आखाती मुशाफिरी (४)

तो नक्की काय म्हणाला ते मला उद्या कळणार होते.
--------------------------------------------
तो पठाण जे कांही काल म्हणाला होता त्यात एक        ’ साबूत ’ असा शब्द होता त्याचा अर्थ मात्र सकाळी माझ्या चांगलाच लक्षात आला. साबूत म्हणजे शाबूत असें असावे. आज मी खरोखरच शाबूत नव्हतो. काल दिवसभर भर उन्हांत धावपळ केली त्याचा जबरदस्त शीण आलेला होता. अंगात थोडी कणकण तर होतीच पण माझे दोन्ही खांदे, दंड,बाहू आणि मान-पाठ कमालीची ठणकत होती. ते अवजड वाहन चालविण्याचा सराव असण्याचे कांही कारण नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच जोर-बैठका काढणाऱ्याची जशी व्हावी तशी अवस्था झाली होती. चेराही उन्हाने किंचित रापला होत हे आरसा सांगत होता. मी न्याहरी बरोबर दोन वेदना शामक गोळ्या घेतल्या अन् कामावर गेलो. पांच मिनिटे उशीरच झाला होता.

पठाणांचा जथ्था माझ्या स्वागताला उभाच होता. तो कालचा पठाण सामोरा आलाच." कैफ हालुक मुदीर ?"  चेह-यावर एक प्रकारचे छ्द्मी हास्य ठेवीत त्याने विचारले." झैन ! अल हमदुल्लिलाह " मी कोणताही कडवटपणा न ठेवता म्हणालो."वल्लाह ! अस्सलाम-व-आलेकुम !" तो. त्याचा संस्कार जागा झाला असावा.

" व-आलेकुम अस्सलाम. लेकिन तुम अपना नाम नही बोला !" या माझ्या वाक्यासरशी 
" हम कादर खान ! " तो उत्तरला. त्याच्या चेहऱ्यावर एक दिलखुलास हास्य पसरलेले दिसले. कालच्यापेक्षा आजचा दिवस कमी कटकटीचा असावा याची ती नांदी आहे की काय असे मला वाटून गेले. मी संभाषण पुढे चालू ठेवले. 
'' कादरखान, कल हमने पाठानका बच्चाको चालीन किया ऐसा तुम बोला. वो चालीन का मतलब ?''
''चालीन का मतलब.....मतलब....'' तोही घुटमळलाच. मग मलाच सुचलं;
''चॅलेंज ??''
''वल्लाह ! दुरुस्त. एकदम दुरुस्त.'' त्याच्या या उत्तरासरशी कांही पठाण एकाएकी
फेर धरून नाचू लागले. मला एक शब्दही न कळणाऱ्या भाषेत गाऊ लागले.
एका एकी हे काय चालले आहे? मी हबकूनच गेलो.
हा काय प्रकार आहे, मी नुरूलला विचारले. तो हसत सांगू लागला, कादरखान मला धडा शिकवण्याचा चंग बांधून आला होता. सुरुवातच तो मारामारीने करणार होता. पण देव दयेने ती वेळ आली नव्हती. सुरुवात छान संवादाने झाली होती आणि कादरखान निवळला होता. राक्षसातील माणूस जागा झाला होता. मारामारी झाली तर ती कांही जणांना नको होती. ती झालेलीही नव्हती. त्यामुळे तो गट आता सुखावला होता. अशा वेळी आनंदाने गाण्याची, नाचण्याची त्यांची ती प्रथा होती.

मी अनेक प्रकारच्या माणसांत वावरलो. अनेक चित्रविचित्र अनुभव घेत गेलो. त्यांत ही आणखी एक भर. या माणसांना मी गुलामा सारखे वागवावे असा मला सल्ला देण्यात आला होता. तसेंच वागावे लागते की काय अशी परिस्थितीही समोर आली. पण कुठे तरी आंत, माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती. म्हणून मला माणसांबद्धल कणव होती. किंवा मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. एक मात्र निश्चित होते. ते म्हणजे माझ्यावर सोपविलेले काम मला व्यवस्थित झालेले पहायचे होते. मला दिलेले काम मी नीट करू शकलो नाही असे यापूर्वी कधी झालेले नव्हते आणि आताही तसें व्हायला नको होते.

साईटवर कामाची सुरुवात झाली होती. केबलच्या यंत्रावर स्वत: कादरखान बसला होता.
याचे मला आश्चर्य वाटले नाही. मी तिथे येण्याच्या आधी फार पूर्वीपासून काम चालू होते. कादरखानच काय पण आणखीही चार सहा जणांना ती सगळीच्या सगळी यंत्रे चालवता येत असणारच.
’अथा तो ब्रह्मजिद्न्यासा’ हे काय फक्त हिन्दुस्थानीच म्हणू शकतात काय?
प्रत्येक काम मला आलेच पाहिजे हा अट्टाहास करणारा मी काय एकटाच असूं शकतो काय?

