ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
इदी म्हणाला मला कांही तरी हवं होतं. काय हवं होतं मला.............?
रात्री, काय हवं होतं मला.. ? या प्रश्नाचा विचार करण्याइतपतही त्राण उरलेले नव्हते. त्यामुळे तो प्रश्न तसाच अधांतरी ठेऊन झोपी गेलो. सकाळी नित्याप्रमाणे कामावर जाण्यासाठी तयारी करीत होतो तोच, वसंत गडकरीचा फोन आला.
" काय झालं बे भोट्या? तू काऊन भेटून नाई राहिला ? जिंदा आहेस का मेलास बे? "
" मरीन काह्याला बे? आन् मरीन तं, तुले लाडू तं खायाला भेटतीनच ना! "
मी ही त्याच्याच बोलीढंगात उत्तरलो. मग कांहीवेळ आमचा दोघांचा एक लडिवाळ संवाद झाला आणि दुसर्या दिवशी भेटायचे कबूल करून मी कामावर जायला निघालो. वाटेत मी वश्याचाच विचार करीत होतो. माझे मन स्थिर नव्हते हे नक्कीच. पण आता वश्याची भेट होईपर्य़ंत मनाची अस्थिरता माझ्या कामावर फारसा परिणाम करु शकणार नव्हती.
मी कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेंव्हा इदी आणि बॅटी कांही तरी बोलत असलेले दिसले आणि विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर सुर्वेही आहे असे मला दिसले. आणखी जवळ जाऊन पोहोचलो तर सुरेवे कांही तरी समजाऊन सांगतो आहे आणि बाकी हे दोघे त्याचे बोलणे समजाऊन घेत असावेत असे दृष्य होते. बॅटी अल्यापासून एक बरे झाले होते. कामगारांना लेबर कॅम्पवरून कामाच्या ठेकाणी घेऊन येण्याचे काम बॅटीने स्वखुशीने त्याच्याकडे घेतले होते. त्यामुळे सुर्वे आणि बॅटी एकत्र पाहून मला नवल वाट्ले नव्हते. पण सुर्वे बोलतो आहे आणि इदी, वॅटी लक्ष देऊन ऐकत आहेत हे दृष्य मात्र नवल करावे असेच आहे. आता प्रश्न असा होता इदी व बॅटी इंग्लिश मधे आणि सुर्वे कोकणी मराठीत. त्यामुळे त्यांच्यात काय संवाद झाला किंवा होतो आहे याचे कुतुहल आणखीनच गडद झाले.
" शुभप्रभात इदी, शुभप्रभात बॅटी!. कसें आहात तुम्ही? कांही नवीन?" मी सुरुवात केली.
" शुभप्रभात हरून! देवाचे आभार, तू आलास. अरे हा गृहस्थ काय बोलतो आहे कांही समजत नाही. तू ते आम्हाला समजाऊन सांगू शकतोस काय? " बॅटी हस्तांदोलनासाठी पुढे येत म्हणाला.
" काय सुर्वे? काय म्हणताय् ? कां कांही गजाली चालल्या होत्या ? "
मी सुर्वेला विचारले. त्याचा चेहरा एव्हाना कावरा बावरा झालेला होता. कारण त्यावेळी तिथे त्याचे असणे तसे तेथील शिस्तीला धरून नव्हते हे त्याची नक्कीच लक्षात आलेले असणार.
" गजाली कसच्या! तो ओपनिंगचा घोल जाला. गारीत मी आनि गजा (सावंत) त्याचा बोलत होतो तं ब्याटी सायबान् तां ऐकलान्. तसा साहेब हुश्शार हो! मी काय बोल्लो ते त्याच्या कायसासा ध्यानात आला वाटातां. तां, ते काय ते विच्यारीत होता सायब. "
" मग तू काय सांगितलंस साहेबाला? "
" मी काय बोल्लो गजाला, का डक्टीची बाय ओपनिंच्या बेताने वारवा आहे हा खरां. पन ओपनिंग बेसमधे डक्टीपेक्षा वारवा आहे. म्हंजे कसां?... का डक्टीचा बाय कमी केला आन् बेस वारवला तं ओपनिंग मदी डक्ट बराब्बर बसंन. अगदी आपला चायलेंज ! "
आता सुर्वेची ही भाषा समजणे खरं म्हणजे मलादेखील जरा अवघडच होतं तर बॅटीला आणि इदीला काय समजले असेल देवच जाणे. पण सुर्वेच्या बोलण्याला कांही अर्थ असेल तर तो तपासायला हवा होता.
" साहेब, मी जाऊ ? " मी क्षणभर विचारात पडलेला पाहून सुर्वेने परवानगी मागीतली. सुर्वे गेला. बॅटी प्रश्नार्थक मुद्रेने पहात होता. सुर्वेने मला काय सांगितले असावे तो अंदाज करीत असावा. मी त्याला माझ्या मागोमाग येण्याचा इशारा केला आणि आणि कामाच्या ठिकाणी, खरंतर जिथे समस्या उद्भवली होती त्या ठिकाणी निघालो. इदीला कांही नैमित्तिक कामे उरकावयाचे असल्याने तो मागेच थांबला.
