लग्न

त्यानं गुलाबाचं फूल तिला दिलं आणि त्याच्याकडे क्षणभर बघत तिनं ते घेतलं. गोड, लाजरं हसली ती हातातल्या फूलाकडे बघत. परत एकदा तिची नजर क्षणभरासाठी वर झाली, त्याच्या नजरेत गुंतली आणि लगेच खाली, हातातल्या फूलाकडे वळली.त्याचं हृदय धाडधाड उडू लागलं. हाच! अगदी हाच होता तो क्षण. तो क्षण ज्याची त्यानं नजाणे किती जन्मांपासून वाट पाहिली होती. ’नेहा!’ किंचित घोगऱ्या आवाजात त्यानं तिला साद घातली. ’माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझी होशील का?’

तिची नजर फूलाकडेच वळलेली राहिली, पण तिची मान अगदी हलकेच हलली. त्याच्या मनात आनंदी मोर नाचू लागले. थोडंसं पुढे झुकत त्यानं तिचा गोरागुलाबी हात हाती घेतला आणि त्यावर आपले ओठ टेकले.

त्याचवेळेस काहीतरी प्रचंड घडत गेल्याचं त्याला जाणवलं आणि त्याचे डोळे खाडकन उघडले. स्वप्न तुटलं. त्याचं सर्वांग घामाघूम झालं होतं. हृदय खरंच कुठूनतरी लांबवरून पळत आल्यासारखं धडधडत होतं. आणि त्याची चड्डी चिकट ओली झाली होती.

स्वप्न भंगल्याच्या दुःखाबरोबर अद्वैतला भयंकर आश्यर्य वाटत राहिलं. ’धिस इज इनक्रेडिबल! म्हणजे, लग्न हो‌उन सहा महिने झालेले असताना, तिचे श्वास जाणवावेत इतक्या जवळ बायको झोपलेली असताना, उण्यापुऱ्या तासापुर्वी तिच्यासोबत रत झालेलो असताना, जिला गेली सहा वर्षे पाहिलंही नाहीये तिचं स्वप्न आपल्याला पडतं आणि तिच्या हातावर ओठ टेकलेले जाणवून आपला वीर्यपात होतो...काय आहे हे?’

*

आयुष्य हा काही चित्रपट नाही, पण योगायोगांचा मक्ता फक्त चित्रपटांनी घेतला आहे असंही नाही. अद्वैतला दुसऱ्याच दिवशी याचा प्रत्यय आला.

तो ऑफिसमध्ये (काम करत) बसलेला असताना त्याचा लीड अचानक त्याच्या जागेपाशी आला आणि त्याला म्हणाला, ’अद्वैत, एक विनंती आहे.’
’आलं काहीतरी नवीन.’ अद्वैतच्या मनात आलं. पण तो नेहमीसारखाच हसून म्हणाला, ’शु‌अर. काय म्हणशील ते करीन, राम.’
राम, त्याचा लीड सुद्धा हसला आणि म्हणाला, ’तर मग जा आणि रूम-३ मध्ये असलेल्या उमेदवाराची मुलाखत घे.’
’पण, रोहित घेणार होता नं आज?’ त्यानं विचारलं.
’त्यानं डुम्मा मारलाय. न सांगता. आता जा लवकर.’
अद्वैत निघाला, पण त्याला थांबवत राम म्हणाला, ’हे बघ, तुला माहितच आहे की झेड.व्ही.क्यू. मधले एक्सपर्ट लोक मिळणं किती अवघड आहे ते. ह्या उमेदवारानं दीड वर्षे काम केलंय त्यावर. त्यामुळे उगीच खूप खोलात जा‌उ नकोस. ठीक-ठीक प्रश्न विचार...आणि तू आटोपलंस की लगेच भेटुया आपण. निर्णय घेण्यासाठी.’
मान डोलवत अद्वैत तिथून निघाला. आपल्याला नेमकं किती आठवतंय याचा विचार करत तो रूम-३ मध्ये ये‌उन पोचला. दार लावून तो वळला आणि एकदम कोलमडलाच!

मधली सारी वर्षे कोण्या अदृष्य हाताने पुसून टाकल्यासारखी ती तिथे बसली होती. नेहा. त्याच्या चेहऱ्यावरचे विलक्षण आश्चर्याचे भाव बघून ती छानसं हसली. स्वप्नात चालल्यासारखी पावलं टाकत त्यानं तिच्या समोरची खुर्ची गाठली आणि कसाबसा बसला. आणि लगेच त्याचे प्रश्न आले - ’नेहा? तू?? आणि इथे? तू दिल्लीला होतीस ना?’
’नोयडा.’
’अं?’
’नोयडाला होते. आता बेंगलोरला यायचं बघतेय.’
’अच्छा. अं...का?’
एक वेदना नेहाच्या चेहऱ्यावर उमटून गेली. तिची नजर क्षणभर खाली वळली. मग वर पाहत, हसण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, ’आहेत काही कारणं.’
अद्वैतला तिचं मणिंदरशी झालेलं लग्न आठवलं. आणि नंतर कधीतरी कानावर उडत उडत पडलेली बातमीही, ’त्यांचं काही फार पटत नाहीये’ अशी. पण तो गप्प राहिला. अवघडलेली शांतता पसरली दोघांमध्ये.
थोड्या वेळाने नेहाच बोलली, ’मुलाखत घेतोयेस नं?’
अद्वैत हसला आणि त्यानं तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.

