अमेरिकायण! (भाग १३ : शिकागो२ - शहराच्या अंतरंगांत)

"I give you Chicago. It is not London and Harvard. It is not Paris and buttermilk. It is American in every chitling and sparerib. It is alive from snout to tail" खरय हे! शिकागो हे अत्यंत जिवंत शहर आहे! गर्दी बऱ्याच शहरात असते पण शिकागोत जाणवतो तो जातिवंत खानदानी जिवंतपणा क्वचितच कुठे जाणवला असेल. एखादं मद्य अतिशय जसं हळूहळू चढतं तसं हे शहर तुमच्यात हळूहळू भिनू लागतं. या शहराला एका शब्दात बसवायचं तर त्याच वर्णन "सुबक" असं करावं लागेलं. इतके प्रशस्त रस्ते तेही शहराच्या मुख्य भागात (डाऊन टाऊन) फार क्वचितच असावेत. नाक्यानाक्यावर कलात्मक शिल्पांनी नटलेलं हे शहर दोन दिवसात बांधणं थोडं कठीणच होतं.

सकाळी आधी नाश्ता उरकायचा म्हणून 'डंकीन डोनटस' गाठलं. तिथे न्याहरी होतेय न तोच एक चायनीज आजीबाई तुरुतुरू चालत माझ्याकडे आल्या आणि विचारलं झालं का शिकागो फिरून. मला कळेना असं का विचरताहेत मला. पण त्यांच्या वयाकडे पाहून तरी काही धोकादायक न वाटल्याने त्यांना सांगितलं की व्हायचय बघून! तशा त्या खुलल्या आणि म्हणाल्या चल! म्हंटल आता ह्या कुठे नेतायत ते देव आणि त्या आजी जाणो. म्हणून मित्राला बरोबर घेऊन त्यांच्यामागे गेलो. त्या आजी शेजारच्याच एका छोट्या दुकानात घेऊन गेल्या आणि आम्हाला $१४ ची तिकिटे दाखवली. ही तिकिटे घ्या आणि पुढच्या ४८ तासात कुठेही फ़िरा. हे तिकिट कोणत्याही सार्वजनिक वाहतून व्यवस्थेला कितीही वेळा वापरता येतं. (आत्ता कळलं त्या आजींचं हे दुकान होतं, त्या गिऱ्हाईक घेऊन आल्या होत्या  ). अमेरिकेत आल्यापासून इतक्या ठिकाणी इतक्या गोष्टी विकत घेतल्या तरी कुठेही विक्रेता आपणहून जाहिरात करताना दिसला नव्हता. "आहो हे इथे घ्या आमच्याकडे हे स्वस्त आहे" वगैरेचा प्रश्नच नव्हता. इथे बऱ्याच दिवसांनी त्या आजींनी, बाहेरगावी रिक्षावाले-हॉटेलवाले जसं गिऱ्हाईक टिपून ठेवतात ना त्याची अमेरिअकन (खरतर चायनिज) झलक दाखवली. आम्ही कार्डे घेतली आणि आजीबाईंचं आता चहाची चव बघता का असं चालू झालं. मी स्वतः चायनिज हर्बल टी बनवते असं त्यांनी सांगितलं. किंमतही फार नव्हती. आणि त्या आजींच्या डोळ्यातला उत्साह पाहून नाही ही म्हणवेना. पण  नुकतीच कॉफी झाल्यामुळे उद्या नक्की असं आश्वासन देऊन आम्ही बाहेर पडलो.

