उन्हाळा माझ्या आवडीचा !

                       तुमचा आवडता ऋतु कोणता असं विचारलं तर आपल्यापैकी अनेकांचं अगदी हमखास उत्तर असतं पावसाळा. निसर्गाला सुंदर हिरव्या रंगात रंगवुन टाकणारा, सृष्टीचं देखणं रुप दाखवुन तिच्या प्रेमात पडायला लावणारा आणि मनुष्यप्राण्यासहित सगळ्या चराचर सृष्टीत एक चैतन्य निर्माण करणारा पावसाळा सुंदर ऋतु खराच. या प्रश्नाचं उत्तर अनेक जण थंडी असंही देतील. गुलाबी, बोचरी पण तन नि मन उल्हासित करणारी थंडी. पण माझं उत्तर मात्र याहुन वेगळं आहे. मला आवडतो तो उन्हाळा. आता लोक त्याच्या नावानं कितीही बोटं मोडत असताना दिसले तरी मला मात्र उन्हाळाच पसंत आहे, कदाचित असं असेल की माझ्या लहानपणीच्या अनेक ह्द्य आठवणी उन्हाळ्याशीच निगडीत आहेत म्हणुनही . उन्हाळा ! वाढलेल्या तापमानाबरोबरच उन्हाळ्याची सुट्टीही घेउन येणारा.अंग भाजुन काढत असला तरी कलिंगड, खरबुज, संत्री अशी सुंदरसुंदर फळं चाखविणारा. वेगवेगळ्या प्रकारची सरबतं, फळांचे रस अशी चंगळ करणारा. सकाळी उशीरा उठुन मग दुपारी पार जेवेपर्यंत रंगलेले ते क्रिकेटचे डाव. नंतर पंख्याखाली काढलेल्या त्या झोपा. परीक्षा संपल्या की तातडीने बाहेर येणारे ते पत्ते. गाद्यांवर लोळुन वाचलेली ती गोष्टींची पुस्तके. ओह! उन्हाळ्याच्या या स्मृती किती रमणीय आहेत!

