कच्ची मातृभाषा

नुकतेच माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शालान्त परीक्षांच्या निकालांच्या बातम्या वाचताना ही बातमी महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचायला मिळाली. मराठीच्या अभ्यासक्रमाकडे शासनाचे लक्ष आहे हे पाहून बरे वाटले. मूळ बातमी वाचून येथे चर्चा करता यावी ह्या हेतूने ती बातमी येथे उतरवून ठेवली आहे.


मूळ बातमी : मराठी मुले मातृभाषेतच कच्ची!
महाराष्ट्र टाईम्स (शनिवार, २५ जून, २००५ १२:१५:५९)


पुणे (म. टा. प्रतिनिधी) : मातृभाषा मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना 'प्रथम भाषे'चा पेपर लिहायला वेळ पुरत नाही... त्यातील बऱ्याच प्रश्नांना बगल दिली जाते... कवितांवरच्या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे... व्याकरण आणि शुद्धलेखनातील चुकांमध्ये लक्षणीय वाढ... अशा प्रकारचे अनेक निष्कर्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासगटाने काढले आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण देताना आता या मुद्द्यांवर भर देणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले.


दोन वर्षांपूर्वी मराठी प्रथम भाषेच्या निकालात मोठी प्रमाणात घट झाल्यानंतर त्याविषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी मंडळाने अभ्यासगट स्थापन केला होता. त्यातील काही निष्कर्ष डॉ. काळपांडे यांनी शुक्रवारी पत्रकारांसमोर मांडले.


यंदा मराठीत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीर्च्य ७९.५३ टक्क्यांवरून ८१.१२ पर्यंत वाढले असले, तरी त्यापूर्वी त्यात झालेली घट चिंताजनक असल्यानेच अभ्यासगट नियुक्त करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. या अभ्यासातून समोर आलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक विद्यार्थी मराठीचा पेपर वेळेत पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहेत. मातृभाषेतून वेगाने लिहायची सवय नसल्याचा हा परिणाम असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.


मराठीच्या पेपरमध्ये व्याकरण आणि शुद्धलेखनाबाबतही अनेक चुका आढळून येत आहेत. त्याचबरोबर मराठीच्या प्रश्नपत्रिकेत कवितांवर आधारित असणारा विभाग सध्या सर्वाधिक दुर्लक्षित आहे. त्यावरचे प्रश्न विद्यार्थी 'ऑप्शनला'च टाकतात, असे आढळून आले आहे.


मराठीच्या अभ्यासक्रमातील कविता विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात कमी पडत आहेत की कवितेचा अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात शिक्षकांचे प्रयत्न अपुरे पडताहेत, याचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या अभ्यासाचे निष्कर्ष शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करून घेण्यात येणार असून त्याचा योग्य उपयोग केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.





हे वाचून काही प्रश्न मनात आले.



  • कविता, लघुनिबंध आदि गोष्टींचा अंतर्भाव अभ्यासात करावा का?

  • मराठीत मार्क देताना व्याकरण, शुद्धलेखन ह्याकडे पाहावे का?

  • मुळात मराठी हा विषय परीक्षेला असण्याची काय आवश्यकता आहे?

  • मराठीत मार्क कमी मिळाले तर काय बिघडते?

  • तिकडे इतके लक्ष का द्यावे असे वाटते?