दिवाळी अंक २००९

...जीव रमवायला !

प्रदीप कुलकर्णी

येत नाही कुठे, जात नाही कुठे मी तसा एरवी...जीव रमवायला !
मात्र केव्हातरी वाटतेही मला, एक जागा हवी...जीव रमवायला !

ऐलतीरासही, पैलतीरासही हे कळावे कसे अन् कळावे कधी ?
वाहते, वाहते, वाहते सारखी, वाहते जाह्नवी...जीव रमवायला !

मैत्रिणीला तरी काय सांगायचे, काय बोलायचे, हे खरेही; तरी -
- पाहिजे सोबतीला कुणी एक साधीसुधी, लाघवी...जीव रमवायला !

तीच ती माणसे, तेच ते चेहरे, गावगप्पा शिळ्या अन् कुचाळ्या जुन्या...
शोध आता तरी, शोध कोठे तरी, शोध मैफल नवी...जीव रमवायला !

झाड निष्पर्ण आहे कधीपासुनी हे उभे एकटे, एकटे, एकटे...
वाटते खूप, यंदा फुटावी जराशी तरी पालवी...जीव रमवायला !

चोचलेही म्हणा, थेरसुद्धा म्हणा, जे तुम्हाला हवे ते म्हणावे तुम्ही...
याच जन्मात साऱया सुखांच्या मला घ्यावयाच्या चवी...जीव रमवायला !

पुस्तके आवडीची, चहा सारखा, सूर स्वर्गीय काही, सुगंधी कुप्या..
याहुनी जास्त काही कशाला हवे ? या चिजा वाजवी...जीव रमवायला

जीव कंटाळतो खेळताना जरी त्याच शब्दांसवे, त्याच अर्थांसवे...
तेच गाणे पुन्हा गात, कवितेकडे हा निघाला कवी...जीव रमवायला !

मावळू लागले राग सारेच माझे, नको सूर आता चढा कोणता...
शेवटी शेवटी वाटते की, बरी आपली भैरवी...जीव रमवायला !