आखाती मुशाफिरी (१६)

निवेदन: मध्यंतरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आखाती मुशाफिरीचे क्रमश: सादरीकरण खंडित झाले होते. ती मालिका पुन्हा सुरूं करीत आहे.
---
सिंहावलोकन: मी  दोहा-कतारच्या कारागृहांत वातानुकूलिक यंत्रे बसविण्यासाठीं चार कामगार घेउन गेलो. महादू नांवाच्या एका कामगाराने अंगझडती घेणार्‍या अधिकार्‍याशी तंटा केला.  महादू आरक्षींना अंगाला हात लावू देणार नाही हे माझ्या लक्षांत येताच मीच पुढें होऊन महादूच्या खिशाला हात घातला आणि तो ’बॉम्ब’
(संशयास्पद वस्तू) बाहेर काढून टेबलावर ठेवला. तंबाखूची डबी होती ती!
---

 या नवीन कामाची सुरुवातच अशी झालेली पाहून मी तर धास्तावून गेलो. सावंत, सुर्वे, कांबळी, महाडिक ही सगळी माणसें मराठी, मीही मराठीच; एक चांगला संघ (team) तयार होईल, काम सुरळीत होईल असा माझा समज होता. पण ते चुकीचा ठरतो की काय अशी शंका वाटायला लागली. पण एवढ्या लहानशा प्रसंगाने डगमगून जायचे नाही असे मी मनाला बजावले आणि पुढे सरकलो. त्याचवेळी मी माझ्या वागणुकीचे धोरण बदलण्याचे ठरवले. मराठी माणूस तसा गप्पिष्ट असतोच आणि इथे तर मंडळी कोकणातली. मग तर विचारायलाच नको. पठाण निदान मी सांगेल ते निमुटपणे ऐकत तरी होते. कारण त्यांच्यात चिकित्सक वृत्ती नसावी आणि असली तरी तिच्यापेक्षा आज्ञाधारक वृत्ती अधिक होती. मराठी माणसे कामापेक्षा गप्पांत अधिक रमतात. यांत कांही शंका असण्याचे कारण नव्हते.

कामाची सुरुवात कशी करावी याचा मी मनात थोडा विचार केला आणि सध्याच्या कामाचे स्वरूप तसेंच नव्याने करावयाच्या कामाची रूपरेषा समजाऊन सांगण्यासाठी या चारही सहकाऱ्याना मी सर्व्हिस शाफ्ट कडे घेऊन गेलो. साधारणत: रुग्णालये, न्यायालये,कारागृह, अशा इमारतींना, जेथे अनाहूत-अभ्यागतांना (stray-visitors) प्रवेश निषिद्ध असतो त्या ठिकाणी मूळ इमारती बाहेरून एक विस्तारित मार्गिका (service gallery extension) काढलेली असते. या मार्गिकेतून नळ-पाणी, वीज वाहिनी, वात वाहिका यांची योजना केलेली असते. म्हणजे जर विजेचा दिवा अथवा विजेवर चालणारे एखादे उपकरण कार्मिक कक्षात असेल तर त्याची कळ (switch) या बाहेरील मार्गिकेत असतो. त्यायोगे मूळ कक्षातील माणसांच्या संपर्काशिवाय त्यांना दिलेल्या सुविधांची देखभाल करता येते. त्यामुळे कारागृहातील कैदी अथवा अन्य कोणी आम्हाला दिसणे शक्य नव्हते.

मी त्या मार्गिकेतून ही चार डोकी घेऊन जात होतो आणि जाता जाता कामाचे स्वरूप समजाऊन सांगत होतो. प्रत्यक्ष जागा मीही प्रथमच पाहात होतो. त्या आधी मी केवळ आरेखनेच पाहिली होती. सावंत आणि सुर्वे नीट लक्ष देऊन ऐकत होते. कारण कारागृहाचे काम जरी ते प्रथमच पहात होते तरी भारतात अनेक मोठ्या इमारतीमधील वातानुकूलित कामाचा त्यांना अनुभव होता. महाडिक आणि कांबळी यांना कामाचा अनुभव आहे असे कगदोपत्री जरी दाखवले गेले होते तरी त्यांच्या वयावरून आणि त्यांच्या हालचालीवरून ते कांहींसे नवखेच दिसत होते.

