दिवाळी अंक २००९

ते एक वय असतं

आरती सुदाम कदम

ते एक वय असतं
शाळा नको म्हणून रडण्याचं
खेळण्यांसाठी बाबांकडे हट्ट करण्याचं.

ते एक वय असतं
भावंडांबरोबर खाऊसाठी भांडण्याचं
मार वाचवण्यासाठी एकमेकांच्या गोष्टी लपवण्याचं.

ते एक वय असतं
मैत्रिणींबरोबर हुंदडण्याचं
विनोदावर टाळ्या देत खिदळण्याचं.

ते एक वय असतं
बाबांबरोबर मैत्री करण्याचं
त्याचं समजावणं उमगून घेण्याचं.

ते एक वय असतं
बोहल्यावर उभं राहण्याचं
लग्न करून नवं आयुष्य उभारण्याचं.

ते एक वय असतं
आईबरोबर हितगुज करण्याचं
एकमेकींचे अनुभव वाटून घेण्याचं.

ते एक वय असतं
मुलांमध्ये बालपण शोधण्याचं
आठवून जुन्या गोष्टी, मनात हसण्याचं.

ते एक वय असतं
आनंदात मुलांचा संसार पाहण्याचं
लहान होऊन नातवंडात खेळण्याचं.

ते एक वय असतं
जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याचं
आनंदात जगाला अच्छा म्हणण्याचं.