बाकी मुलाखतकारांप्रमाणेच त्याचंही तिच्याबद्दल चांगलं मत झालं. त्यांच्या बैठकीत तिला रूजु होण्याची विनंती केली जावी, असं ठरलं. मग पुढच्या गोष्टी पटापट घडल्या. पैशांच्या वगैरे चर्चा आटपून काही तासात नेहा येत्या सोमवारपासून नोकरीत रूजु हो‌ईल हे देखील निश्चित झालं.

तिचं अभिनंदन करून झाल्यावर अद्वैतनं तिला हळूच विचारलं, ’नेहा, घरी येतेस माझ्या? आज संध्याकाळी?’
अद्वैतच्या हृदयाचे काही ठोके चुकण्या‌इतका वेळ घेतलाच नेहानं, उत्तर द्यायला. मग ती हलकेच ’हो’ म्हणाली.

संध्याकाळी तिच्या सोबत घरी जाताना अद्वैतच्या मनात आलं, ’ऑलवेज सो अनप्रेडिक्टेबल!’ तो स्वतःशीच हसला.

*

’माय गॉड! ही हॅज आ‌ईज ओन्ली फॉर हर!’ सायली मनातल्या मनात म्हणाली. घरी आल्यापासून तिचा नवरा त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीबरोबर बोलत बसला होता. त्यांच्या सहा महिन्यांच्या संसारात त्याला इतकं उल्हसित तिनं अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या‌इतक्या वेळेस पाहिलं होतं. त्यांच्या सोबत बसण्याचा प्रयत्न तिनं करून पाहिला होता, पण त्यांचे विषय तिच्या ओळखीचे नव्हते, आणि ती तिथं बसली काय किंवा न बसली काय, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. मुकाट्यानं आत ये‌उन सायलीनं जेवणाची तयारी करायला घेतली होती. अद्वैत आणि नेहाकडे बघत बघत तिनं जेवण उरकलं होतं. जेवण झाल्याझाल्या अद्वैत आणि नेहा बाहेर झोपाळ्यावर जा‌उन बसले होते. बोलत.
आणि एकटीनेच सगळी आवरा‌आवर करताना सायली अद्वैतला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. ’ठीके. चालायचंच... तो कोणता शब्द वापरतात सासूबा‌ई? हं...calf love! अगदी खरं आहे. नकळत्या वयातले हसीन गुंते...काही गाठी कायमच राहून जात असतात सोडवायच्या.
ठीके. खरंच. काहीतरी कायमचं हरवलेलं आणि परत कधीही गवसण्याची शक्यता नसलेलं, अचानक दिसलंय आपल्या नवऱ्याला. त्या निरागस, निष्पाप दिवसांत परत गेल्यासारखं वाटत असेल त्याला.’
ती स्वतःशीच हसली. समजूतदार. ’ह्यात मी काळजी करण्यासारखं काही नाही. आणि, नवऱ्याचा मैत्रिणीबद्दल जेलसी वगैरे बाष्कळपणा माझ्याकडून तरी व्हायला नको.’ तिनं स्वतःला बजावलं.

सगळी आवरा‌आवर झाल्यावर तिनं दिवा मालवला आणि आत, बेडरूममध्ये ये‌उन एक पुस्तक वाचत पडली. वाचतावाचता कधीतरी तिला झोप लागली. अर्धवट. तुटक तुटक.

रात्री कधीतरी तिला जाग आली. घड्याळ अडीच वाजल्याचं दाखवत होतं. बाहेरचा दिवा चालू होता आणि तिकडून बोलण्याचे आवाज येतच होते. ती बेडरूमचा दिवा बंद करायला उठली तेव्हा तिला नेहाचा हुंदकाही कानी पडल्यासारखं वाटलं. तिकडे लक्ष न देता तिनं परत पलंग गाठला आणि डोळे मिटून घेतले. ’अद्वैत शेजारी नाही, अशी ही पहिलीच रात्र.’ तिच्या मनात आलं. तिनं परत समजूतदार हसण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते ह्या वेळेस जमलं नाही. डोळे अगदी घट्ट घट्ट बंद करत, आणि बाहेरच्या आवाजांच्या दिशेने टवकारलेल्या कानांकडे दुर्लक्ष करत तिनं झोपी जाण्याचे प्रयत्न चालू ठेवले.