सुर्वेची योजना मी बॅटीला समजावून सांगू लागलो. नवीन डक्ट्ची उंची भिंतीत असलेल्या ओपनिंगच्या मानाने अधिक होती पण रुंदी ओपनिंगमधील उपलब्ध रुंदीपेक्षा कमी होती. डक्टाची उंची कमी करून रुंदी वाढवली तर कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता नव्याने सुधारणा केलेली डक्ट ओपनिंगमधून जाउ शकली असती. बॅटी अगदी निर्वीकार मुद्रेने ऐकत होता. अखेर कांहीसा विचार करून झाल्यावर तो म्हणाला,
" पण म्हणजे नवीन डक्ट आणि तिच्या मागेपुढे समावेशक भाग (transition piece) असे एकूण तीन भाग बदलावे लागतील. अर्थात् ते नव्यानेच तयार करावे लागतील. नाही कां !"
" ते तर ओघाने आलेच. " मी म्हणालो.
" पण या बदलाचा परिणाम त्याभागातून जाणार्या हवेवर कसा होईल हेही पहावे लागेल ना? "
" अगदी बरोबर! आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे अशा प्रकारचे कोणतेही बदल आपण मुख्यालयाच्या परवानगीखेरीज करू शकत नाही. पण ते जाऊ देत. आधी ते कसे करता येईल ते पाहू. चला त्यासाठी आवश्यक ती मापे घेऊ."
बॅटी लागलीच कामाला लागला. त्याने दोन कामगारांना तिथे घोडा-शिडी उभी करायला लावली आणि मोजपट्टी घेऊन तो चटकन् वर चढला. आवश्यक ती मापे घेऊन तो खाली आला आणि तो कागद माझ्या हाती देत म्हणाला,
" हे घे आणि निवांतपणे गणिते करीत बैस. मी बाकीचे काम उरकायला घेतो."
त्याचे हे बोलणे ऐकून क्षणभर, तो माझा मदतनीस असूनही माझ्यावरच हुकुमत गाजवू पाहातो आहे असे वाटून पुसटसा रागदेखील आला. पण तो तितक्याच चटकन् गेलाही. कारण आम्ही भारतीय लोक अशा मानापमानाच्या कल्पना मनाशी वृथा बाळगून स्वत:चेच कसे नुकसान करून घेत असूं हे मी पहात असे. मला जसे माझ्या हुद्द्याचे कौतुक होते तसे ते बॅटीलाही असायला हवे होते. तो कांही साधा कामगार नव्हता. पण तरीही त्याच्या वागण्यात तसला कांहीही गंड (complex) नव्हता. एखाद्या सामान्य कामगाराप्रमाणे तो कोणतेही काम पुढे होऊन करीत होता. तेही अगदी टणाटण् उड्या मारीत.
मी इदीच्या कार्यालयात जाऊन बसलो आणि वही उघडून गणिते करू लागलो. जरा वेळाने इदी तिथे आला आणि सहजच विचारले,
" काय शोध लावला आहे त्या मिस्टर सुव्वाने? "
मला हसूं आले. त्या कृष्णवर्णीय माणसाच्या तोंडातून सुर्वे हा शब्द जसाच्या तसा उच्चारला जाणे कठीणच होते. सुर्वे ते जर ऐकता तर तो जन्मजात कोंकणी माणूस तडकलाच असता.
मी सुर्वेची योजना त्याला समजाऊन सांगितली. तो नकारार्थी मान हलवीत म्हणाला,
" नाही, नाही मित्रा. तसं कांही करू नकोस. मुदीरने तुला काय हवे ते करायला परवानगी दिली आहे याचा अर्थ तू इतका मोठा बदल करावास असे नाही. हे तर तुमान तोकडी झाली म्हणून माणसाचेच पाय कापून काढले असें होईल. नको, नको. तसे कांही करू नकोस. तू ती भिंत तोडून झरोकाच मोठा करण्याचा विचार करायला लाग. त्यात, मी माझ्या अखत्यारीत थोडी फार जमेल ती मदत करीन. तू दोन माणसे दे. बाकी मी पाहून घेईन. मी स्वत: देखरेख करून ते काम करवून घेईन. जरा वेळेचेही भान असूं दे. तुला येथील सरकारी अधिकारी आणि त्यांच्या लहरीपणाचा अनुभव नाही. काम सुरू होऊन तसाही बराच काळ लोटला आहे. आता इथे सरकारी भेज्याचा कुणीही उपटसुंभ कधीही उपटू शकतो. ही भीति तुला अब्राहमच्या चेहर्यावर दिसली नाही कां? बहुदा नसावी. पण मला ती दिसली. तेंव्हा ते कागद फाडून फेकून दे आणि कामाला लाग.
इदीच्या बोलण्यात खरोखर अर्थ होता. मी आज्ञाधारक मुलाप्रमाणे ते कागद फाडून टाकले आणि कामाच्या ठिकाणी निघालो.
क्रमश: