ठिपक्यांची रांगोळी (भाग २)

ठिपक्यांची रांगोळी (भाग १) 


हे सारं  सुरू असताना बडीशोप चावत आई दारापाशी वर्तमानपत्रातलं शब्दकोडं घेऊन बसायची. मध्यच तिला अडणारा शब्द आम्हाला विचारायची, तर एखाद्या शब्दावरून विनोद झाला, की खुसुखुसू हसत आम्ही, रेखलेल्या पांढऱ्या शुभ्र रांगोळीत रंग भरायला सज्ज व्हायचो. पांढऱ्या रांगोळीने माखलेले हात धुऊन, माठातलं गार पाणी पिऊन, नेचर्स कॉल्सना प्रतिसाद देऊन आम्ही परत बसकण मारायचो. मोरपंखी निळा, भडक गुलाबी, पोपटी हिरवा, असे रंग सुरुवातीलाच ठरलेले असायचे. तरीही रंग भरायला सुरुवात करण्यापूर्वी आईला सांगायचो. आईनेही सर्वकाही डोळ्यासमोर आणून मान डोलवून "छानच दिसेल" अशी परवानगी वजा "सुरुवात करा" अशी इशारत करायची. आम्ही दोघी "तू हा रंग भर, मी हा भरते" असं करत जिचं आधी होईल तिने उरलेला भरायचा असा अलिखित नियम करून सरसर रंग भरायला लागायचो. आमची रांगोळी अर्धी होत आली की बहुदा आईला तू संपूर्ण कशी दिसेल याची कल्पना यायची, आणि मग "मी जरा पडू का" अशी ती चक्क आमची परवानगी घ्यायची. आम्हालाही तिने आतापर्यंत करत आलेल्या घरकामांची, आम्हाला दिलेल्या कामांतल्या सुटकांची जाणीव व्हायची, आणि मग तिला "खुशाल झोप. आमचं झालं की उठवू" असं सांगून जायला सांगायचो. अर्धी पाऊण रांगोळी झाली, की आम्हीही सारख्या आळीपाळीने उठून 'बर्ड्स आय व्यू' ने रंगत येणारी रांगोळी कशी दिसते ते पाहायचो. उद्देश असा की एखादा रंग चांगला वाटत नसेल, तर ते वेळीच कळावं (अर्धी पाऊण झाल्यावर, ते "वेळीच" कसं असेल हा विचार मनात यायचा नाही).


आमचं हे पाहणं वेगवेगळ्या कोनातून होई. वर जिना चढून जाऊन सर्वात वरच्या पायरीवरून बघ, किंवा आपण वरून उतरून येत आहोत आणि अचानक ही रांगोळी समोर आली तर कशी वाटेल त्या दृष्टीने पार चौथ्या मजल्यावरून जिना उतरायला लाग, किंवा घरात जाऊन आपण घरातले होऊन नव्या दृष्टीने रांगोळीकडे बघ, किंवा डोळे किलकिले करून रंगसंगतीचा अंदाज घे, असे वेगवेगळे चाळे करून पाहायचो. सहसा रंग बदलण्याची वेळ यायची नाही, कारण सुरुवातीलाच भरपूर खल करून आम्ही ते रंग ठरवलेले असायचे.


आता आम्हाला घाई असायची की घरचे झोपून उठायच्या आत आपली रांगोळी झालेली असावी. तेव्हा मग मध्येमध्ये वेळ घालवल्याबद्दल पश्चात्ताप व्हायचा. मग अज्जिबात उठायचं नाही असं एकमेकींना बजावून भराभरा रंग भरायला घ्यायचो. जिचा पहिला दुसरा रंग भरून व्हायचा ती बाकीचं आवरून बॉर्डर्स करायला घ्यायची. उद्देश हा की दोघींचंही रांगोळी काढणं एकदम झालेलं असावं. मग उघडलेल्या पुड्या, अर्धवट संपलेले रंग, थोडीफार सांडलेली रांगोळी, अशी आजूबाजूची स्वच्छता व्हायची. शेवटी फक्त उरलेला रंग आणि बॉर्डरसाठीची पांढरी रांगोळी एवढंच ठेवून बाकीचं सामान चोरपावलांनी बाल्कनीच्या कोपऱ्यात रीतसर ठेवलं जायचं.


