दिवाळी अंक २००९

पिकलं पान

आरती सुदाम कदम

नावीन्याचे कौतुक सर्वांना
गातात नवलाईची गाथा
कोणी समजू शकलंय कधी
पिकल्या पानाची व्यथा ?

येणाऱ्याच्या उत्कर्षासाठी
पिकली पाने खत बनती
यांनीच घातलेल्या आदर्शांवर
नवलाईची वेल वाढू लागती

आशा असते जगण्याची
अंकुरासोबत आपले समजून
भासे जेव्हा आपण अडगळ त्यांची
आपोआप मग जाती निखळून

जीर्णता आली म्हणून पाने
निरुपयोगी वाटू लागतात
समजून जगाची रीत ती
पडतील तिथे निःसंकोच विसावतात

पुन्हा जन्मेन मी नव्याने
इथेच पालवीच्या रूपात
याच आशेवर तर गळतानासुद्धा
पिकली पाने वसंताकडे पाहतात