*

’अरे!’ घडयाळाकडे पाहून नेहा उद्गारली. ’साडेपाच वाजलेत? कसा गेला वेळ कळलंच नाही.’
अद्वैत हसला, आणि म्हणाला, ’उठ, फ्रेश वगैरे हो. मी चहा टाकतो आणि सायलीला उठवतो.’

चहा उतू जा‌ऊ नये म्हणून पातेलं हलवत असताना अद्वैतला नुकतीच उलटलेली रात्र आठवली आणि एका अनिवर्चनिय समाधानानं त्याचं मन भरून गेलं. नेहानं त्याला सगळं सांगितलं होतं. तिच्याबद्दल. मणिंदरसोबतच्या संसाराबद्दल. त्यांच्या न पटण्याबद्दल, त्यांच्या भांडणांबद्दल. रडली होती ती त्याच्याजवळ. विश्वासानं. जे त्यांच्यात त्या दिवसांमध्ये नव्हतं ते मैत्र त्याला आता तिच्याबद्दल जाणवत होतं. ’स्वतःच्या जीवावर खेळलेला जुगार हरलीये बिचारी. मोडलीये. आणि प्रयत्न करतीये उभं राहण्याचा.’ त्याच्या मनात आलं. ’तिला लागेल ती सारी मदत करायची आपण. तिचा आधार व्हायचं. नेहाचा आधार.’ त्यानं ठरवलं. पण अर्थातच, ह्या विचारांखाली खोल खोल, त्याच्या मनात अव्यक्त असं काय काय दडलेलं होतं, ते त्यालाही माहित नव्हतं.

त्याला, आणि नेहालाही कल्पना नव्हती; पण एका अटळ मुक्कामाच्या दिशेने त्यांच्या प्रवासाची सुरूवात केव्हाच झाली होती. सुरूवाती साध्या असतात बऱ्याचदा. निरूपद्रवी भासतात. तशीच ही सुरूवातही होती. मुलाखतीच्या निमित्यानं झालेली भेट, त्यानं तिला घरी घे‌उन येणं, तिनं त्याच्याजवळ मन मोकळं करणं, अशी.

आणि ह्या प्रवासात त्यांना नंतर लागत गेलेले थांबेही नेहमीचेच होते. त्यांचं एकाच टीममध्ये असणं, रामनं त्याला तिचा मार्गदर्शक म्हणून नेमणं, तिला त्यानं चांगलासा मोबा‌ईल आणि इंटरनेट प्लॅन शोधून देणं, तिच्याकरता घर शोधण्यासाठी पूर्ण शनिवार-रविवार त्यानं तिच्यासोबत वणवण फिरणं, कामाच्या बाबतीत तिनं त्याला साऱ्या शंका विचारणं, त्यानं आणि तिनं दुपारी सोबत जेवणं, सोबत कॉफी पिणं आणि रिकामे कप्स दोघांसमोर तसेच राहून त्यांनी तासतास बोलत बसणं...सारं काही तेच. नेहमीचंच. दुसऱ्या कोणाही दोघांमध्ये घडू शकणारं, घडणारं.

आणि, परिणामकतेत कुठंही उणं नसणारं.

*

आपल्याच विचारांत हरवून सायली सुन्नशी बसली होती. ऑफिसमधून आल्यावर तिनं कपडेसुद्धा बदलले नव्हते. टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम गळत होते, तिकडे तिचं लक्षही नव्हतं. तिच्या डोक्यात ती ऑफिसहून निघताना आलेला अद्वैतचा एस.एम.एस. घुमत होता. ’उशीर हो‌ईल. जेवून घे.’ बस्स. अजून काही नाही. फोन नाही, उशीराचं कारण नाही, यायची अंदाजे वेळ नाही, काहीच नाही. आजकाल असं फार हो‌ऊ लागलं होतं. आणि कोण ती नेहा यायच्या आधी असं कधीही झाल्याचं तिला आठवत नव्हतं.

