कशासाठी? पैशासाठी! -३-
पुढच्या आठवड्यात एका संध्याकाळी नटकिनच्या घराची घंटा वाजली. नटकिननं दार उघडलं. दारात पोलिसखात्यातील डिटेक्टिव सार्जंट स्माइली उभा होता. तो म्हणाला "आपण मि. सॅम्युएल नटकिन?, मी डिटेक्टिव सार्जंट स्माइली. मला आपल्याशी अं..., कसं सांगू... थोडंसं बोलायचंय." नटकिन म्हणाला "बोला न! एवढा संकोच का करताय? तुमच्या पोलिसांच्या कुठल्या तरी कार्यक्रमाची तिकिटं खपवायला आला असाल न? आम्ही घेऊ की! त्यात तुम्हाला एवढा संकोच का वाटतोय?" स्माइली म्हणाला "साहेब, मी तिकिटं खपवायला नाही, एका प्रकरणाच्या चौकशीसाठी आलोय." त्यावरही नटकिन म्हणाला "पण तरीही त्यात तुम्हाला इतकं अवघड का वाटतेय?" ह्यावर आवंढा गिळून स्माइली म्हणाला, "साहेब, मला स्वत:साठी नाही, तुमच्यासाठी संकोचल्यासारखं होतंय. तुमची हरकत नसेल तर आपण आत बसून स्वस्थपणे बोलूया का?" "चला" असं म्हणून नटकिन त्याला आपल्या दिवाणखान्यात घेऊन गेला आणि म्हणाला "आता सांगा मला, काय झालंय ते." स्माइली म्हणाला, "काही दिवसांपूर्वी आमच्या लोकांना वेस्टएंडमधल्या एका फ्लॅटमध्ये काही कामासाठी जायची वेळ आली. तिथे पाहणी करताना त्यांना इतर वस्तूंबरोबर २५/३० पाकिटंही सापडली. प्रत्येकात काही फोटो आणि त्यांच्या निगेटिव्ज होत्या. सगळेच फोटो अश्लील ह्या सदरात मोडतील असे होते. सगळ्या फोटोतील बाई एकच होती, पुरुष मात्र वेगवेगळे होते. प्रत्येक पाकिटात एक कार्ड, त्यावर त्या पुरुषाचं नाव, पत्ता इ. लिहिलेलं होतं." हे ऐकताना नटकिनचा चेहरा पांढराफटक पडला! स्माइली पुढे म्हणाला "आम्हाला असं कळलंय की ही बाई मासिकात जाहिराती देऊन पुरुषांना आपल्या जाळ्यात पकडते, आपल्या साथीदाराच्या मदतीने त्यांच्या नकळत असे फोटो काढवून घेते आणि मग त्यांच्याकडून अमाप पैसे उकळते. मि. नटकिन, मला अगदी नाइलाजानं सांगावं लागतंय की तिथल्या पाकिटात आम्हाला तुमचंही नाव-पत्ता आणि फोटो सापडले."