            उन्हाळ्याबद्दलची माझी पहिली आठवण आहे माझ्या शाळेच्या वेळची. आम्ही तेव्हा सासवडला हडको वसाहतीत एका बैठ्या घरात रहात होतो. मी पाचवीत किंवा सहावीत असेन. फेब्रुवारी संपला की आम्हा सगळ्यांना परीक्षेचे वेध लागत. परीक्षा साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपत असे. दहावीची परिक्षा सुरु  झाली की जणु काही आम्हाला इशाराच, आमचीही परिक्षा जवळ आल्याचा ! शाळा अर्धीच असे नि दरवेळी शिपाई कसलेतरी परिपत्रक घेउन वर्गात आला की मुलांची कुजबुज सुरु होई. ही सूचना म्हणजे परीक्षेचे वेळापत्रकच असेल काय याची मग आम्ही दबक्या आवाजात चर्चा करीत असु. मात्र प्रत्येक वेळी हा बार फुसकाच निघे. एक दिवस मात्र खरोखरच परीक्षेच्या तारखा( परीक्षेच्या साधारण १० आधी ) जाहीर होत. मग आम्ही ते वेळापत्रक व्यवस्थित आपापल्या वह्यांमधे उतरवुन घेत असु. मी तर ते पुन्हा पुन्हा तपासुन, शेजारच्या मुलाच्या वहीत दहा वेळा पाहुन बरोबर असल्याची खात्री करत असे.( याचं कारण म्हणजे एका विषयाची परीक्षा असताना आपण दुस-याच विषयाचा अभ्यास करुन गेलो नि मग आपल्याला वर्गात पोहोचल्यावर मोठा धक्का बसला असं एक 'महाभयंकर' स्वप्न मला दर परीक्षेच्या वेळी पडत असे, मी अगदी अभियांत्रिकीची परीक्षा देउन बाहेर पडेपर्यंत !) हे वेळापत्रक आम्ही अगदी पडेल चेहे-याने घरी आपल्या आईवडिलांना दाखवल्यावर त्यावर "अरे बापरे ! इतक्या जवळ आली का परीक्षा ? आता तरी करा सुरुवात अभ्यासाला." हे त्यांचे उदगारही अगदी ठरलेले असत.
  परीक्षा सुरु होईतो शाळेतले गुलमोहोर फुलुन लालपिवळ्या फुलांनी अगदी डवरुन आलेले असत. यातही पिवळे, शेंदरी, राणी, अगदी लालभडक असे अनेक रंग दिसत. दुपारच्या पेंगुळलेल्या वा-यात अगदी नाजुकपणे सळसळणारा लालभडक गुलमोहोर वर्गातल्या खिडकीतुन पहात मी कुठलातरी पेपर लिहितोय ही आठवण आजही माझ्या मनात अगदी ताजी आहे.
  गुलमोहोराची फुलं पाडुन त्यातले 'कोंबडे' खाणे हा माझ्या अनेक वर्गमित्रांचा अगदी आवडता उद्योग होता.( मुले ते कसे खात कोण जाणे? मला तर हा प्रकार कधीच आवडला नाही. तुरट नि बेचव !) परीक्षेत दररोज एक पेपर झाला, की आता किती राहिले, आपण मध्यापर्यंत तरी आलो की नाही हे तपासुन पहाणे हा हिशोब दररोज होई. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात(अंदाजे दहा तारखेपर्यंत) परीक्षा संपत. साधारणपणे हस्तकला हाच 'पुंगळु' पेपर शेवटी असे. त्यामुळे त्याआधीच माझे उन्हाळ्याच्या सुट्टीचे आराखडे मनात जमायला सुरु होत. एकदा का हस्तकलेचा पेपर उरकुन तो पेपर बाईंच्या हाती दिला की मग आमचा आनंद अगदी गगनात मावेनासा होई. मुलांची आपापलं सामान गोळा करत एकमेकांशी बोलताना अगदी झुम्मड उडुन जाई. सगळ्यांच्या चेहे-यावर परीक्षा संपल्याचा (नि अभ्यासाची कटकट गेल्याचा) आनंद अगदी ओसंडुन वहात असे.
  सुट्टीचा आनंद पुरेपुर उपभोगायला लगेच दुस-याच दिवसापासुन सुरुवात होई, यात क्रिकेट खेळण्याचा कार्यक्रम महत्वाचा असे. सकाळी सातपर्यंत उठुन,सगळं आवरुन नि काहीतरी पोटात टाकुन आम्ही ८ वाजेपर्यंत खेळाच्या जागी पोहोचत असु. कधी मैदानावर, कधी एखाद्या मित्राच्या घराच्या मागे अंगणात खेळ रंगे. क्वचितप्रसंगी आमच्या शेजारच्या घराच्या दारातच असलेल्या आंब्याच्या मोठ्ठ्या झाडालाही यष्टींचं काम करावं लागे. मग जो खेळ सुरु होई, तो कुणाची तरी आई आम्हाला जेवायला बोलवेपर्यंत. घड्याळात पाहिले तर चक्क दुपारचे १२ किंवा १ वाजलेले असत ! खेळण्यात, चिडण्यात, वाद घालण्यात पाच तास कसे भुर्रकन उडुन जात. घरी आल्यावर मग जेवण नि झोप. अगदी चार पर्यंत. मग पुन्हा मित्रांकडे, तिथुन कुठेतरी भटकायला किंवा अशीच टंगळमंगळ.
  पत्ते खेळणं( की कुटणं?) हाही उन्हाळ्याच्या सुट्टीतला एक महत्वाचा भाग . इतका की पत्त्यांशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टी उन्हाळ्याच्या सुट्टीच न वाटावी ! पण गंमतीची गोष्ट अशी की पत्ते मी मित्रांबरोबर कधीच खेळलो नाही - याचं कारण असं असेल की अगदी लहानपणीच मला पत्त्यांमधले सर्व डाव येत होते आणि ते माझ्या मित्रांना येत नसल्यामुळे त्यांच्याबरोबर भिकार-सावकार किंवा गुलामचोरसारखे फालतु खेळ खेळण्याची माझी तयारी नसावी ! तेव्हा घरातल्या लोकांमागे भुणभुण ही ओघानेच आली. (एकदा माझी ही कटकट ऐकुन 'मोठेपणी हा अट्टल जुगारी होईल' असं भाकीत माझ्या एका बहिणीने वर्तवलं होतं, ते आमच्या सगळ्यांच्याच सुदैवानं संपुर्ण खोटं ठरलं !) सर्वप्रथम चार जण मिळवुन दस्सीकोट खेळण्याचा प्रयत्न असे, तो न जमला तर पाच-तीन-दोन नि तोही नाही जमला तर मग शेवटी कुणालातरी पकडुन सात-आठ खेळणे हाच एकमेव पर्याय उरायचा. खुप वेळ भुणभुण केली की मग पप्पा, आत्या किंवा एखादी दीदी यापैकी कुणीतरी सात आठ खेळायला तयार झालं की त्यात अस्मादिकांची हार ही ठरलेलीच असे. घाईघाईत चुकीचे पत्ते टाकणं, मग ते पडुन गेल्यावर बदलण्यासाठी गयावया करणं असं व्हायचंच. याबरोबरच कधीकधी चैलेंज, बेरजेचा झब्बु असेही खेळ होत, ज्यात बहुधा गाढव होण्याची पाळी माझ्यावरच येई आणि माझ्या जमलेल्या बहिणीही 'पाहुयां, किती पायांचा गाढव झालास ते !' असं म्हणुन जखमेवर आणखी मीठ चोळत.

