"विसू...; ए विसू ...." "कुठे जातो हा मुलगा देव जाणे"- विश्वासची आई कावलेली होती.
घरभर शोधत ती अंगणात येऊन पाहते तर छोटा विश्वास वडाच्या झाडाखाली बुंध्याला टेकून बसलेला.
"अरे, शाळेची वेळ होतेय, चल जेवायला पटकन. आणी हे काय ? अजून कपडे नाही बदललेस तू ?"
"काय झालं सूनबाई ?" "बघा नं, काय खुळं भरलंय ह्याच्या डोक्यात.... सारखा त्या झाडाखाली बसलेला असतो."
"असू दे गं, त्याला बरं वाटत असेल झाडाखाली बसायला !" "अहो पण काळ वेळ काही आहे की नाही ?"
आजीने आपली बाजू घेतली की आई जास्तच तणतणते हे विश्वासला माहीत होते. अनिच्छेनेच तो उठला व कपडे बदलायला खोलीत गेला. दप्तर भरून जेमतेम चार घास तोंडात कोंबत त्याने घर सोडले. शाळेला उशीर झाला असता तर मारकुट्या मास्तरांनी परत फोडून काढले असते. कधी गृहपाठ नाही केला तर कधी एखादे पुस्तक वा वही विसरला म्हणून मास्तर विश्वासला रोज प्रसाद देत असत. त्याच्या नशिबाने आज राघू चे बाबा सायकलवर राघूला घेऊन जाताना दिसले मग त्यांनी विसूलाही बसवून शाळेत पोहचवले.
आज विसूची पेन्सिल घरी राहिलेली व मास्तरांच्या छड्यांची पुनरावृत्ती झाली. मास्तर वडाच्या पारंबीची छडी घेऊन येत. बहुदा रोज वरची साल काढल्याने ओली असे व चांगली सणसणीत लागे. आज त्यांचे सर्व काही सुरळीत असावे म्हणून विश्वासची ढुंगणावरच्या दोन फटक्यातच सुटका झाली. पण नंतर दात ओठ खाणारा विसू त्र्यंबक मास्तरांच्या नजरेतून सुटला हे त्याचे नशीब. "तुझी बहीण बघ किती व्यवस्थित आहे... नाही तर तू घोड्या, गाढवासारखा चरतो तरी अक्कल येत नाही." मास्तरांचे बोल पारंबीच्या फटक्यापेक्षा विसूला जास्त झोंबले. पोरं फिदी फिदी करून हसत होती हे त्याला रुचत नसे... पण त्यालाही त्यांच्यावर तसे हसायचा मोका मिळायचा. त्र्यंबक मास्तरांचा वर्गात कोणीच लाडका नव्हता !
राघू मात्र कमी बोलणी ऐकी व मारही कमी खायचा, म्हणून मास्तरांकडे त्याचा भाव जरा जास्तच वधारलेला असे. फळ्यावर गणीत सोडवायला किंवा आकृती काढायला मास्तर त्यालाच पुढे बोलवत. मग राघू पूर्ण वर्गाकडे तुच्छतेने बघत जागेवर जाऊन बसे. विश्वासला त्याच्या हुशारीचे वाईट वाटत नसे पण तो ज्या रितीने सर्वांकडे बघे ते त्याला आवडत नव्हते, म्हणून राघू त्याच्या कंपूतून कटाप होता.
************************************
राजाभाऊ वैद्यांचा मुलगा सुभाष मितभाषी होता- शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला रेल्वे खात्यात नोकरी लागली. राजाभाऊ आडनावाने व पेश्यानेही वैद्यच होते. सुभाषनेही वैद्यकी पेशा पुढे चालू ठेवावा असे त्यांना वाटे परंतू पत्नीचा - सुभाषच्या आईचा त्याला विरोध होता. "तुम्ही जन्म वेचला लोकांसाठी, धड दोन वेळचे अन्न तरी पोटात गेले का ?" हा तिचा आवडता प्रश्न असे.... सुभाषलाही त्या जडीबुटीशी सुरुवातीपासूनच आत्मीयता वाटत नसे. तो नोकरीला लागल्यावर जरा बरे दिवस त्या कुटुंबाने पाहिले. थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर राजाभाऊंनी गरीब घरातल्या पण सोज्वळ मुलीशी सुभाषचे लग्न लावून दिले. वसुधा गरीब घरातली असल्याने मेहनती व काटकसरी होती. नव्या लक्ष्मीची पावले घरात येताच सुभाषला बढती व रेल्वेचे निवास मिळावे हा योगायोग खचीतच नव्हता. वसुधाने दोन मुलांना जन्म दिल्यावर कुटुंब पूर्णत्वाकडे होते न होते तोच राजाभाऊंना देवाज्ञा झाली. आशा शाळेत जायला लागलेली होती तर विश्वास रांगण्याच्या तयारीत होता. वैद्य कुटुंबाचा कर्ता पुरूष व गावातला एक भला माणूस हरपला होता.....
************************************************
"आजी हा बघ ना माझी वही खेचतोय...." आशाने विसूची तक्रार मांडली "आशू तू दुसऱ्या खोलीत जाऊन बस !" वसुधा स्वयंपाक खोलीतूनच ओरडली."मीच सारखं का ऐकायचं ...." असं काहीस अस्पष्टसं बडबडत आशू तेथून उठली. "विसू बाबा आल्यावर त्यांनाच नाव सांगते थांब तुझे" " बाबांना माझे नांव माहीत आहे-" तो वाकुल्या दाखवत तिला म्हणाला. "अरे बाळ असे मोठ्या बहिणीला म्हणू नये !" आजी सारवा सारव करीत होती......