ह्यासोबत
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा!
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#१०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#११)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१७)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१८)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१९)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२०)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२१)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२२)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२३)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२४)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२५)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६)
- हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२७)... अंतिम
॥ श्रीसद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # ७.
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तासी ॥
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटी पूर्ण एक नांदे ॥
पाठभेदः त्या कैचा दयाळ= त्या कैसेनि गोपाळ
आपण व्यावहारिक, सामान्य माणसे ! आपली पापपुण्याची समज आणि कल्पना ही सामान्य, व्यावहारिक असते. पण संतांची आणि ज्ञानियांची आध्यात्मिक अथवा पारमार्थिक पाप-पुण्याची समज अतिशय वेगळी आहे. "पुण्य ते स्मरण । पाप ते विस्मरण" असे एका अभंगात स्पष्टच लिहिले आहे. "मी"तत्वतः व वस्तुतः शुद्ध चैतन्यस्वरुप असता "मी"स्वतःचा संकोच करून स्वतःला देहाइतकेच मानणे, देहाच्या अपेक्षेतच स्वतःची ओळख करून देणे म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या फार मोठे पातक होय! तर आपल्या स्वस्वरूपाची ओळख ठेवून अखंड स्वरुपी राहणे म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या पुण्यच! स्वस्वरूपाच्या विसरामुळे दृश्य जगतालाच सत्य मानून आपले व्यवहार चाललेले असतात. स्वरूपाचा विसर, म्हणजे भक्तीच्या भाषेत भगवंताचा विसर, हे पाप मानले तर मग त्या विसरात आणि कर्तेपणाच्या अभिमानातून जे काही केले जाईल त्यातून पापाचे डोंगरच उभे राहणार ना ? हे पापच आपल्या प्रपंचाचे मूळ आहे. म्हणूनच प्रपंच हा दुःखरूप झाला आहे. असे पाप म्हणजेच संस्कार वज्रलेप होवून अभक्तांना चिकटतात. ते संस्कार इतके घट्ट असतात की सामान्य उपायांनी ते क्षीण होवून नष्ट होणारच नाहीत. त्यासाठी भगवंताचे स्मरण म्हणजेच नामस्मरणाचे पुण्य करावे लागते. नामाची कास धरली म्हणजे पुण्यसंचय होऊन भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागी होऊन पाप क्षीण होतात. प्रेमाने त्याचा आठव करणे व आवडीने त्याच्या नामाचे संकीर्तन करणे, सर्व कर्मांचा कर्ता हरीच आहे असा भाव दृढ असणे याचे नाव भक्ती. या भक्तीनेच भगवत्कृपा होऊन साधकाची देहबुद्धीच्या महापातकापासून मुक्तता होते.
"नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥"
याच्याउलट जे या भक्तिमार्गाने जात नाहीत ते अभक्त. भगवंताला विसरून इंद्रियसुखात रमलेला माणूस(अभक्त) मनाने भगवंतापासून दूर जातो.हरिची भक्ती न करणारे व त्याच्या भजनाला विन्मुख असणारे हे अभक्त खरोखरीच पतित व दैवहत होत. कारण दिव्य भगवंताचे विलक्षण सुख भोगण्याचे सामर्थ्य आणि संधी फक्त मनुष्ययोनीतच आहे. असा दुर्लभ देह लाभूनही तो (अभक्त) विषयसुखात रमतो आणि दिव्य सुखापासून वंचित राहतो. कर्तेपणाच्या अभिमानातून विषयसुखासाठी तो (अभक्त) निसर्गव्यवस्थेला बाधा आणतो आणि अंतिमता दुःखच निर्माण करतो.
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ॥
इंद्रियांना दिसणारे जगच सर्वस्वी खरे आहे असे अभक्त मानतात आणि त्यातच रमतात. सारासार विचार न करणारी ही मंडळी आपल्या वागण्याचे समर्थन करतात. देवाचे नाम मात्र चुकूनही वाचेने घेत नाहीत. उलट नामस्मरण व ईश्वरभक्ती करणाऱ्यांची वाटेल तशी निंदा, कुटाळकी करतात. भक्तांना देव दयाळू आहे खरा. पण अशा भ्रमाने बरळणाऱ्या बहिर्मुख लोकांना तो कसा पावणार? दृश्याच्या पलीकडे ज्यांची ज्ञानदृष्टी जाऊच शकत नाही त्यांना भगवंताबद्दलचे अनुभव थोतांड वाटतात.
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटी पूर्ण एक नांदे ॥
श्री.ज्ञानदेव आत्मज्ञानाचा आधार / प्रमाण देऊन सांगतात की भगवंत आत्मस्वरूप आहे.तोच एक पूर्ण आहे. सर्व दृश्य चराचरामध्ये तोच एक पूर्णत्वाने नांदत आहे. संतांचाही हाच अनुभव आहे.तुकाराम महाराज म्हणतात,"अणुरेणू हा थोकडा । तुका आकाशाएवढा ॥" तर गजाननविजय मध्ये प्रथम अध्यायात लिहिले आहे,
"अवघे चराचर । ब्रह्मे व्याप्त साचार।"(१३९ अध्याय १)
संतांचा हा अनुभव "असोनि संसारी" घेण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. म्हणूनच ज्ञानदेव उपदेश करतात...
"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥"
"॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"