पहिला टप्पा होता शेड मत्सालय. १९३० साली एच.जी. शेड्ड नावाच्या 'रिटेल व्यावसायिकाने' शिकागो शहराला भेट म्हणून हे मत्सालय बांधलं. अटलांटाचं मत्सालय होईपर्यंत हे जगातील सगळ्यात मोठं बंदिस्त मत्सालय होतं. यात जवळजवळ २५,००० मासे आहेत (माहितीपत्रक जिंदाबाद.. नाहीतर एवढं कुठे लक्षात असायला). हे पहायच्याआधी आमचं लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या मागे असणाऱ्या विशाल सरोवराने, खरंतर त्या पाण्याच्या रंगाने. आत्तापर्यंत वेगवेगळ्या रंगांचं पाणी पाहिलं आहे पण हा रंग न भुतो (अन कदाचित) न भविष्यती असा होता. याल निळा म्हणणं म्हणजे त्या सरोवराचा अपमान आहे. निळा-हिरवा-मोरपिशी... अहं हा तर खास मिशिगनी रंग! डोळांचे पारणे फेडणारा. कितीही डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला तरी न साठणारा. एक जिवंत रंग!! हे संपुर्णपणे अमेरिकेत असणारं गोड्या पाण्याचं महासरोवर. खरंतर भुमध्य सागर म्हणाना . यात तऱ्हे तऱ्हेचे खेळ चालले होते. आमचं वेळपत्रक विस्कटत होतं पण पर्वा होती कोणाला. त्या निळाईने इतके मंत्रमुग्ध झालो होतो की पाय आपोआप त्या सरोवरा कडे वळले. त्या थंडगार पाण्याला स्पर्श केला आणि मगच बरं वाटलं. इथे बराच क्लिक्लिकाट करून घेतला. पण जो रंग डोळ्यांना दिसत होता आणि आमच्या स्मृतीत कायमचा आहे तो त्या बिचाऱ्या यंत्राला एकाही छायाचित्रात साठवता आला नाही. काहीकाळ त्या काठावर बागडून आम्ही पुन्हा शेडभाउंच्या शिकागो भेटीकडे वळलो.

                                

मत्सालय असो नाहीतर संग्रहालय काही उत्सुकतेचे क्षण सोडल्यास केवळ पायपीट असते अशी माझी ठाम समजूत आहे. (पण नंतर तिथे जाऊन आलेल्या लोकांनी छळू नये म्हणून जायचं झालं , इती: पु.ल.) शेड मत्सालयही याला फार अपवाद वाटलं नाही. काही नानरंगी मसोळ्या काही काळ रिझवत होत्या पण पुढेपुढे सगळ्या मासोळ्या साधारण सारख्याच भासत होत्या. इथे खुप लहानग्यांची वर्दळ असेल असा आपला माझ अंदाज, पण जाणवेल इतकी गर्दी मोठ्या पर्यटकांचीच होती. वेगवेगळ्या पिंजऱ्यांसमोरून जाता जाता (हो! पिंजरेच ते, काचेची पात्र असली तरी त्या माश्यासाठी पिंजरेच) एक मासा फुगलेला दिसला, तिथल्या एका लहानग्याने काचेवर टक टक केले. तर त्याने काहीतरी काळा स्त्राव काचेवर थुंकला. ते मूल तर घाबरलच पण मलाही भीती वाटली. तो मासा त्यांना बंद केरून ठेवणाऱ्या समस्त मानवजातीवर थुंकला आहे असं काहिसं अजब माझ्या मनात लकाकलं .  अशीच मजलदरमजल (मजला दर मजला) करत आम्ही पेंग्विनच्या पिंजऱ्यासमोर आलो. मी या जीवाला पहिल्यांदाच पाहत होतो. अगदी गोंडस जीव. त्यांच ते चालण पाहून मला चार्ली चॅपलीनची आठवण झाली. (आणि त्यांना त्या काचेमागे पाहून 'हॅपी फिट' ची आठवण आलीच.) पुढे डॉलफिनचा शो होता. या माश्याला असं काही शिकवतात की ज्याचं नाव ते! त्या प्राण्याने अनेक खेळ अगदी लीलया करून दाखवले. त्यातल्या एका मोठ्या माशावर तर बच्चेकंपनी तर जाम खुश होती. इथे आम्ही पहिल्यांदा मनसोक्त शिट्या ऐकल्या आणि मारल्या. लावणी एखाद्या नर्तकीने टेचात सादर करवी आणि पिटात लोकांनी शिट्या, हवेत उंचावलेले फेटे, टाळ्यांनी थैमान घालावं त्याचच अमेरिकन रुपांतर इथे दिसलं. त्या माश्यच्या एकेक उडीला शिटी, टाळ्या, भिरकावलेल्या टोप्या यांनी दाद मिळत होती. ते प्रशिक्षकही वन्स मोअर ला आनंदाने दाद देत होते. त्या कोंडलेल्या माश्यांना बघून बघून आलेली खिन्नता या खेळाने पळवून लावली. त्या डॉलफिनला अच्छा करून आमचा मोर्चा पुढच्या टप्यकडे वळवला