मी केबीनमधे जाऊन किती काम झाले, किती बाकी आहे याची उजळणी करून घेतली आणि सरळ कादरखान जवळ जाऊन बसलो. आजवर कोणी अधिकारी असा काम करणाऱ्याजवळ बसला नसावा. तो आधी थोडा संकोचला पण नंतर सैलावला. मग
'' यल्ला! यल्ला !! रफिक. यल्ला, जल्दी, जल्दी !'' असे इतर कामगारांवर ओरडून
कामाला चेव आणू लागला. माझ्याशी गप्पा मारू लागला. मी मोईनची कांहीच खबरबात घेतलेली नव्हती. पण त्याने घेतलेली होती. सांगू लागला तो त्याचा सावत्र भाऊ होता. त्याने काल नाटक केले होते. पण त्याला खरेंच पोटदुखीचा त्रास होता. दवाखान्यात जाण्याची परवानगी अनेकदां मागितली होती पण दिली गेलेली नव्हती. पठाण माणूस म्हणून वागवले जात नव्हते आणि म्हणून ते माणसांसारखे वागत नव्हते. हे दुष्टचक्र संपणार की नाही, हा त्याचा प्रश्न होता.

हे असे सुखेनेव चालले काम साधारण चाललेले काम पुन्हा अचानक थांबले तेंव्हा
जेवण्याच्या सुटीला जेमतेम एक तासच उरला होता. कालही काम याच वेळी बंद झाले होते. हा काय प्रकार आहे. यंत्र बंद करून मी आणि कादर खाली उतरून पहातो तो,
दूरवर, बुलडोझरपाशी पठाणांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी लागलेली. एकाने दुसऱ्याची कांही खोडी काढली होती आणि मस्करीची कुस्करी झाली होती. प्रकरण नुसतेच हातघाई वर आलेले नव्हते तर दोन चार जण चांगले रक्तबंबाळ झाले होते.
मला आता मात्र वैताग आला. उद्वेगाने मी केबीनकडे कूच केले आणि हे असें याच वेळेला कां होते याच विचार करू लागलो.

कदाचित या वेळेला ऊन इतके तापते त्या मुळे माणसे प्रक्षोभक होत असावीत. कामाची वेळ थोडी बदलता येइल कां? सकाळी सहा वाजता काम सुरु केले तर कांही फायदा होईल का? मी कामाचा आंखणी-आलेख आणि झालेले काम पडताळून पाहिले. कामाच्या वेगात थोडी सुधारणा होती पण एकुणात काम मागेच होते. मी मुख्यालयाशी बोललो. पण कामाच्या वेळेत बदल करण्याची परवानगी मिळाली नाही.

दरम्यान कामगार जेवणाची सुटी संपवून परत कामावर आलेले होते. मी नुरुलखानला, त्याच्या जागी आणि कादरखानच्या जागी दुसरी माणसे लावून, आणखी दोन शहाणी माणसे घेऊन केबीनमध्ये येण्यास सांगितले. थोड्याच वेळात खरोखर चार डोकी केबीनमध्ये हजर झाली. जणू मी एक लहानशी बैठक घेत होतो.

सगळ्यात आधी मी त्यांचे काम छान चालले आहे, मला कांही तक्रार नाही असे
सांगून एकूण कामाची व्याप्ती, झालेले काम आणि राहिलेले काम याची माहिती दिली. उरलेले काम किती दिवसांत पूर्ण व्हायला पाहिजे हेही विषद केले आणि काय करता येईल या बाबत त्यांचेपाशी कांही सूचना असतील तर त्या द्याव्यात अशी विनंती केली. हा सारा प्रकार त्यांना नवीन होता. योजना प्रक्रियेत त्यांच्या सारख्या मजूरांनाही सहभागी करण्यात येत आहे याचे त्यांना नवल वाटत होते आणि कौतुकही.
कांही मिनिटे त्यांनी खालच्या आवाजात पुश्तुमधे कांही चर्चा केली ती मला समजली नाही. मात्र सरते शेवटी कादरखान म्हणाला,
"इन्शा अल्लाह, एक तरकीब हो सकती है. लेकीन हम सोचेगा. कबिलाके साथ बात करेगा. कल बताएगा. झैन ?''
मी म्हणालो

 "झैन !" चालेल.
नियोजन प्रक्रियेत कामगार प्रतिनीधींना सहभागी करून घेण्याचा हा माझा मार्ग मला पुरोगामी वाटला तरी त्याचे परिणाम काय होतील याचा तो पर्यंत तरी मी नीट विचार केलेला नव्हता.

आता कादरखान उद्या काय ’तरकीब’ सुचवतो ते पहायचे होते.