोलेंगे? "     ते दोघे बराच वेळ तसेच उभे राहिले.                                                                


                                                                                                                                                          (क्र म शः)