सुधीर गाडगीळ आणि आशा भोसले

सुधीर गाडगीळ यांनी आशा भोसले यांची किती वेळा मुलाखत घ्यावी, याला काही धरबंद उरलेला नाही. ते काय प्रश्न विचारणार आहेत आणि भोसले त्यावर काय उत्तर देणार आहेत, हे आता रसिक व्यवस्थित सांगू शकतात. हातात पूर्वीच्या मुलाखतीचं कात्रण आणि कान सुरु असलेल्या मुलाखतीकडे. पंचाहत्तर टक्के प्रश्न समान निघतील.

उदा. 
प्रश्न एकः इतक्या वर्षांनंतरही तुमचं गाणं तरुण कसं ?
उत्तरः काळाबरोबर बदलत गेले म्हणून.
प्रश्न दोनः गीतांच्या शब्दकारांशी कधी बातचित होते का ?
उत्तरः पूर्वी व्हायची, हल्ली होत नाही. साहिर, मजरूह...फार मोठेमोठे लोक होते ते. (समीर, दीपक चौधरी यांची नावं घेणं टाळलं जातं.)
प्रश्न तीनः ज्यांच्यासाठी गाणार आहात, त्या नायिकांशी कधी बातचित होते का ?
उत्तरःपूर्वी व्हायची, आता होत नाही. हल्ली माहीतच नसतं, कोणासाठी गाणार आहे.
प्रश्न चारः इतर भाषांतून गाताना पूर्ण गीत समजावून घेता का?
उत्तरः पूर्ण गीत समजावून घेणं शक्यच नसतं, पण एखादा शब्द कळला की काम होतं.
दोघांनाही कंटाळा येत नसेल का?
की प्रत्येक वेळी रसिक वेगवेगळे असतात म्हणून आपापसात ठरवून एकच अंक वारंवार सादर करावा लागतो ?