ती भानावर आली, ती तिच्या मोबा‌ईलच्या वाजण्यानं. ’बापरे! सासूबा‌ईंचा फोन.’ तिच्या मनात आलं. तिनं फोन उचलला आणि प्रयत्नपूर्वक आवाजात उत्साह आणत ती म्हणाली, ’बोला, सासूबा‌ई!’
’काय, कशी आहे माझी सून?’ अद्वैतच्या आ‌ईनं, मेधानं विचारलं.
’मजेत आहे...एकदम मजेत.’ सायली उत्तरली.
काही क्षण मेधा काहीच बोलली नाही, आणि मग, ’काय झालंय सायू? काहीतरी नक्कीच झालंय. तूझ्या आवाजावरून तितकं कळतं मला. काय झालंय? मला नाही का सांगणार?’ तिनं काळजीच्या सुरात विचारलं.
सायली स्वतःला रोखू शकली नाही. ती बोलू लागली. बोलत राहिली. मनात गेल्या महिन्याभरापासून साचत राहिलेलं सारं बाहेर ओतत राहिली. ’मी काय करू ते मला समजत नाहीये सासूबा‌ई. काहीतरी दुखतंय, काहीतरी खुपतंय पण ते नेमकं कुठे ते कळत नाहीये. नीट, व्यवस्थित मुद्देसूद विचार केल्यावर सगळ्या शंका निराधार वाटताहेत पण त्या मनात ठाण मांडून बसणं थांबवतही नाहीयेत.’ हुंदका दाबत, हताश सुरात सायली म्हणाली.
’अं...मला आठवतंय हे ’नेहा’ नाव त्याच्याकडून ऐकल्याचं. काही वर्षांपूर्वी. त्याच्या कॉलेजमध्ये होती. सुंदर आणि हुशार मुली असतात तशी ’लोकप्रिय.’ बाकी आख्ख्या कॉलेजप्रमाणे अद्वैतसुद्धा तिच्या मागे होता तेव्हा.’
’मला तर कधीच काही बोलला नाही तो तिच्याबद्दल.’
’कारण सांगण्यासारखं कधी काही झालंच नाही. नुसती तोंड‌ओळख होती त्यांची. आणि ती सुद्धा चौथ्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात झालेली...सायली, केवळ ती नेहा आहे, म्हणून हा इतका वाहवत चाललाय. ठेवते मी फोन. बोलते त्याच्याशी. काळजी करू नकोस.’ मेधा म्हणाली आणि तिनं फोन ठेवला. एक उसासा सोडत तिनं अद्वैतचा नंबर लावला.

*

’अद्वैत बाळा, कुठे आहेस? किती दिवस झाले, नीट बोललोच नाही आपण.’
’ऑफिसमध्येच आहे आ‌ई...’
’का काम आहे का खूप?’
’अं... हो आहे थोडं.’
’की नेहासुद्धा आहे तिकडे म्हणून थांबला आहेस?’
अद्वैत शांत राहिला काही वेळ. मेधा सुद्धा गप्प राहिली, अद्वैतनं बोलायची वाट बघत. शेवटी एक खोलवर श्वास घे‌ऊन तो म्हणाला, ’हो आ‌ई. नेहा आहे येथे. माझ्यासोबत.’ त्याचा आनंद त्याच्या आवाजातून मेधाला जाणवला.
’काय चालू आहे बेटा? काय चालू आहे तूझं?’
’काय की. जे काही चालू आहे, ते खूप छान आहे पण.’
’अरे...’
’आ‌ई, प्लीज. आज काही सांगू नकोस. मी खूप आनंदात आहे गं. सगळं असणं झंकारून उठलंय. आयुष्य अचानक उत्फुल नाचरं झालंय.’
’पाय जमिनीवरून सुटू दे‌ऊ नकोस फक्त.’
’टेकतच नाहीयेत जमिनीवर पाय आ‌ई!’ आणि तो हसला, आनंदानं.
’आणि सायली?’
’तिचं काय?’
’काही नाही. तू आता असं विचारतो आहेस म्हणजे...’
’आ‌ई, काय हे? साधी मैत्री असू नाही शकत का माझी कोणासोबत?’
’साधी मैत्री? साधी? मी बोलले असते, साधी मैत्री असती तर? सायली रडली असती माझ्याजवळ, साधी मैत्री असती तर?’ मेधानं किंचित चढ्या स्वरात विचारलं.
’अच्छा...’ सारं समजून अद्वैत म्हणाला. ’म्हणजे तिनं सांगितलं आहे तर.’
’हो रे. खूप सैरभैर झालीये ती. का?’
’मला काय माहित का ते. विचार तिलाच.’ तुसड्यासारखा तो म्हणाला.
’धिस इज नॉट व्हॉट आय इक्स्पेक्ट टू ही‌अर फ्रॉम यू.’
’बट, धिस इज व्हॉट आय से.’ तो ठासून म्हणाला. ’हे माझं आयुष्य आहे आ‌ई. आणि ते मला हवं तसं जगू द्या तुम्ही. माझ्या आत फुलून आलेल्या ह्या आनंदाच्या झाडावर माझा काहीच हक्क नाही असं मला सांगू नका. तुम्ही दिलेले नियम पाळतच आलोय आजवर. आता जरा मी केलेल्या नियमांनी खेळून बघू द्या मला.’
’विसरू नकोस की लग्न झालेलं आहे तुझं.’
’आ‌ई, काहीच लक्षात रहात नाहीये आता. काहीच नाही. मी अजून कसं सांगू तुला? प्रत्येक खपलीखाली नवीकोरी कातडी नसते आ‌ई. काही जखमा अशाही असतात की ज्यांवरची खपली जऽरा निघाली की रक्त वाहू लागतं भळाभळा. तिची आठवण माझ्याकरता तशी जखम होती. आणि आता...जिनं जखम दिली तीच माझ्या आयुष्यात त्या जखमेचा इलाज बनून आली आहे. आ‌ई जे चालू आहे ते, मला. हवं. आहे. बस्स. मला अजून काही बोलायचं नाही, मला अजून काही बघायचं नाही.’
’अक्कल विकून आल्यासारखं बोलू नकोस. तू एकटा नाहीयेस आता. मोकळा नाहीयेस मन म्हणेल तसं उधळत जायला. अरे, तुझ्या प्रत्येक कृतीसोबत, तिच्या अर्थांसोबत आणि परिणामांसोबत सायलीसुद्धा जोडल्या गेली आहे. तुला काहीच कळत नाहीये का? जे काही तुझं चालू आहे ना, त्यात तुझा छान खेळ होतोय आणि तिचा जीव जातोय. आणि खेळाखेळात कोणाचा जीव घेण्याहून क्रूर दुसरं काहीच नाही.’
’क्रूर?’ अद्वैत हसला. ’आ‌ई, मी प्रेमात पडलोय. म्हणतात नं, ’इन द मिडल ऑफ ऍन ऑर्डिनरी ला‌ईफ, लव्ह गिव्हज् यू अ फे‌अरीटेल.’ माझ्या सामान्य आयुष्यात नेहा परीकथा हो‌ऊन आली आहे. पण... जा‌ऊ दे आ‌ई.  मी कितीही प्रयत्न केला, तरी हे सारं तुला नाही कळणार. मला काय मिळतंय आणि मला काय वाटतंय आणि कसे माझ्याकरता बाकी काही अर्थ उरले नाहीयेत...मला खरंच वाटलं होतं की तुला तरी हे समजेल. पण...’ क्षणभर तो शांत राहिला आणि मग म्हणाला, ’मला आता ह्या विषयावर काहीही बोलायचं नाही. दुसरं काही बोलायचं असेल तर सांग आ‌ई. नाहीतर मी निघतो आता. जेवायला जायचं आहे, आणि नेहा वाट पाहत आहे.’

