या प्रश्नांची उत्तरे कोण देईल? विज्ञान की अध्यात्म

या प्रश्नांची उत्तरे कोण देईल? विज्ञान की अध्यात्म?

देव या संकल्पनेबद्दल विचार करताना मी निसर्गाकडे पाहतो आणि विविध प्रश्न मला कोड्यात टाकतात.
पहिला म्हणजे हे अति अति प्रचंड विश्व तयारच कसे झाले? त्यासाठी महास्फोटादि (Big Bang Theory ) सिद्धांत जरी असले तरी शेवटी प्रश्न उरतोच की ती पहिली वस्तु किंवा परम अणु कसा तयार झाला? त्यात एवढे वस्तुमान ठासून भरले होते? त्याचा स्फोट होऊन विश्वाची व त्याबरोबर कालाची सुरूवात झाली. त्यातून अब्जावधी तारे, आकाशगंगा तयार झाल्या.होत आहेत.मग आपल्याला ज्ञात असलेली जीवसृष्टी पृथ्वीवर तयार झाली. ती कशी? निव्वळ अपघाताने की पुन्हा रसायनशास्त्रातील एखाद्या नियमातून? ड्रेक समीकरणानुसार पृथ्वीसदृष्य कोणत्याही ग्रहावर अशी जीवसृष्टी असेल का? या विश्वात आपण एकमेव सजीव आहोत की अशा अगणित जीवसृष्टी विखुरल्या आहेत , काहीच कळायला मार्ग नाही , जोपर्यंत किमान एक तरी परग्रहावरील जीवसृष्टी मिळत नाही, मगे भले ती प्राथमिक अवस्थेतील का होईना.


निर्जीवातून सजीवाची उत्पत्ती ही एक अचंबित करणारी बाब आहे. आज आपण यंत्रमानव तयार केले आहेत. त्यातील एखाद्याला विचारले की तू कोण आहेस? याचे उत्तर तो कदाचित त्याच्या आज्ञावलीमध्ये लिहिल्याप्रमाणे देईल की मी मॅक१ नामक रोबो आहे, जसे मी पण सांगेन की मी मंदार आहे.तुम्ही सांगाल मी निमिष आहे.पण ही झाली फक्त नावे, आपल्यावर चिकटवलेली लेबले. प्रत्यक्षात मी कोण? (को अहम?) चे उत्तर काही केल्या सापडत नाही.कारण आपण सर्व शरीराने एकाच साच्यातून काढल्यासारखे असलो तरीही आपले स्वतःचे वेगळे अस्तित्त्व (Unique Identity) आहे. ते नेमके काय आहे? ही मी पणाची जाणीव/हे आत्म म्हणजे तरी काय? वरच्या उदाहरणातील यंत्रमानवाला ती असेल? नक्कीच नाही.हे शरीर सोबत घेऊन १०० वर्षे जगूनही "मी कोण?" चे उत्तर आपल्याला मिळत नाही.एक जैवरासायनिक यंत्र एवढीच ही व्याख्या आहे का? ज्या यंत्रातील भाग जुने होत होत निकामी झाले की बंद पडणारे (अर्थात मृत्यु पावणरे) एक मशीन?
की असे एक सतत विकसित होत जाणारे हार्डवेअर ज्याच्या जोडीला मेंदुरूपी हार्ड डिस्क मध्ये मनरूपी ऑपरेटिंग सिस्टम बसवली आहे, जी पिढ्यानपिढ्या विकसित होत नवे नवे व्हर्शन पुढील पिढीत संक्रमित करत असते?

डार्विनचा उत्क्रांतीवाद वि.  Intelligent Design  हा वाद आता सर्वांनाच माहित झालाय.
त्यावर भरपूर काथ्याकूटही झालाय. वास्तविक सजीवांची उत्क्रांती ही नैसर्गिक घटनाच तर आहे. ही उत्क्रांती तरी कशी झाली? विष्णुचे दहा अवतार हा उत्क्रांतीवादाचाच सिद्धांत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
एका प्रजाती मधूनच दुसरी प्रजाती कशी उत्पन्न झाली? सरिसृप वर्गातूनच उडणारे पक्षी तयार झाले.पण ते काही रातोरात तयार झाले नसतील. काही सरिसृपांना पंख-सदृश्य अवयव फुटले असतील. त्यांच्यात सुधारणा होत होत पूर्ण पंख विकसित झाले असतील. उंदरासारख्या सस्तन प्राण्यातून उडणारा एकमेव सस्तन प्राणी म्हणजेच वटवाघूळ उत्क्रांत झाले. मग या उत्क्रांतीच्या टप्प्यांना जोडणारे जीव वा साखळ्यांचे जीवाष्म का सापडत नाहीत?

