दिवाळी अंक २००९

कवेत घेणारे कुठलेही क्षण!

मनीषा साधू

अजूनही तिला कवेत घेणारे कुठलेही क्षण
ती लहान मुलाने चॉकलेट धरावे मुठीत
तसे धरून ठेवते घट्ट
अन् झोपल्यावर निसटून जातील
म्हणून रात्र-रात्रभर जागी राहते
चुकून लागलाच डोळा दिवसा
तरी परीटघडीची सभ्यता
तिला टोचून टोचून उठवते स्वप्नातून
अन् अपराध झाल्यासारखी ती
कावरी-बावरी होत, अंग आक्रसून घेत
पारंपरिक रीती-रिवाजात रमल्याचा
उत्तम अभिनय करते
तिच्या तेवढ्यानेही खुष झालेल्या
नातलगांकडे बघताना
आपणही तसेच प्रौढ झाल्याच्या व्यथा
खऱ्याच आहेत हे पटू लागते तिला
मग मात्र खरोखर अंतर्बाह्य हादरते ती
सर्व शक्तीनिशी झटकते अंग जोरदार
आंघोळ घातलेल्या कुत्र्याने सपासप झटकावे
तसे वेडेवाकडे
अन् उडवून देते नको असलेला थेंबन् थेंब मैलोगणती
रिकामी होऊन शांत बसते
हळूच चोरून आणते कुठलेतरी क्षण
आणि पांघरून घेते हळूवार
त्या क्षणांमध्ये भोगलेल्या भावना
अन् खूप अस्ताव्यस्त होऊन घेते मनामध्ये
मग आश्चर्यकारकरीत्या
खूप खूप ताकद भरते तिच्यामध्ये
दिवसभर नाचण्याची
ती नाचत राहते कुठे कुठे
वाटत राहते असे क्षण जाणीवपूर्वक कुणाकुणाला
त्यांच्या कडेलोटाच्या क्षणी
त्यांना मुठीत घट्ट धरून ठेवायला असावेत म्हणून!