मेधानं थरथरत्या हातानं फोन ठेवला. आलेल्या रागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत ती काही क्षण बसून राहिली. मग तिनं सायलीचा नंबर लावला.
’काय गं, जेवलीस ना? की आहेस अजून तशीच बसून?’ तिनं विचारलं.
’जेवले.’ सायली हसून म्हणाली. ’भूक लागलीच होती. आणि तुमच्याशी बोलल्यानं आधीपेक्षा थोडं बरं सुद्धा वाटतंय. बोललात ना तुम्ही त्याच्याशी?’
’हो. बोलले. पोरी, तो वाहवत चाललाय. लोक चुकतात आयुष्यात, नाही असं नाही. पण आपल्या डोळ्यातलं मुसळ आपल्याला दिसलं नाही तरी जेव्हा ते दुसरं कोणी दाखवतं त्यावेळॆस तरी मान्य करायला पाहिजे की नाही ते तिथं आहे म्हणून? त्याची याला तयारीच नाहीये.’मेधा म्हणाली. ’आता निर्णय तुला घ्यायचा आहे पोरी. वाट पहायची, त्याच्याशी बोलायचं, पाठ फिरवायची की आपला रस्ता आता वेगळा झाला आहे हे स्वत:लाच सांगायचं...तुलाच ठरवायचं आहे तुला काय हवं आहे ते.’
सायलीनं एक उसासा सोडला.
मेधा पुढे म्हणाली, ’माझा मुलगा चुकतोय. आणि जाणूनबुजून, आपलं चुकतंय हे माहित असताना चुकतोय. हे मी त्याच्याकडून कधीच अपेक्षिलं नव्हतं. इतकं लक्षात ठेव, की तुझा निर्णय काही का असेना, त्यात माझी, आमची सोबत असेल तुला.’
सायलीनं मान डोलावली. आणि काहीतरी जुजबी बोलून फोन ठेवला. राक्षसी आकार धारण करून समोर अचानक उभ्या ठाकलेल्या प्रश्नांकडे बघत ती बसून राहिली.

लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतचे सहा महिने अगदी छान गेले होते. तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा काळ होता तो. पण आता, मजेत खळखळत वाहत असलेल्या प्रवाहात एकदमच हे तिची नौका सहज बुडवून टाकू शकणारे भोवरे आले होते तिच्या समोर. आणि तिला एकटीलाच आता त्यांचा सामना करावा लागणार होता. ’निर्णय’ घ्यावा लागणार होता.

*

काही तासांचा एकांत, त्याच्या स्पर्शातली पृच्छा, आणि तिच्या नजरेतला लाजरा प्रतिसाद...अद्वैत आणि नेहाच्या प्रवासाचा अटळ असलेला मुक्काम गाठल्या गेला.

संघसहलीला गेले होते ते. बेंगलोरजवळच्या एका पंचतारांकित रिझोर्टला. दुपारच्या जेवणाची वेळ हो‌ईपर्यंत नेहमीचेच ’संघबांधणी’चे खेळ आणि जेवणानंतर संध्याकाळ हो‌ईपर्यंतचा वेळ सगळ्यांना हवे ते करण्यासाठी मोकळा अशी एकंदर योजना होती.
जेवण झाल्यावर राम आणि काहींनी पूल टेबलचा ताबा घेतला, काहींनी क्रिकेटच्या मैदानाची वाट धरली, काहींनी कॅरमभोवतीच्या खुर्च्या पकडल्या, आणि काहींनी रिझोर्टमागच्या जंगलात फिरून येणं पसंद केलं.

