ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
निवेदन :
कांही अपरिहार्य अडचणींमुळे मुशाफिरीच्या क्रमश: कथनाला स्वल्पविराम द्यावा लागला. लेखन थांबवूनही बराच काळ लोटला. एव्हाना मी विस्मरणातही गेलेलो असणार; मग कशाला लिहायचे ? तसाही मी कांही सिद्धहस्त लेखक नाहीच त्यामुळे लिहावे की लिहू नये असंही वाटायला लागलं. पूर्णविरामच द्यावा लागतो की काय असं वाटायला लागलं .पण मधल्या कालावधीत कांही कनवाळू रसिक मनोगतींनी प्रोत्साहनात्मक पृच्छा, उत्कंठा जागती ठेवली. त्यात अत्त्यानंद यांचे नांव आवर्जून घ्यावे लागेल.
त्यामुळे, जरी, मनसोक्त दांड्या मारल्यानंतर पुन्हा शाळेत जायला निघालेल्या विद्यार्थ्यासारखी अवस्था झालेली असली तरी, छ्ड्या खायची तयारी ठेऊन विचारतो आहे,
" म्या ऽ ऽ य कम् इन स्सर ? (किंवा म्म्या ऽ म)"
************************************************************
सिंहावलोकन:
पठाणांच्या जथ्थ्यातून स्वस्थ होऊन मी कारागृहाच्या कामगिरीवर दाखल झालो होतो. या कामासाठी मला चार भारतीय आणि तेही महाराष्ट्रियन कारागीर दिले गेले होते. पण ती एक आवळ्या-भोपळ्याची मोट होती. शिवाय एक स्टुअर्ट मार्शल नावाचा गोरा कलाकारही जमेला दिला गेला. पण तो त्याची नक्कल वठण्याआधीच "एक्झिट" झाला. त्याची जागा एका बार्ट्रम उर्फ बॅटी नावाच्या आणखी एका गोर्याने भरून काढली. हा मात्र खराखुरा कलाकार होता आणि त्या प्रकल्पाच्या यशापयशाची बरीचशी भिस्त त्याच्याही खांद्यावर होती. त्या मंचावर एका इदी जमील नामे स्थानिक मस्तकलंदर कलाकाराचाही वावर होता. कारागृहाचा अधिक्षक होता तो. तसेच, त्या कथेला नंतर प्रणयाचा (romantisism) एक हलकासा फाया लावण्यासाठी इम्तियाझ अख्तर नावाच्या एका पाकिस्तानी युवाकलाकाराने "एन्ट्री" घेतली होती. कारागृहात वातनुकूलन करणारी व्यवस्था आणि तदनुषंगिक संयंत्रे वगैरे बसविण्याचे काम चालू होते आणि मुशाफिरीच्या मागील भागात नव्याने लावलेल्या संयंत्राच्या उभारणी पश्चात् त्याची चांचणी घेण्याचे काम चालू होते.
************************************************************
मी गप्पांचा तास आवरता घेतला. इम्तियाजचे संयंत्राशी विद्युत घटक जोडणीचे काम पूर्ण होतांच संयंत्राची चांचणी
घ्यावयाची होती.
-----------------------------------------------------------------------------------
इम्तियाज त्याच्या कामांत वाकबगार होता. त्याचे काम व्यवस्थित चाललेले पाहून मी बॅटीच्या कामाकडे वळालो. जुन्या डक्ट्स संपूर्णत: काढून झालेल्या होत्या आणि नवीन डक्ट्सचा सुरुवातीचा एक संच जमीनीवर मांडून ठेवलेला होता. बॅटी आणि सावंत वरती परांचावर उभे राहून डक्ट्स ज्यावर बसतात ते पाळणे (suspenders ) ठीक करत होते. मला पाहाताच बॅटी वरूनच ओरडला,
" बरें झाले तू येथे येउन पोहोचलास ते. इथे एक समस्या आहे."
" ओह् खरेंच की काय! काय समस्या आहे?"
" या नवीन डक्ट्सचा आरखडा कोणी तयार केला?"
" माहिती नाही. तो आरेखन (design) विभागाकडून आला. कां? काय समस्या आहे?"
" तू नकाशे नीट पाहिले नाहीत काय?"
" पाहिले होते. कां पण? काय समस्या आहे ते सांगशील तर ते अधिक चांगले होईल. नाही कां?"
" आरंभीची डक्ट (main duct) जिथून इमारतीच्या आंत येते तेथील डक्ट आंत येण्यासाठी ठेवलेली खिडकी (opening) डक्टच्या मानाने लहान आहे."
" खरं की काय! तसे असेल तर समस्या आहे खरी. खाली ये. आपण बघू काय करता येऊ शकते तें."
बॅटी हातातल्या झूल्यालाच लोंबकळला आणि उडी मारून माझ्यासमोर येऊन उभा राहिला. बॅटीची ही चपळाई पाहून मी पुन्हा एकदा चकित झालो. याच्या सर्वच हालचाली त्याच्या आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात होत्या. हें असें कसें झाले असेल यावर बोलत आम्ही दोघे इदीच्या कार्यालयाकडे आलो. आम्हाला वेगळे असे कार्यालय किंवा कक्ष देण्यात आलेला नव्हता त्यामुळे इदीच्याच कार्यालयाचा एक लहानसा भाग आम्ही आमचे तात्पुरते कार्यालय केले होते. आम्ही नकाशे उलगडून बसलो. नवीन डक्ट्स हवेच्या अतिरिक्त मागणीप्रमाणे थोड्या मोठ्या आकाराच्या केल्या होत्या पण त्या अनुषंगाने भिंतीतली खिडकी मोठी करवण्याचे संकेत दिलेले नव्हते. ओघानेच आता हे बांधकाम विभागाला कळविणे गरजेचे झाले. तेंही लेखी कळविण्याचा सोपस्कार करावा लागणार, त्या विभागाची माणसे येणार पाहाणी करणार आणि मगच आवश्यक तो बदल केला जाणार. आता ही चालत्या गाडीला लागलेली खीळ निघेपर्यंत किती वेळ जाईल ते सांगता येणार नव्हते. बांधकाम विभागाचा आदेल नांवाचा प्रमुख कटकट करणार होता. तो त्याचा स्वभावच होता. हे सारे सोपस्कार पार पाडून खिडकी बाबत निर्णय होईपर्यंत आमचे काम चालु राहाणेही गरजेचे होते. तोपर्यंत, तेवढी जागा मोकळी सोडून पुढचे भाग जोडायला घ्यावेत असे मी सुचवले.
मात्र या नव्याने समोर आलेल्या समस्येचे निराकरण कसे करावे हे कांही सुचेना. शिवाय हे या पूर्वीच माझ्या ध्यानांत यायला हवे होते. ते कां आले नाही या विचाराने मी स्वत:वरच चिडून गेलो. तशातच गजानन सुर्वे समोर येऊन उभा राहिला आहे आणि तो मला कांही विचारू पाहातो आहे आणि माझे त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही हेही ध्यानात मला वेळ लागला. ध्यानात आलं तेंव्हा,
" काऽय आहे? " मी विनाकारण त्याच्यावर वसकलो. तो बोलायचाच थांबला आणि भांबावून पाहात रहिला. माझी अगदी तिरीपिट उडालेली आणखीही एक माणूस पाहातो आहे हे माझ्या, तो माणूस समोर येईपर्यंत ध्यानात आले नाही. तो होता इदी.
"हेय, म्हातार्या माणसा ! कां ओरडतो आहेस इतका? काय झालंय ?"
