पोळी

  • कणीक १ वाटी (मध्यम)
  • मीठ चिमुटभर
  • तेल २ चमचे
  • पाणी
  • १ मध्यम वाटी कणकेच्या ४ पोळ्या होतात
३० मिनिटे
१ जण

कणीक भिजवणे

कणिक भिजवताना त्यात थोडे चविपुरते मीठ व तेल घालावे. थोडे थोडे पाणी घालुन कणिक भिजवावी, सैल अथवा घट्ट नसावी. थोडे तेल घालुन कणिक खूप मळावी, म्हणजे एकसारखी भिजेल. भिजल्यावर १५ मिनिटांनी पोळ्या कराव्या.

पोळी लाटणे

पोळी लाटताना परत थोडी कणिक मळुन घेणे. कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेउन तो गव्हाच्या पिठात बुडवुन लाटावा, थोडासा लाटुन त्यावर तेल लावुन त्रिकोणी अथवा गोल घडी करावी. परत गव्हाचे पीठ लावून ती गोल अथवा त्रिकोणी पोळी लाटावी. लाटताना पिठाचा वापर जास्त करावा म्हणजे पोळी पोळपाटाला कधिही चिकटत नाही. पोळी कडेकडेनी लाटावी, म्हणजे लाटण्याचा दाब पोळीच्या  सर्व कडेच्या बाजुंवर एकसारखा पडला पाहिजे. लाटण्याचा दाब पोळीच्या मध्यभागी जास्त झाला तर मध्यभागी पोळी पातळ व बाजुने जाड होईल, त्यामुळे भाजताना पोळी मध्यभागी जास्त भाजली जाइल व कडा जाड राहिल्याने कच्या रहातील.

पोळी भाजणे 

पहिली पोळी लाटायच्या आधी गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवावा,म्हणजे पोळी लाटेपर्यंत तवा चांगला तापेल. तवा नेहमी मध्यम आचेवर ठेवावा. कमी आचेवर तापलेल्या तव्यावर पोळी भाजली तर कडक होईल, जास्त आचेवर भाजली तर कच्ची राहील.

पोळी भाजताना कमितकमी वेळा उलटावी. पोळी भाजताना जेथुन धुर येत असेल तेथे वाटीने दाबुन ठेवावी म्हणजे दुसरीकडून पोळी फुगते. असे केल्याने पोळी सर्व बाजुने भाजली जाते, फुगते. पोळी तव्यावरुन खाली काढल्यावर ती पोलपाटावर आपटावी, म्हणजे चक्क मोडावी, म्हणजे आतील वाफ निघुन जाते व पोळी कडक होत नाही. नंतर पोळीला २ ते ३ थेंब तेल लावून पोळीच्या डब्यात ठेवणे.

कणिक भिजवल्यापासुन भाजेपर्यंत सर्व काळजी घेतली तर पोळ्या चांगल्या होणारच.

 

रोहिणी

नाहीत.

स्वानुभव