वातावरण सुरेखच होतं. आकाश ढगाळलेलं होतं आणि गार वारा सुटला होता. जंगलात फेरफटका मारून यावा असं अद्वैत आणि नेहा दोघांनाही वाटलं आणि ते निघाले.

पायवाटेवरून चालत चालत जंगलात आत आत जाताना त्यांचं एकमेकांशी चालू असलेलं बोलणं आपसूकच थांबलं. आसमंतातली बोलकी शांतता त्यांच्यामध्येही पसरली. वाटेतली एक चढण चढताना त्यानं पुढे केलेला हात तिनं पकडला. नंतर चालताना दोघांनी हात सोडवून घ्यायचा प्रयत्नही केला नाही.

अजून काही अंतर चालल्यावर नेहानं पायवाटेपासून थोडं आत असलेल्या एका सळसळणाऱ्या पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवलं. अद्वैतनं मान डोलावली. त्या झाडाखाली बसले दोघं. एकमेकांकडे पाहत. नजरा न हलवता.
आपल्या थरथरत्या हातांत अद्वैतनं नेहाचा चेहरा धरला. नेहाचे हात अद्वैतच्या हातांवर विसावले. तिच्या डोळ्यांमध्ये त्याला संमती दिसली, इच्छा दिसली.

आणि तिथे, उघड्या आभाळाखाली, सळसळत्या पिंपळाच्या साक्षीनं नेहानं अद्वैतमध्ये तिचा आधार, तिचा पुरूष  शोधला, आणि त्यानं तिच्यामध्ये शोधले त्याचे जगायचे राहून गेलेले क्षण.

*

त्याच्या साऱ्या अस्तित्वातून ओसंडणाऱ्या आनंदानं काय घडलंय ते सायलीला सांगितलं.  पण तरीही, शंकेला जागा नको म्हणून तिनं अद्वैतला सरळच विचारलं. अद्वैतनं लगेच काही उत्तर दिलं नाही. त्याच्या मनात चालू झालेले हिशोब तिला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसले.

झोपेत चालल्यासारखी पावलं टाकत तिनं कशीबशी बेडरूम गाठली आणि आतून दरवाजा लावून घे‌ऊन ती पलंगावर कोसळली. कसंतरी भयंकर अपमानित, लज्जित वाटत होतं तिला. आपलं सारं अस्तित्व कःपदार्थ असल्यासारखं. आणि संताप संताप होत होता तिच्या जिवाचा. सगळ्याचाच राग, तिटकारा आला होता तिला. स्वतःचा आणि अद्वैतचाही. आत्ताच्या आत्ता इथून निघावं आणि परत आयुष्यात कधी अद्वैतचा चेहरासुद्धा पाहू नाही असं वाटत होतं. पण त्याच वेळेस, हॄदयाचं हे सांगणं तिची बुद्धी ऐकायला तयार नव्हती. आत असं सारं ढवळून निघत असताना कोणीतरी तिला बजावतही होतं, की डोक्यात राख घालू नकोस, आततातीपणे कसलाही निर्णय घे‌ऊ नकोस.

भगिरथ प्रयत्नांनी ती उठली. डोळ्यांतून वाहू पाहणाऱ्या हतबलतेच्या अश्रूंना तिनं निग्रहानं थोपवलं. कपाटावरून तिनं एक बॅग काढली आणि कपाट उघडून काय हाताला येतील ते कपडे त्या बॅगमध्ये टाकले. कपाटाचं दार लावलं आणि दारावरच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाकडे पाहत तिनं स्वतःला विचारलं, ’तुला काय हवं आहे सायली? केवळ अद्वैतला अद्दल घडावी म्हणून तू निघून जाणार आहेस का? मुळात तुझं जाणं अद्वैतला शिक्षा वाटेलच याचीतरी तुला खात्री आहे का? तुला काय हवं आहे? तुझ्या आणि त्याच्यातले सारे बंध जाळून टाकायची तयारी आहे तुझी? तुझ्या अभिमानासाठी तू ह्या नात्याची किंमत दे‌ऊ शकतेस?’

आणि मग तिचं मन म्हणालं, ’आता खरा प्रश्न अद्वैतला काय हवं आहे हा आहे. लग्न नावाचं नातं अस्तित्वाला काचणारं काटेरी कुंपण व्हायला नको. माझ्याकरताही आणि त्याच्याकरताही. केवळ आम्ही नवरा बायको असणं पुरेसं नाही, एका छपराखाली जगायला. मी त्याला माझ्यासोबत त्याच्या इच्छेविरूद्ध जखडून ठेवू शकणार नाही,  ठेवणारही नाही.’

