अमेरिकायण! (भाग १४: शिकागो ३)

मिलेनियम पार्क म्हणजे अनेक नॅशनल पार्क्सप्रमाणे फक्त उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, खेळणारी चिमुरडी वगैरे असा जर (माझ्यासारखा) समज असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे. हे पार्क म्हणजे आधुनिक सार्वजनिक स्थापत्याचा उत्तम नमुना म्हणावं लागेल. अगदी नुकतंच २००४ मध्ये या पार्कला हे नवीन रूप देण्यात आलं. म्हणजे इथे झाडं वगैरे आहेतच पण इथल्या तीन महत्त्वाच्या जागा म्हणजे, 'प्रिट्झकर पॅव्हेलियन', 'क्लाउड गेट' आणि 'क्राऊन फाउंटन'. या तीनही जागा आपापल्या प्रकारात 'एकमेव'('युनिक') आहेत .

'प्रिट्झकर पॅव्हेलियन' नाव ऐकलं तेव्हा माझ्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पुढे हे कोणा 'जय प्रिट्झकर'ने उभारलंय वाचल्यावर तर हे म्हणजे माझ्यासारख्या ज्याच्यापुढे 'कर' जोडावे अश्या आडनावाच्या मराठी महाभागाचं नाव आहे की काय अशी शंका चाटून गेली. पण तिथे पोहोचताच त्याचं स्पेलिंग बघून हा कोणीतरी रशियन असावा असं वाटलं (शोधा अंती हा व्यक्ती ज्यु-युक्रेनियन संकर असलेली अमेरिकन व्यक्तीच निघाली). तर हे पॅवेलियन ऍल्युमिनियमच्या पत्र्यांनी सजवलं आहे. बसायला काही जागा आणि बाकी ऍल्युमिनियमच्या रॉडखाली असलेलं खुलं मैदान असं याचं स्वरूप. याला स्थापत्यदृष्ट्या महत्त्व असलं तरी एक सुबक रचना यापलिकडे मला तरी काही कळत नव्हतं. पण यातील तांत्रिक बारकावे जरी कळले नाहीत तरी ही एक वेगळं आणि सुंदर रचना आहे हे जाणवत होतच!

दुसरं कलात्मक ठिकाण म्हणजे क्राउन फाउंटन. आधुनिक तंत्रज्ञान, अजोड कला आणि उत्तम स्थापत्य यांचा संगम म्हणजे यांचा संगम म्हणजे हे कारंजं. याचं वर्णन करून शब्द वाया घालवण्यापेक्षा ही खालील चित्र बघा म्हणजे कळेल मी हे का म्हणतोय. (जेव्हा मी शिकागो लिहायला घेतलं तेव्हा मला जाणवलं की सारं काही शब्दात बांधणं शक्य नसतं किंवा निदान मला शक्य नाही. या काही गोष्टी आहेत त्याचं हुबेहुब वर्णन करून डॉळ्यासमोर प्रतिमा उभं करण्याचं कसब वृद्धिंगत करायला बराच वेळ जाईल तो पर्यंत ह्या चित्रांवरच काम चालवून घ्या  . दुसरी एक गोष्ट, या तीनही जागांबाबत मिळालेली तांत्रिक माहितीही तितकीच रोचक आहे.)

>;

मला विचाराल तर या तिघातील सर्वात प्रेक्षणीय कलाकृती म्हणजे क्लाउड गेट - मेघद्वार. हे दोन कारणांनी मला आवडलं. एक म्हणजे याचा वास्तुविशारद आहे "अनिश कपूर" (एक भारतीय नाव अनेक गोष्टी उगाचच जवळच्या आहेत असं वाटायला लावतं. त्यात इथे तर खरोखरच जबरदस्त कलाकृती समोर असताना भारतीय असल्याचा कोण अभिमान होतो म्हणून सांगू) . आणि दुसरं म्हणजे याचा आकार! पारा ही आपल्या बऱ्याचदा दिसणारी गोष्ट. त्याचा एक थेंब एखाद्याला द्वार वाटू शकतं हेच आधी अचाट आणि इतकं चकचकीत स्टिल वापरून ती कल्पना तितक्याच ताकदीने प्रत्यक्षात आणणं हे अतिअचाट!! हे सगळं मला तरी जबरदस्त वाटलं. त्या द्वारामध्ये पडणारं आपलं प्रतिबिंब, मागची शिकागोची आकाशरेषा, वरच्या आरस्पानी आकाशाचं प्रतिबिंब आणि हे सगळं अतिशय देखणं आहे.