डार्विनचा सिद्धांत सांगतो की या प्राण्यांनी स्वतःला निसर्गाशी जुळवून घेतले व आवश्यक बदल स्वतःमध्ये घडवून आणले. पण ते कसे? ते काय त्यांच्या मर्जीनुसार घडवता येणे शक्य होते? मानवा सारखा एवढा विचार करणारा प्राणी. माणसाला अंधारात दिसत नाही. उत्क्रांतीच्या टप्प्यावर माणसाला वाटले असेलच ना की रात्रीचे दिसले तर किती बरे होईल! पण माणसाची तीव्र इच्छा असूनही रात्रदृष्टी मानवास निसर्गाकडून आजतागायत मिळालेली नाही. थोडक्यात हे शारिरीक बदलांचे नियंत्रण निसर्गाकडेच आहे. निसर्ग हा बदल ज्याला म्युटेशन म्हणतात तो कसा घडवून आणतो? विज्ञान म्हणते हे बदल आपोआप घडुन येतात.या आपोआपला काय अर्थ आहे? यदृच्छा म्हणजे तरी नेमके काय?

छद्मावरण (Camauflage)
मानवी जीवन ही तर सजीव सृष्टीमधील अगदी अलिकडील घटना आहे. त्याआधी करोडो वर्षे पृथ्वीवर जीव नांदत आले आहेत. अनेक पशुपक्षी, कीटक यांच्या संरक्षणाची योजना निसर्गानेच बनवलेली असते. काही फुलपाखरांच्या पंखावर दोन मोठे डोळे भासतील असे गोल ठिपके असतात.काही पतंग थेट वाळलेल्या पानासारखे असतात ज्यामुळे ते चटकन दिसत नाहीत. एक विशिष्ट अळी अगदी कबुताराच्या विष्ठेसारखी दिसते. त्यामुळे पक्षांची फसगत होऊन अळीचे रक्षण होते.एक झाड तर कमालच करते. या झाडाच्या पानावर फुलपाखरं अंडी घालतात. पण हे झाड हुबेहुब त्या अंड्यांसारखे दिसणारे ठिपके पानावर तयार करते. आधीच अंडी घातली आहेत असे समजून फुलपाखरू दुसरी जागा शोधते आणि झाडाच्या पानांवरील अंड्यांची संख्या मर्यादित राहते. ही आणि अशी अशी कितीतरी उदाहरणे आहेत. हे जीव स्वतःच्या बुद्धीने यातले काहीही करू शकत नाहीत.मग हे बदल कोणती अदृश्य शक्ती घडवून आणते?

याचे अंशतः उत्तर विज्ञान देऊ शकेल, की अमुक अमुक जैव-रासायनिक क्रिया घडून वा विशिष्ट संप्रेरकांमुळे हे घडते पण ते का , कसे आणि विशिष्ट जातीतच का घडते?  अध्यात्म या बद्दल काय सांगते? अशा प्रश्नांची उत्तरे अध्यात्माच्या दृष्टीकोनातून `जगन्नियंत्याची लीला' या दोन शब्दात सांगितली जातात. पूर्वजन्मातील कर्मानुसार पुढील जन्म मिळतो हा तर एक आवडता प्रचलित समज. याचेही अध्यात्म समर्थन करते. एकवेळ मानव सदसदविवेकबुद्धीने ठरवेल की "चांगलं काय नि वाईट काय" पण मानवेतर प्राणीसृष्टी पूर्णपणे निसर्गाधिन आहे. ते बिचारे जीव निसर्गाच्या चौकटीत राहूनच जगणार. वाघ म्हटला तर तो हिंसा करूनच खाणार तर हरीण गवत खाऊन. त्यांच्या पाप -पुण्याचा हिशेब कोणत्या बऱ्या-वाईट कर्मावर ठरणार?

वरदा म्हणतात....

विश्व कसे निर्माण झाले ह्याचे उत्तर बऱ्याच प्रमाणात आज विज्ञान देऊ शकते. का? निर्माण झाले ह्याचे संपूर्ण उत्तर अजून मिळालेले नाही, मात्र उत्तर मिळवण्याचे प्रयत्न विज्ञानामध्ये चालू आहेत. तुम्ही करता तशी तुलना कराचीच म्हटली तर विश्व, पृथ्वी, मानव वगैरे सर्व का निर्माण झाले ह्याचे उत्तर अध्यात्माला देता येते का? आणि नसेल, तर ते मिळवण्यासाठी अध्यात्मामध्ये काही प्रयत्न चालू आहेत का? कोणते?
वरदा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. जर विज्ञान एखाद्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसेल तर अध्यात्म तरी ते देऊ शकते का? अध्यात्म या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. पण निदान विज्ञान या प्रश्नांचा धांडोळा घेऊन उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न तरी करते.

निमिष आपण एका चांगल्या वैचारिक लेखनास अनेकांना उद्युक्त केले याबद्दल आभार!

- विज्ञान व अध्यात्मप्रेमी मंदार