तिनं एक निःश्वास सोडला. ’माझ्यासाठी स्वाभिमानापेक्षा मला त्याच्याबद्दल जे वाटतं ते जास्त मोलाचं आहे. मला त्याच्याशी बोललं पाहिजे. आत्ता.’ 

*

तिनं दरवाजा उघडला. खोलीच्या बाहेर पडत असताना तिच्या आवडत्या लेखिकेचे शब्द तिच्या मनात उमटले -
’घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यांसारखी माणसं त्यात वाहून जातात.
पण तरीही पर्याय असतातच समोर उभे ठाकलेले...
त्यांच्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो’

नकळतच तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं.

अद्वैत बाहेर बसला होता, त्याच्या लॅपटॉपवर काही करण्याचं सोंग करत. तिनं जा‌ऊन लॅपटॉपचं झाकण बंद केलं, आणि ती , त्याच्याकडे एकटक पाहत त्याच्या समोर बसली. तिच्या नजरेस नजर मिळवणं त्याला शक्य झालं नाही. त्याची नजर खाली वळली.

काही क्षण शांततेत गेले. मग अद्वैत गुरगुरला, ’मी काहीही चुकीचं केलं नाहीये.’
’मै वही करूंगा जो मेरा करना बनता है... हे म्हणणारा अद्वैत तो हाच का?’ सायलीनं विचारलं.
’मला हवं ते करण्यातला मझा मला पहिल्यांदाच जाणवतोय. मी आ‌ईला जे सांगितलं होतं तेच तुलाही सांगतो सायली, मला आजवर दिल्या गेलेल्या नियमांनी मला आता खेळायचं नाही. आता मी, मी स्वतः माझ्यासाठी केलेल्या नियमांनी खेळणार आहे.’
सायलीनं डोळे मिटून घेतले आणि आलेल्या रागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आपण अद्वैतशी का बोलायला आलो आहोत त्याचं स्वत:ला स्मरण करून दिलं. मग डोळे उघडून, हसण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, ’छान! इतका सगळा विचार केलाच आहेस, तर हे ही सांग की तू खेळ नेमका कोणासोबत खेळतो आहेस? ’
त्यानं तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं.
’एकटाच खेळत असतास तर काही प्रश्नच नव्हता, पण तसं नाहीये. आपण खेळतोय हा खेळ, तू आणि मी. एकमेकांशी. आणि तू किंवा मी मोकळे नाही आहोत स्वतःला हव्या त्या नियमांनी खेळण्यासाठी. तुला हे समजावून सांगण्याची वेळ यावी माझ्यावर? की आपल्या कृतींची समर्थनं शोधण्याच्या नादात तू वस्तुस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं ठरवलं आहेस? राजा, कोणता खेळ असा खेळला जातो? तुझं ते आवडतं क्रिकेट खेळताना धाव कशाला म्हणायचं, खेळाडू बाद कसा होणार, चौकार, षटकार, जिंकणं, हरणं ह्या शब्दांचे अर्थ काय हे सारं दोन्ही संघांकरता सारखंच असावं लागतं. दोन्ही संघांनी फक्त स्वत: केलेले नियम पाळले तर त्या खेळाचं काय हो‌ईल सांग. आणि हे तर लग्न आहे! जोपर्यंत आपली आयुष्यं एकमेकांशी बांधली गेली आहेत, तोपर्यंत तुला आणि मला हा खेळ वेगवेगळे नियम घे‌ऊन एकमेकांशी नाही खेळता येणार.
’लग्न’ तुला इतकी कॅज्यु‌अली घ्यायची बाब वाटते का? गाजराची पुंगी; वाजवली, मोडून खाल्ली आणि लुसलुशीत गवत दिसताच टाकूनही दिली. आणि इतकंच नाही, तर जेव्हा लहर आली तेव्हा परत ये‌ऊन उचलली, अजून वाजवण्यासाठी, मोडून खाण्यासाठी... असं असेल तर ह्यात पडलासच कशाला? घरातल्या घरात कायमची एक हक्काची बा‌ई मिळते म्हणून?
राजा, जे तू स्वतः, कसल्याही जोरजबरदस्तीविना, स्वतःच्या मर्जीनं, स्वत:च्या आयुष्यात स्वत:करता सुरू केलं आहेस, ते टिकवायची जबाबदारी तुझी बिल्कुल नाही का? ’श्रेयस’ आणि ’प्रेयस’ मध्ये प्रेयस नेहमीच निवडता येत नाही हे तुला मानायचंच नाही का? आणि म्हणे, माझे नियम!’
’तुला काहीच माहीत नाही सायली. काहीच नाही. मी विचार न करता म्हणलो नव्हतो, मी काहीही चुकीचं केलं नाहीये असं. ती माझ्याकरता काय आहे, आणि मला ह्या नात्यातून काय मिळतंय...’
’बस्स. सांगितलंय मला सासूबा‌ईंनी, तुझ्या आत फुललेल्या आनंदाच्या झाडाबद्दल.’ एकेका शब्दावर जोर देत सायली म्हणाली. ’जर ती तुझ्याकरता इतकं सगळं काही आहे, तर मला का मोकळं नाही केलंस, जे माझ्याकरता अजूनही नातं आहे आणि तुझ्याकरता जे एव्हाना बंधन झालं असेल त्यातून? तिनं विचारलं. ’जर तुझ्या मनात तीच होती, तर तिच्यासोबत जे काही नातं आहे तुझं, त्यात तू पूर्ण १००% का राहिला नाहीस? जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? दिवसांचं काय, आयुष्याचं काय? की तुझ्या इंटिग्रिटीपेक्षा तुझी ’सोय’ महत्वाची वाटली तुला? सांग ना, फक्त स्वत:ची सोय पाहिलीस ना तू? दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली... असा विचार केलास ना तू? दोन्ही डगरींवर हात ठेवून जगण्याचा प्रयत्न केलास ना? आणि ते तुला करता ये‌ईल असं वाटलं तुला? राजा, सर्कसमधला झुल्यांचा खेळ पाहिला आहेस ना? दुसरा झुला पकडण्यासाठी पहिला झुला सोडावाच लागतो. दोन्ही झुले पकडायचे ठरवलेस, तर अधांतरी लटकत राहशील. कुठेच जा‌ऊ शकणार नाहीस.

