मराठीतला "शिक्का"

मला वाटतं ह्यावर मनोगतवर बरीच चर्चा झाली असावी. पण काल-परवा एक शब्द ऐकला आणि मला राहवलं नाही. म्हणून ही चर्चा.

टीवीवरच्या, हिंदीतून मराठीत भाषांतरित केलेल्या , मराठी जाहिरातींत चाललेली मराठीची मोडतोड सर्वपरिचित आहे.
परवा, अशीच एक जाहिरात ऐकली/पाहिली, त्यात "तुमच्याजवळ पाच रुपयांचा शिक्का आहे" असं काहीतरी ऐकलं.
"सिक्का" ह्या हिंदी नाण्याचं मराठी भाषांतर काय, तर म्हणे, शिक्का!!!!!!
हे भाषांतर करणारे कोण असतात?  हे लोक कसे नेमले जातात ह्या भाषांतरच्या कामासाठी?
भाषांतर अचूक व्हावे असा नियम नसतो का? एखाद्या भाषेत भाषांतर करायचे असल्यास दोन्ही भाषेतील शब्दांची आणि त्या शब्दांच्या अर्थाची जाण असणे आवश्यक नसते का? ह्यात, प्रसारित करण्यापूर्वी सगळं बरोबर आहे की नाही हे तपासलं जात नाही का? ...................

१. स्वस्थ रहा मस्त रहा (हिंदीत स्वस्थ म्हणजे आरोग्यदायी, पण मराठीत, न हालता, स्थिर असा होतो.
२. माझा धंदा चौपट झाला (हिंदीत चौपट होना म्हणजे वाट लागणे, पण मराठीत, चारपट होणे असा होतो.)
३. बिल चुकवलं. (चुकाना म्हणजे भागवणे बिल भागवणे वगैरे, पण मराठीत चुकवणे म्हणजे टाळणे असा होतो)

४. खिलवलं. (खिलवलं असा शब्द मराठीत आहे? खाऊ घातलं म्हणा ना!! मराठीला कशाला "हिंदो"ळ्यावर बसवताय? )

अशी बरीच उदाहरणे देता येतील. पण ह्याची दाद "मराठी" माणसांनी मागायची कुठे? आणि कशी?
हे सगळं त्या लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं? सुधारणा कशी घडवून आणायची? कुणी असा प्रयत्न केलाय का? केला असल्यास इथे सांगावा आणि मार्गदर्शन करावं! ही विनंती.