हळुहळु एप्रिल महिना संपत येई नि जसजसा परिक्षेचा निकाल जवळ येई तसतशी पोटात कालवाकालव सुरु होई. ' आपला कितवा नंबर आला असेल, आपल्याला किती गुण मिळाले असतील 'असे भीतीदायक प्रश्न मनात उभे रहात. शेवटी २ मेला निकाल जाहीर होई नि सर्व वर्गमित्रांच्या पुन्हा एकदा गाठीभेटी होत. 'तुला किती गुण मिळाले' असं जोतो एकमेकाला विचारे. 'सुट्टीत कुठे जाणार?' हा प्रश्न प्रत्येकाला विचारल्यावर आता आपले मित्र खुप दिवस आपल्याला दिसणार नाहीत ही हुरहुरदेखील मनात असे.

 मे महिना. सुट्टी आता ख-या अर्थानं सुरु झालेली. क्रिकेट आता कमी झालेलं असे आणि दुपारची झोपही. कारण हा मौसम म्हणजे सगळ्या आयांचा पापड नि तळणाचे इतर पदार्थ करण्याचा. आपापलं पोळपाट लाटणं घेउन बायका घरोघर पापड लाटण्यासाठी जात. मळलेल्या पिठाच्या गोळ्या करणे, बनलेले पापड प्लास्टिकच्या कागदावर एका रांगेत वाळत टाकणे इ. सटरफटर कामांसाठी आमची मदत घेतली जाई. मधेच एखाद्या दिवशी कुरवडया केल्या जात, तेव्हा गव्हाचा चीक खायला मिळे. बटाट्याचे पापड असतील, तर मग उकडलेले बटाटे आणि साबुदाण्याच्या पापड्या असतील तर साबुदाण्याची खीर !
  खाण्याची चंगळ हे मला उन्हाळा आवडत असल्याचं एक मोठ्ठं कारण होतं. कलिंगड, खरबुज, करवंदं, जांभळं, अननस, द्राक्षं अशी इतर मोसमांत न दिसणारी (नि मला खुप आवडणारी) फळं याच मोसमात अवतीर्ण होत. यातलं प्रत्येक फळ खाताना हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात सुंदर फळ आहे नि माझं सगळ्यात आवडतं फळ हेच असं मी हमखास म्हणे. दुपारी जेवल्यानंतर खरबुज, नंतर झोपेतुन उठल्यावर द्राक्षं नि रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाताना अगदी ब्रह्मानंदी टाळी लागल्याचा भास होई. केवळ याच फळांसाठी उन्हाळा वर्षभर तयार करण्याची माझी तयारी होती नि आताही आहे !
 इकडे मे महिन्यात हळुहळु वा-यानंही वेग पकडलेला असे नि मग ह्या वा-याचा पतंग उडवण्यासाठी उपयोग करुन घ्यायलाच हवा ह्यावर माझ्या सर्व मित्रांचं एकमत होई. पतंग नि (मांजा बनवण्यासाठी)दोरे विकत आणले जात. दोरे गुंडाळण्यासाठी आसारी बहुधा मागच्या वर्षीचीच(जी अडगळीच्या सामानात हमखास सापडे) असायची किंवा मग एखादा लाकडाचा चांगलासा तुकडा पाहुन त्याचाच वापर केला जाई. मांजा बनवणं हे एक स्वतंत्र प्रकरण असे. इथे विशेष 'येक्स्पर्ट' लोकं लागत, ते 'ये-या गबाळ्याचे' काम नसे. या तज्ञ लोकांच्या देखरेखीखाली मांजा तयार होई. प्रथम एखादं जळकं भांडं कुठुनतरी पैदा करुन ते तीन दगडांच्या चुलीवर चढवलं जाई. त्यात प्रथम खळ शिजे. काचेचे तुकडे (हे अक्षरशः कधीकधी कच-यातुनही पैदा केले जात !) बारीक करुन त्याची पुड बनवली जात असे. रटरटणा-या खळीत ही काचेची पुड टाकुन मग हे मिश्रण हळुवारपणे दो-याला लावले जाई. एवढे श्रम करुन जेव्हा पतंग वर आकाशात दूर गेल्यावर जो आनंद होई, तो शब्दांत कसा सांगता येणार, तो अनुभवायलाच हवा ! पतंग बराच वेळ आकाशात असल्यामुळं जर तुम्हाला पतंगाला आपली ख्यालखुशाली कळवायची असेल, तर पत्र पाठवायची सोयही करता येई.
 