निवड कर नवऱ्या. निवड करण्याची मुभा तुला नक्कीच आहे. नेहा ’किंवा’ सायली. पण इतकं लक्षात ठेव,  नेहा ’आणि’ सायली हा पर्याय तिला मान्य असला तरी मी हा पर्याय प्रत्यक्षात ये‌ऊ देणार नाही. तुला काहीतरी एकच निवडता ये‌ईल, आणि तुला निवड करावीच लागेल.

अद्वैत काहीच बोलला नाही. सायली पुढे म्हणाली, ’आणि मी हे सगळं तुझ्याशी का बोलतीये? कारण मी काही तुझ्यासोबत डोळे मिटून लग्न केलं नव्हतं. तू माझी निवड होतास... आणि आहेस.  आपल्या तारा जुळतील असं वाटलं होतं. आणि दोघांमधलं काही कोण्या तिसरीमुळे बिघडत नसतं हे जरी खरं असलं, तरी ही नेहा ये‌ईपर्यंत आपलं छानच चालू होतं की. काही सुखद धक्के, काही अपेक्षाभंग, काही शोधणं, काही गवसणं...मी खुष होते तुझ्यासोबत. तू मला आवडला होतास, आवडतोस अजूनही.

राजा, मी तुला आपलं मानलं आहे. त्यामुळे जीवघेणे परिणाम होताहेत तुझ्या वागण्याचे माझ्यावर. आणि म्हणूनच मी तुझ्याशी हे सगळं बोलतीये. तुला जागं करायला. परिस्थितीची पूर्ण कल्पना दे‌ऊन मग तुला निवड करण्याला सोडण्याला.तुला तुझ्यासमोरचे सारे रस्ते दिसू देत. मग त्यातल्या कुठल्या रस्त्यावरून चालायचं ते तू ठरव.

तू मला हवं ते निवडलं नाहीस तर माझीच निवड चुकली असं समजून मी आयुष्याचं हे पान उलटीन. ते करताना कितीही त्रास झाला तरी... पण नवऱ्या, मी स्वत:ला तुझी सुरक्षितता, तुझी लहर, तुझं कुंकू लावणारी आणि तुझं घर सांभाळणारी हो‌ऊ देणार नाही. हा माझा निर्णय आहे.’

सायली उठली. आत जा‌ऊन तिनं बॅग आणली. बाहेर ये‌ऊन पायात चपला घालताना ती म्हणाली, ’सासूबा‌ईंकडे असेन मी. मला शक्य आहे तोवर वाट पाहीन...तुझी.’ मघाशी रोखलेलं पाणी डोळ्यांतून आता बाहेर येतंय की काय असं तिला वाटलं. आपले अश्रू अद्वैतला दिसू नयेत म्हणून ती गर्रकन वळली. तिचं पा‌ऊल दाराबाहेर पडत असताना त्याचे शब्द आले,’थांब राणी, थांब.’

सायली थबकली. उठून तो तिच्यापर्यंत चालत आला. तिच्या खांद्यांवर हात ठे‌ऊन हळूवार आवाजात म्हणाला, ’मला वेळ दे राणी. विचार करायला.’

कडवट हसत सायलीनं रोखलेलं पा‌ऊल पुढे टाकलं. मागे वळून न पाहता ती फाटकाच्या बाहेर पडली. न थांबता चालत राहिली...अद्वैतपासून दूर दूर जात राहिली.

अद्वैत तिच्या हळूहळू लहान होत जाणाऱ्या आकृतीकडे पाहत, किंकर्तव्यविमूढ होतासा तिथेच उंबरठ्यावर उभा राहिला.

***