सिअर्स टॉवर.. अमेरिकेतील सर्वात उंच इमारत.. आणि काही बाबतीत जगातीलही ! मला वैयक्तिक दृष्ट्या या टॉवरवर जाण्यची खुप इच्छा बरेच दिवस होती. १९९८ पर्यंतचा जगातील मानवनिर्मित सर्वोच्च वास्तूच्या टोकावर जायचच असं मी ठेरवूनच आलो होतो. त्यामुळे हॅनकॉक टॉवरवगैरेच्या भानगडित न पडता चलो सिअर्स अशी घोषणा केली (जॉन हॅनकॉक टॉवर हा शिकागोतील द्वितिय उंच टॉवर. येथून शिकागोचा परिसर जास्त नयनरम्य दिसतो असं ऐकून आहे. पण शेवटी सर्वोच्च ते सर्वोच्च तिथे मला जायचच होतं). मला या टॉवर्स बद्दल आवडलं तो म्हणजे त्यांचा आकार. शिकागोमध्ये अनेकोत्तम वास्तु-शिल्प जागोजागी दिसतं पण इतक्या मोठ्या वास्तुचं निर्माण करतानाही त्या वास्तूला इतका अनोखा आकार दिला आहे की बस्स!. मला तर हा आकार आजच्या समाजाचं चित्रण वाटला. एकमेकांच्या आधाराने ताठ उभा असलेला समाज. एकमेकांच्या आधाराने एकमेकांपेक्षा वरचढ ठरू पाहणार समाज. अत्यंत स्पर्धात्मक तरीही एकमेकांना पकडून प्रगती करणारा समाज. सतत सर्वोच्च असावं म्हणून उत्तरोत्तर नवी उंची गाठणारा अत्यंत आधुनिक समाज. त्या इमारतीचं आधुनिक रुपडं मला त्याच्या अजून जवळ घेऊन गेलं.

                                                                                                    

या टॉवर्स वरून दिसणारं दृश्य म्हणजे तर अनिमिष अनुभव. एकीकडे दुरदुरपर्यंत पसरलेली अमेरिका, एका बाजूला देखणं शिकागो, एकीकडे क्षितिजापर्यंत पसरलेला मिशिगन लेक, आणि एकीकडे त्या लेकला भेटायला जाणारी शिकागो नदी! आपल्या प्रत्येक बाजुने डोळे तृप्त करणारा हा टॉवर झकासच! काही ठिकाणं माणसातल्या न्यूनत्वाची भावना प्रबळ करतात, माणूस निसर्गापुढे किती क्षुद्र आहे हे दाखवून देतात तर काही ठिकाणं माणसाचा मोठेपणा, जिद्द, कष्ट, थोरवी शब्दांशिवाय जगाला ओरडून सांगत असतात. सिअर्स टॉवर्स हे दुसऱ्याप्रकारात मोडणारं अग्रणी ठिकाण! आम्ही बराच वेळ वर रेंगाळलो. पण शेवटी भुक लागतेच ना. दुपारचा १ वाजला होता त्यामुळे त्या टॉवरवरून खाली उतरलो (एकदाचे)

मस्त जेवलो आणि पुढच्या फिरण्याची मनात जुळवाजुळव करू लागलो. आत्तापर्यंत पाहिलेलं शिकागो फार फार आवडलं होतं.. हे शिकागो उत्तरोत्तर आनंदच देईल अशी आशा मनात ठेवून आम्ही पुढे मिलेनियम पार्कला जायला तयार झालो..

(क्रमशः)
ऋषिकेश

टिपः शु.चि.बाबतची सद्ध्या नेहमीची झालेली टीप..क्षमस्व!