दिवाळी अंक २००९

तमाशा घुंगरांचा

कमलेश पाटील

चेहऱ्यावर दररोज नवा रंग लावून
मी माझा रंगच विसरून गेले;
घुंगरांच्या खळखळणाऱ्या तालावर
मी आयुष्य नाचवत गेले.
मोहाच्या एका नाजूक क्षणी
आई माझी वाहवत गेली;
प्रियकराच्या मुखवट्यातल्या गिऱ्हाईकामुळे
तिची स्वतःचीच फसगत झाली.
नाचणाऱ्या आईला शिक्षा म्हणून
नाइलाजाने जन्म माझा झाला.
इतरांसारखा 'माझा बाप कोण' -
प्रश्न हजारदा विचारून झाला.
बालपणीचा काळ संपता
तारुण्याची चाहूल लागली;
डोळे उघडलेल्या पाखराला तेव्हाच
कोठ्यावरचा वेदनांची जाणीव झाली.
कळीचे नाजूक फूल उमलता
भ्रमर भोवती भिरभिरले;
बहरणाऱ्या माझ्या तारुण्यावर
किती रावांचे रंक झाले.
माझ्याच शरीराचा बाजार का?
देवाला मी उत्तर नेहमीच मागते.
दुःखाने आक्रंदणारी ती मी
माझ्याच मनाच्या थडग्यात राहते
आयुष्याच्या जीवघेण्या संध्याकाळी,
भूतकाळ सारा आठवताना;
वर्तमानात माझीच मुलगी
घुंगरे तिच्या नशिबाची बांधते.
झुरते माझ्यातलीसुद्धा आई
पोटच्या पोरीला पोटासाठी नाचवताना;
भिनलेली तमासगिरीण व्यवहारी;
माझ्यातली आईच व्यापून टाकते.
आज आम्ही दोघीसुद्धा
फडावर एकत्र नाचतो,
मायलेकीचं नात विसरून
तमसगिरिणीच जिणं जगतो..