दिवाळी अंक २००९

असे कसे वेड हे ,कशी आस ही जिवाला

सोनाली जोशी

असे कसे वेड हे ,कशी आस ही जिवाला, छळे कधीची
मिळेल का मज सखे हवी ती.. तुझीच संगत सदासदाची..

मला कळेना, तुला न वार्ता, इथेच खोळंबलो किती मी
तुझ्याच लाटा स्मरून भिजतो असा किनारा असे इथे मी
सुरू प्रतीक्षा अजून माझी..किती युगे ही निघून गेली
कुठेच नाही अजून वर्दी दिशादिशांना प्रकाशण्याची...

रसरसलेला तजेल श्रावण मनात माझ्या तुझाच आहे
फुलाफुलांच्या मनात बहरुन वसंत येथे तुझाच आहे
टपटपणार्‍या दवास ओल्या तुझ्यामुळे ये नशा अजूनी
अजून आहे तुझाच दर्वळ भरून सार्‍या दिशांमधूनी

धुके गुलाबी लपेटलेले कसे सभोती अजून दिसते
तुझीच काया तनामनाला शहारुनी आज धुंद करते
नभात आहे अजून तारा, अजून अंतर तसेच बाकी
मिळेल का मज सखे हवी ती.. तुझीच संगत सदासदाची..