दिवाळी अंक २००९

आठवण

मिलिंद फणसे

अप्सरांचा संग आहे आठवण
इंगळीचा डंख आहे आठवण

रात्रभर झोपून देईना मला
अन्‌ स्वत: नि:संग आहे आठवण

येउनी दररोज छळण्याचा मला
बांधुनी का चंग आहे आठवण ?

काय ती देईल मज दु:खाविना ?
ती स्वत:ही खंक आहे आठवण

विस्मृतीच्या शांततेला भंगते
मन्मनी वादंग आहे आठवण

ती करत नाही उद्याची काळजी
भूतकाळी दंग आहे आठवण

रोज मैफिल वर्तमानाची सजे
रोजचा बेरंग आहे आठवण

धावतो तिजला उरी धरण्यास मी
निसटते, सुट्‌वंग आहे आठवण

पांगळा करते, जखडते माणसा
जन्मभरचे व्यंग आहे आठवण

चाळवी वृद्धांस नेउ‍न यौवनी
केव्हढी अत्रंग आहे आठवण

जाळतो जो मानिनीला जन्मभर
कौरवाचा अंक आहे आठवण

भोगलेल्या भूतकाळाचे जणू
अंग अन प्रत्यंग आहे आठवण...