दिवाळी अंक २००९

शून्यता

बैरागी

शून्यता ब्रह्मांड सामावेलशी
या इथे नाही कुणी नाही कुणी
भास नाही अन् विरोधाभासही
सादही नाहीत अन् पडसादही
शब्दही नाहीत अन् नि:शब्दही
इंद्रिये नाहीत अन् जाणीवही
वाटते आहे नको नेणीवही

केवढी ही शुद्ध आहे शून्यता ....

शून्यता ब्रह्मांड सामावेलशी
या इथे नाही कुणी नाही कुणी
कुट्ट काळोखात चिणलेल्या प्रकाशाची नसे चाहूलही
एक होता काळ जेव्हा नांदल्या आकाशगंगा
तारकांच्या किलबिलाटाने उभे ब्रह्मांड होते जागते
धूमकेतूंची कितीदा व्हायची वारी इथे
यायची अन् जायची उल्कांची कितीदा गलबते
पण अता नाही कुणी, नाही कुणी

केवढी ही शून्य आहे शून्यता ....
केवढी संपूर्ण आहे शून्यता....