मराठीत पाट्या झळकणार!

आजच सकाळमध्ये ही बातमी वाचून बरे वाटले. मराठीला महाराष्ट्रात तरी आता बरे दिवस येतील असे वाटते. ही बातमी वाचून चर्चा व्हावी ह्य उद्देशाने मुद्दाम ही बातमी येथे उतरवून ठेवली आहे. मला लक्षवेधक वाटलेल्या मुद्द्यांना मी अधोरेखित केले आहे.


सकाळमधील बातमी : मराठीत पाट्या झळकवा; अन्यथा पाच हजारांचा दंड भरा..
कामगार उपायुक्तांचा इशारा
पुणे, ता. १७ : 'दुकाने अथवा विविध संस्थांच्या पाट्या मराठीत लिहा; अन्यथा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा भोगा,' असा इशारा कामगार उपायुक्तांनी दिला आहे. .......
....... गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि समर्थ मराठी संस्थेने यासाठी केलेल्या प्रयत्नांनंतर शहरातील वीस हजारांहून अधिक दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत (देवनागरी लिपीत) झळकल्या आहेत.मुंबई दुकाने संस्था अधिनियम आणि महाराष्ट्र दुकाने अधिनियमानुसार सर्व दुकाने, व्यापारी संस्था, उपाहारगृहे, करमणुकीची ठिकाणे आदींच्या नावांची पाटी मराठीत असणे बंधनकारक आहे. तसे नसल्यास किमान एक हजार व कमाल पाच हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यात असल्याचे कामगार उपायुक्त प्र. रा. शिंदे यांनी कळविले आहे.


अर्थात मराठीतील नावाचा फलक हा इतर भाषेतील फलकापेक्षा जास्त आकाराचा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.समर्थ मराठी संस्थेने याबाबत गेले काही दिवस सातत्याने प्रयत्न केले होते. ''मराठीत फलक नसलेल्या अनेक बँका, महाविद्यालये, वित्तसंस्था, उपाहारगृहे, पानपट्टी चालकांना याबाबत लेखी कळविण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून काहींनी मराठीत फलक लावले. इतरांच्या विरोधात कामगार उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली. या कार्यालयाने संबंधितांना इशारा दिल्यानंतर मराठीचे फलक झळकू लागले,'' अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल गोरे यांनी दिली.


अर्थात सर्वाधिक परिणाम हा शिवसेनेच्या आंदोलनाचा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठीत फलक नसलेल्या काही दुकानांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. केवळ इंग्रजीत असलेले वीस हजार फलक मराठीतही दिसू लागले.





काही प्रश्न मनात आले ते असे-


१. असा काही दुकाने अधिनियम आहे हे तुम्हाला ठाऊक होते का?


२‌. समर्थ मराठी संस्थेच्या कार्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?


३. नव्याने मराठीत दिसू लागलेल्या वीस हजार फलकांपैकी कोणी काही पाहिले आहेत का?