दिवाळी अंक २००९

पाहुनी लोकांस हसणे भाग होते

कुमार जावडेकर

पाहुनी लोकांस हसणे भाग होते
औपचारिक प्रश्न पुसणे भाग होते!

उजळलेला चेहरा लपवून हाती
का तुला हे व्यर्थ रुसणे भाग होते?

चांदणे बरसून गेल्यावर पुन्हा का
पावसालाही बरसणे भाग होते?

चांदण्या रात्रीतल्या स्वप्नातसुद्धा
मी तुझ्या वचनात असणे भाग होते!

जीवनाचे गीत अनवट गात असता...
चेहऱ्यावर हास्य दिसणे भाग होते

राहिलो होतो क्षणांचा सोबती; पण-
वाट त्यांची बघत बसणे भाग होते...