हळूहळू दुपार कलल्याची चिन्हं दिसू लागायची. कुईकुई वाजणारा पंखा थांबलेला असायचा. कुठूनतरी चहाच्या भांड्यांचा आणि चिमटा खळकन ओट्यावर ठेवलेला आवाज यायचा. घरातून वडिलांनी उठून पाणी पिऊन "चहा टाकतेस का?" अशी कुजबूज केलेली ऐकू यायची.


आमची रांगोळी एव्हाना छान आकारलेली असायची. जुनं फडकं पहिल्या बोटाला गुंडाळून रांगोळीच्या आजूबाजूला गेरूवर पुसून स्वच्छता केली जायची. उंबऱ्यापाशी गोपद्म, स्वस्तिक, हलकीशी वेलबुट्टी, त्यावर हळद-कुंकू वाहून दाराच्या चौकटीतली दिव्यांची माळ भल्या दुपारचे चारच वाजलेले असताना सुद्धा लावून घरातल्यांसाठी ते सरप्राइज ठेवून आम्ही दोघी संध्याकाळसाठीचा नट्टापट्टा करायला आत पळायचो.


सोसायटीतल्या सगळ्यांना माहीत असायचं की आम्ही दर वेळी वेगवेगळ्या रांगोळ्या काढतो. संध्याकाळ झाली की बरेच जण आळीपाळीने आमच्या मजल्यावर येऊन जायचे. सणासुदीला आमचं दार डासांची तमा न बाळगता उघडं असायचं. घरातून येणारा धुपाचा वास, नवीन कपड्यांची सळसळ, दागिन्यांची किणकीण, धडामधुडुम वाजणारे फटाके, आणि रांगोळी बघून येणारे "आहा!" चे उद्गार कानावर पडले की तीन चार तास बसून काढलेल्या रांगोळीच्या कष्टांचे सार्थक व्हायचे, आणि दुसऱ्या दिवशीची रांगोळी काढण्याचा हुरूप यायचा.


कधीकधी जिना चढणारीच्या जरतारी साडीचं टोक रांगोळीवरून फराटा ओढून जायचं, तर कधी त्यावर आम्हीच लावलेल्या पणतीचं तेल रांगोळीवर ओघळून रांगोळीला गालबोट लागायचं. पण का कोण जाणे, अश्याप्रकारे विस्कटलेली रांगोळी कधी मूड बिघडवून गेली नाही.


पहिली रांगोळी हातभर झाडूने झाडताना आईलाच चुकचुकल्यासारखं वाटायचं. पण त्या रांगोळीवरून अर्धगोलाकार झाडू फिरवल्यावर तयार होणारे इंद्रधनुष्यी आकार आणि रंग पाहायला मजा यायची. सगळे रंग एकत्रित होऊन एक वेगळाच रंग तयार व्हायचा. नंतर नंतर आम्ही तोही रंग बाटलीत भरून ठेवून कधीमधी वापरायला लागलो.


आम्ही मोठ्या होत गेलो, तशा ठिपक्यांच्या रांगोळीतल्या चार दिवसांपैकी एखादा दिवस मुक्तहस्त नक्ष्यांनी घेतला. कधी भरपूर पिसारा फुलवलेला मोर, कधी चोचीत मोत्यांची माळ घेतलेला बाकदार मानेचा हंस, तर कधी शेपट्यांमध्ये आकार दाखवणारा मासा असे कायापालट होऊ लागले. पण तरीही ठिपक्यांची रांगोळी ती ठिपक्यांचीच!


आमच्याकडे त्यावेळी कॅमेरा नव्हता. पण जेव्हा आला तेव्हा वडिलांनी कौतुकाने आम्हाला रांगोळीशेजारी उभं करून फोटो काढून ठेवले आहेत. आता ते फोटो पाहताना त्यातल्या मेहनतीतली जाणीव होते. हलकेच सुधारणाही करता येतील अशा खाचाखोचाही दिसतात. पण सर्वात महत्त्वाचं जाणवतं, ते आमच्यातली ही कला फुलण्याकरता, विकसित होण्याकरता आईने घालून दिलेली शिस्त, वेळेचं नियोजन, रंगसंगतीचं ज्ञान, स्वतःच्या दारासोबत आजूबाजूचीही स्वच्छता, आणि मान-पाठ एक करून जीव ओतून काम करायची सवय!


(समाप्त)