दिवाळी अंक २००९

भैरवी

चैतन्य दीक्षित

ही न रे मैफिल अशी संपायची,
भैरवी आहे अजूनी व्हायची ॥धृ॥

ऊन श्वासांचे निमाले षड्ज आताशा कुठे,
स्पर्श-मध्यम लागले आहेत आताशा कुठे
रोमरोमी आग आहे पंचमी लागायची ॥१॥

सूर आरोही तशी रे तापलेली ही तनू,
जुळुनिया आल्या सतारी, वाजती अन् रुणुझुणू
ताल आहे धुंद भवती, सम असे साधायची ॥२॥

रातराणी ऐन तारुण्यात ही येते पहा,
चांदणेही आगळ्या कैफात हे नेते पहा
वेळ ही आहे स्वतःला पूर्ण रे विसरायची ॥३॥

लागु दे सस्वरसमाधी, अजुन थोडा थांब रे,
आपल्यासाठीच आहे रात्र झाली लांब रे
भैरवीची वेळ, राजा, अजुन आहे व्हायची ॥४॥