दिवाळी अंक २००९

रात्र होती...

अजब

खूप ती अंधारणारी रात्र होती
अन पहाटेला भिणारी रात्र होती...

चांदण्याचा लेपही खोटाच होता
सोंग घेउन फसवणारी रात्र होती...

मी चुकीची पावले चालून गेलो
की चुकीचे वागणारी रात्र होती?...

एकटक शून्यात होती नजर माझी
सोबतीने जागणारी रात्र होती...

सारखा का मी कुशीवर वळत होतो;
एवढी का टोचणारी रात्र होती?...

'अजब' इतकी वादळे घेऊन आली
स्वप्नदेखिल उधळणारी रात्र होती...