दिवाळी अंक २००९

कधी कधी येणारी रात्र

मनीषा साधू

तू रात्रीची येतेस राहायला माझ्याकडे
मुलांना, नवऱ्याला खाऊ-पिऊ घालून, निजवून
चहाचे कप घेऊन गच्चीत बसतो आपण
समोर पडलेल्या अख्ख्या रात्रीकडे अधाशी पाहात
जसा कपातला चहाच देतोय अंदाज किती वेळ
पुरणार याचा...
घरगुती गप्पांचा तुझा कधीच मूड नसतो
तू सरळ उघडतेस दार आतले
आणि भळाभळा वाहू लागतेस
मी तात्काळ तितकीच तरल होऊन
तरंगण्याच्या प्रयत्नात
आजूबाजूची झाडे, कुंड्या, मंद चांदणे
हात धरून सरळ रेषेत नेत जातात आपल्याला
खाली समोरच्या घरावरल्या भिंतीवर उमटणाऱ्या
विरळ वर्दळीच्या सावल्याही विचलित करतात आपल्याला
आपण थेट आकाशात नजर लावतो मग
सुरवातीचे उपचार आटोपून बाजूला ठेवल्यासारखे
कप बाजूला ठेवून बोलता-बोलता
सतरंजीवर उश्या घेऊन लवंडतो
अख्खे चांदणे अलवार उतरते त्यानंतर
अंधारालाही धक्का लागू नये इतक्या हळुवार
आपण उचकटू लागतो आतल्या काळोखालाही
तेव्हा फक्त आपल्या दोघींची असलेली रात्र
वेणीच्या पेडांसारखी गुंफली जाते
कधी काळ्याकुट्ट तुझ्या अनुभवात
कधी त्यालाच समांतर माझ्या अनुभवात
डोळ्यातून झराझर पुढे सरकणारे सगळे शेड्स
वाचण्याचा प्रयत्न सुरूच असतो आपला
चंद्राचे ढगामागले फिकुटलेपण
आतल्या हजार गोष्टींना स्पष्ट बघण्याचा प्रयत्न
तीव्र करते
परंतु चंद्रासमोरले कुठलेही ढग जराही हलत नाहीत त्याने
उलट चंद्र अधिकाधिक फिक्कट होत जातो
अन् उताविळी तीव्र
चांदण्यांचे सगळे संदर्भ एकमेकीच्या साहाय्याने
आपण रांगोळीसारखे मांडत जातो
चमकण्याची कारणे, मीमांसा, अपयशाच्या जबाबदाऱ्या
प्रामाणिकपणे मांडत
साऱ्या गोष्टींना पुरून उरू या आवेशात
आव्हान देतो सगळ्या भूतकाळाला
काजव्यासारख्या क्षणांशाच्या चमकण्यालाही
आठवणीत पकडून एकमेकींना दाखवतो
कुतूहलाने न्याहाळतो, आनंदाने चित्कारतो
एखादीची अर्धपिकली खपली
चपकन् निघालीच अनवधानाने
तर लगेच फुंकरही घालतो
स्वतःला खूप खूप खणून दमून वर बघतो
तर खड्डा अजून पुरता खोल झालेलाच नसतो
अन् दिवस मात्र वरून डोकावून आत बघू लागलेला असतो
व्यवहाराची किरणे डोळ्यांशी फेर धरून उजेडी आणतात
आपण एकमेकींचे अर्धवट खणलेले खड्डे
भराभर भरायला मदत करतो
उजाडणाऱ्या एक-एक किरणासरशी
दिवसाच्या भूमिका चढवत जातो दागिन्यांसारख्या अंगावर
उतरवून टाकतो कालच्या विजांचे संदर्भ
नीटनेटके करतो केस, विस्कटलेल्या मनासकट
अन् जबरदस्त जांभई देत,
बेफिकिरी दाखवत झाकोळून टाकतो, गाडून टाकतो
कालचा काळोख आजच्या उजेडात