इदी त्याचे नेहमीचे मिस्किल हास्य घेऊन सामोरा आला. वास्तविक इदीला ती समस्या सांगण्यात कांही अर्थ नव्हता कारण त्या कामाशी त्याचा तसा अर्थाअर्थी कांही संबंध नव्हता आणि शिवाय संकलपनात्मक दृष्ट्या तिथे मी सेवादाता होतो आणि तो उपभोक्ता होता. धोरणात्मक दृष्ट्याही त्याला ही समस्या सांगणे धोक्याचे होते कारण त्या समस्येच्या मुळाशी बहुदा माझाच गलथानपणा (lacuna) होता आणि त्याचे भांडवल करून तो मला आणि पर्यायाने आमच्या अवसायानाला (company) अडचणीत आणू शकला असता. पण तरीही इदीला मी ती समस्या सांगितली कारण एव्हाना इदी तसे काही करणार नाही असा विश्वास त्याने त्याच्या मैत्रीपूर्ण वागणुकीने निर्माण केला होता.
" हात् तिच्या ! एवढेच ना ? हे घोंगडे दुसर्याच्या गळयात घाल आणि स्वस्थ हो.
(pass the buck on someone and relax).
मी तर आणखीनच भांबावलो. दुसरा म्हणजे कोण? आणि त्याच्या गळ्यात हे घोंगडे घालायचे म्हणजे काय? मला कांहीच उमजेना. शेवटी तोच म्हणाला,
" तो डोक्यावरचा दगड आधी खाली उतरवून इथेच ठेव आणि कॉफी घ्यायला चल"
मी यंत्रवत् इदीच्या केबीनकडे निघालो.
कॉफी तयार होईपर्यंत मी गप्प होतो तसा इदीही गप्पच होता. कॉफीचा कप माझ्या हातात देऊन इदी बोलू लागला.
" हां, बोल आता."
"काय बोलू ? माझं तर डोकंच चालत नाहीये."
" वेडा आहेस कां तू. अगदी सोपं आहे."
" काय सोपं आहे?"
" सरळ अब्राहमला सांग काय समस्या आहे ती."
" आणि काय करू? घरी जाऊन सामानाची बांधाबांध करू? "
" इतकं वैतागण्यासारखं काय आहे त्यात. सगळं ओझं काय तुझ्या एकट्याच्याच डोक्यावर आहे असं कां धरून चालला आहेस तू. या कामाची योजना काय तू स्वत: बनवली अहेस काय? नक्कीच नाही! ज्याने आरेखने तयार केली त्याचीही जबाबदारी आहेच की. "
" तुझे म्हणणे बरोबर असेलही कदाचित. पण मी ते अगोदरच पहायला हवे होते की नाही."
" ठीक आहे चूक झाली तुझी. पण म्हणून काय तुला फासावर जायला लागावं इतकी का मोठी चूक आहे ती. आणि तुझ्या पाशी आता काही उपाय आहे का? "
" ........"
" नाही ना!. मग आता सरळ काय झालंय ते अब्राहमला सांगून मोकळा हो. त्याला ठरवू दे, काय करायचे ते. तो काही ना काही उपाय काढीलच. तोपर्यंत कदाचित तुलाही एखादा उपाय सुचेल. आता असं डोकं धरून बसण्यात काय अर्थ आहे?"
आता मलाही इदीचा सल्ला पटातो आहे असं वाटायला लागलं. मी फोनकडे नेऊ लागलो तर लागलीच मला अडवले.
" काय सांगणार आहेस तू त्याला? "
" हेच. काय प्रकार झालेला आहे ते सांगतो."
" मठ्ठ आहेस तू! बावळटासारखे तपशील देत बसू नकोस आणि कबुलीजबाबही (confession) देत बसू नकोस. त्याला मोघम सांग आणि लगोलग इथे बोलावून घे."
मी मुदीरला फोन लावला. इथे एक समस्या आहे असं मोघम सांगीतलं आणि शक्य तितक्या लवकर इकडे येण्याची विनंती केली. मुदीरने ती मान्य केली. तासाभरात येतो म्हणाला.
वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखा मी पुन्हा कामाच्या ठिकाणी चालू लागलो.
क्रमश: