दोन अवस्था
सतीश वाघमारे

१.
किती रुसावे किती फुगावे - कधी लाजरे रूप दिसावे
वाट पाहतो मला पाहुनी एकदातरी तिने हसावे !
झंकारुन ते तिने हसावे, उरात भलते-सलते व्हावे
कधी आठवुन तिला मनाने पिसासारखे हलके व्हावे
असे असावे तसे नसावे चौकटीत ते कसे बसावे
वेड लावते दोन जिवांना - खरेच का हे प्रेम असावे ?
२.
इथे दुखावे तिथे खुपावे असे काहिसे रोजच व्हावे
माडीवरती स्वस्थ पडावे - जग बाजूने वाहत जावे
हाती थोडेफार मिळावे, बरेचसे अधुरेच रहावे
कधी आठवुन जुने-पुराणे विनाकारणे हळवे व्हावे
काय साधले, किती हरपले - चौकशीत ह्या कुणी रमावे
वेध लागले पैलतिराचे... खरेच की, वार्धक्य असावे !