मौक्तिक
उत्पल चंदावार

आपलेच सारे, आपलेच सुख,
आपलेच दुःख, मुक्तीच्याही दारी.
धरीतसे हात, वेव्हार मनीचा,
परी पडू लागे पाया, तो गरजवंत.
मनाचे उधाण, मनाचा कैवार,
मनाचे बोलणे, आवडीचे.
मन आकाश झाकोळे, मनी पाऊस पाझरे,
मन धरित्रीचे वारे, सैरभैर.
इथल्या या भिंती, मापती आकाश,
मनाच्या चाकोर्या, गगनांतरी.
मनी उमटला शब्द, होई वाल्याचा वाल्मिकी,
मनाचे मौक्तिक, सापडते.