    

पण ही सगळी अतिप्रिय पर्यटनस्थळे असल्याने तिथे रेंगाळायला फार जागच नव्हती आणि त्या गजबजाटात लक्षात राहिल असं काहीच घडलं नाही. अरे हो!, एक घडलं मी या मेघद्वाराजवळ अमेरिकेत पहिल्यांदाच बगळा पाहिला  . (बगळ्याचं सोडा, तुम्हाला खोटं वाटेल पण मी अजूनही इथे कावळा पाहिलेला नाही. कॅलिफोर्नियामध्ये कावळे आहेत असं ऐकून आहे. एकदा बघायला जाईन म्हणतो  बाकी अमेरिकेत कावळा असतो का? )

तर या बागेनंतर आम्ही नेव्ही पिअर ला गेलो. हे मिशिगन सरोवराच्या किनाऱ्यावर बनवलेलं एक करमुणीचं केंद्र आहे. तिथे निरनिराळे खेळ आहेत, शॉपिंग सेंटर आहे (हे हवंच), बाग आहे, चांगली हॉटेल्स, पब्स झालंच तर चांगले बॅंड असलेले  बार, डिस्कोथेक्स सारं काही आहे. इथे आम्ही मुंलांसारखे प्रत्येक खेळात बसून घेतलं. गोल गोल फिरवणाऱ्या चक्रापासून ते अतिशय मोठ्या आकाशझुल्यापर्यंत प्रत्येक खेळात हात धूवुन घेतला. बऱ्याच दिवसांनी असं लहान होऊन जाम मजा आली. जसजसा सूर्य मावळतीला गेला तसं आम्ही मिशिगन लेकमध्ये फिरवून आणणाऱ्या बोटीत शिरलो. सूर्य विझला आणि शिकागो एकदम प्रकाशमान झालं. सूर्यप्रकाशात स्पष्ट दिसणारी  आकाशरेषा आता त्यातला तपशील लपवून केवळ नक्षीकाम हिऱ्यामाणकांनी मढवल्यासारखी लखाखत होती. शिकागोची आकाशरेषा मात्र मला न्यूयॉर्कच्या आकाशरेषेपुढे फिकी वाटली. या बोटीतील छान सफरीनंतर रात्री जेवायला आम्ही 'दिवान स्ट्रीट'वर गेलो. या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे रस्त्याच्या एकीकडे भारतीय तर दुसऱ्याबाजूला पाकिस्तानी दुकाने आहेत. पण एकूणच अपेक्षेप्रमाणे इथे आल्यावर फार वेगळं वाटलं नाही. मात्र इथे खाल्लेल्या हैद्राबादी बिर्याणीची चव मात्र अजून जिभेवर रेंगाळाते आहे. (हे हैद्राबाद भारतातीलच असावं ).

दुसऱ्या दिवशी सकाळी मी एकटाच त्या चायनिज आजीबाईंकडे आठवणीने 'हर्बल टी' नावाचा बिनदुधाचा काढा प्यायला (बाकीच्यांना कल्पना होती तो कसा असतो. पण म्हटलं आजी वाट बघत असतील). सकाळी त्या दुकानात फारशी गिऱ्हाईकं नव्हती. त्या आजीने मी आलो या आनंदात चहा कसाबसा गिळून झाल्यावर एक उदबत्ती दिली (हव तर धुपाचं कांड म्हणा) आणि एका कागदाखालून डोळे मिटून फिरवायला सांगितली. त्या कागवर काही चायनिज अक्षरं उमटली. ती वाचून आजीबाई फार खुष. मला म्हणाल्या "यू आर गोइंग टू बिकोम फ़ेमाऽऽस". मीही त्या भविष्याने खुप खुश झाल्याचं दाखवलं. तसं त्या आजीने एक गोळी काढून दिली. खरं सांगतो, मला माझी पणजी लहानपणी द्यायची ना तसली चंद्राच्या आकाराची लिमलेटची गोळी दिली. मी त्या आजीवर जाम खुष! त्या माझ्या आनंदात (असल्याचा फायद घेऊन की काय देव जाणे) आजीने अजून एक नको असलेली वस्तू खपवलीच  . नंतर आम्ही 'शिकागो नदी'च्या पात्रातून असणारी स्थापत्य विहार यात्रा (आर्किटेक्चरल टुर) करायला गेलो. अत्यंत बुद्धु गाईडमुळे चांगल्या प्रकल्पाची कशी वाट लागू शकते याचं जातीवंत उदाहरण. केवळ शिकागो बघायसाठी म्हणून या टूरवर जाणार असाल तर नक्की जा, पण माहिती मिळावी या उद्देशाने जाणार असाल तर ही टूर म्हणजे अपेक्षाभंग ठरलेला आहे.

असो! तर या शिकागोने एक महानगरही, प्रशस्त रस्ते, उत्तम वाहतूकव्यवस्था, स्वच्छता यासारख्या घटकांनी बनलेलं असू शकतं हे दाखवून दिलं. आधी म्हटल्याप्रमाणे जातिवंत खानदानीपणा आणि सौदर्य यांनी जागोजागी नटलेल्या या शहराला निघताना मी सलाम ठोकला. दोनच दिवस होतो, पण या शहरात अजून बरंच राहावं अशी इच्छा निर्माण करण्यात हे शहर १००% यशस्वी ठरलं. का कोण जाणे पण परतताना, पुन्हा हे शहर कधी दर्शन देईल का याची रुखरुख लागली होती.

ऋषिकेश

१. मी इथे ती तांत्रिक माहिती देत नाही कारण 'अमेरिकायण!'चं स्वरुप मला एक 'अनुभवशृंखला'च ठेवायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर त्या तांत्रिक माहीतीवर वेगळं लिहायला आवडेल