 मे महिन्याच्या मध्यापर्यंत मात्र हळुहळु मित्रगळतीला सुरुवात होई. कुणी मुंबई, कुणी कोल्हापुर, कुणी आज्जीकडे, कुणी मावशीकडे निघुन जात. मग वेळ जाईनासा होई. शाळेतल्या नि आजुबाजुला राहणा-या सगळ्याच मित्रांची आठवण होई, दिवस अगदी खायला उठे. क्रिकेट नि पतंग आता बंद झाल्यामुळे पत्ते आणि गोष्टींची पुस्तके(फास्टर फेणे नि विनु) यांचाच सहारा असे. शाळा सुरु झाली तरी चालेल इतपत वाईट परिस्थिती येई. अन अचानक असेच एक दिवस कुणीतरी काका किंवा आत्याचा मुलगा घरी येत. जाताना अर्थातच मला बरोबर येण्याचा खुप आग्रह करीत, शेवटी होना करीत मी संध्याकाळी आत्या किंवा आज्जीच्या घरी पोहोचलेला असे ! मे अखेरीस घरी परत आल्यावर कळे की अरे आता सुट्टीचे खुपच कमी दिवस राहिलेत आणि नविन वर्ष नि नविन इयत्तेसाठी तयारी करताकरता ७ जुन उजाडलेलाही असे !

                                      *  *  *  *

खुप वर्षे झाली आता या गोष्टीला. मोजायचीच झाली तर अगदी १२ वर्षे. काही दिवसांपुर्वी ब-याच कालावधीनंतर जुन्या घरी गेलो आणि दिसलं की बंगल्यांनी नि घरांनी माझं पतंग उडवण्याचं मैदान अगदी खाउन टाकलं होतं.
 पहिल्यांदा तर मला ती जागा ओळखुच येईना ! माझं घर मात्र अगदी तसंच होतं नि माझ्या शेजारच्या घरासमोरचं ते रस्त्याच्या बरोबर मधेच असलेलं झाडही ! मला त्यानं ओळखलेलं दिसलं, उगाच नाही त्यानं आपल्या फांद्या हलवल्या मला पाहुन! तेव्हा जाणवलं, की अरे,आता उन्हाळा आला की त्या परीक्षा नसतील, त्यानंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी नसेल, ते क्रिकेटचे रंगलेले खेळ नसतील आणि उंचच उंच उडणारे पतंगही नसतील. पण म्हणुन काय झालं? मला माहितीये या उन्हाळ्यातही पापड बनवताना आई मला मदतीला जरुन बोलावेल, उन्हातुन आल्यावर माठातल्या वाळा किंवा मोगरा टाकलेल्या पाण्याची अमृतासारखी चव तीच असेल नि रात्री जेवणानंतर गार कलिंगड पोटात गेल्यावर येणारा गारवाही तोच असेल. चैलेंज खेळताना खोटे पत्ते लावल्यावर चेहे-यावर आणलेला निर्विकार भाव तोच असेल, खरबरीत खरबुजांची ती गोड चव तीच असेल नि दुपारी सगळं जग झोपलेलं असताना हळुहळु घुमणा-या पंख्याच्या साथीनं 'फास्टर फेणे' वाचताना होणारा आनंदही तोच असेल ! ओह ! कुणी काहीही म्हणो, आपल्याला बुवा उन्हाळाच आवडतो !