जिथे वात वाहिका (air ducts) आणि इतर उपकरणे बसवावयाची होती तो परिसर पाहून झाला तसे आम्ही  वात-शीतक घटाकडे(ACU= air-cooling units) वळालो. तिथे सध्या एक कॅरियर कंपनीचे 100 TR क्षमतेचा एक वात-शीतक घट बसविलेला होता. तिथे आम्ही पोहोचलो मात्र महादू आणि वामन हे आमचे आघाडीचे बिनीचे शिलेदार पुढे सरसावले. महादूच्या चेहऱ्यावर एक खास कोकणी कुतुहल आणि वामन अजूनही जत्रेत हारवल्यासारखा. तेथील एका लहाम मालमोटातीच्या आकाराच्या संयंत्राला एक प्रदक्षिणा घालून झाल्यावर वामनने सर्वात आधी तोंड उघडले,

" हे काय आहे हो साहेब?"

हे एक हवा थंड करणारे मशीन आहे. यात थंड झालेली हवा याला जोडलेल्या डक्टमधून आतल्या विभागात नेली जाते आणि तेथील निरनिराळ्या खोल्यांत पसरविली जाते, अशी माहिती मी देऊ लागलो इतक्यात महादूने एक बॉम्ब टाकला,

" पण मग याचा काऽय कराचा? आणि हवा कुठूनशी येणार याऽत? "

यावर आ वासून पाहाण्यापलिकडे आणखी कांही करणे मला सुचले नाही. महादू-वामन या दोघांनी कामाच्या अनुभवाची जी प्रशस्तिपत्रके सादर केली होती त्यात, त्यांनी अशी वातानुकूलित सेवा पुरविणार्‍या ’हाजी-मुसा पत्रावाला’ नावांच्या सुप्रसिद्ध समूहात कुशल कारागीर म्हणून काम केल्याचा उल्लेख होता. अर्थात्‌ ती प्रशस्तिपत्रके नकली होती यात आता शंका राहिली नाही. या दोघांना जर या कामाची कांहीच माहिती नसेल तर मला गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार होते. इतका वेळ कांहींच न बोललेल्या सावंत आणि सुर्वे या दुकलीकडे मी प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. सुर्वे पुढे झाला. खरा प्रकार काय आहे ते सांगू लागला.

आखातात नौकरी मिळवून देण्याचा धंदा करणार्‍या एका एजंटामार्फत ही चौकडी आलेली होती. पासपोर्ट, व्हिसा, इत्यादि आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था तर त्याने केलेली होतीच पण शिवाय अनुभवाचे दाखलेही त्यानेच उपलब्ध करून दिलेले होते. अर्थात्‌च ते नकली होते. अजून कामाला सुरुवातही झालेली नव्हती आणि त्यात ही समस्या. पण काहीही करून हे काम वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपणे महत्वाचे होते. कारण निर्धारित कालावधीत हे काम पूर्ण झाले नाही तर पुढे दंड (penalty) सुरु होणार होती आणि तो दिवसागणिक वाढणार होता. मी वरकरणी शांत रहात संपूर्णत: बंद असलेली गवाक्ष वात शीतके काढून घेण्याच्या कामाला सगळ्यांना लावले. सावंत आणि सुर्वे यांना या कामाचा अनुभव होता म्हणून त्यांनी कामाचा पुढाकार घ्यावा आणि कांबळी, महाडिक यांनी त्याना मदत करावी अशी योजना केली आणि झाल्या प्रकारची मुदीरला कल्पना द्यावी म्हणून फोन करण्यासाठी इदीच्या कक्षाकडे वळालो.

इदी आणि आणखी एक कृष्णवर्णीय आरक्षी टेबलावर बुद्धीबळाचा पट मांडून बसले होते. आता इथून फोन करावा तर मुदीरशी इंग्रजीत बोलावे लागणार आणि इदीचे इंग्रजी तसे चांगले असल्याने इदीला माझी समस्या समजणार ही एक नवी समस्या निर्माण झाली. इतक्यात फोनची घंटी वाजली. इदीने समोरच्या पटावरील नजर जराही न ढळवता फोन घेतला आणि कांही न बोलता फोनचा रिसीव्हर माझ्यासमोर धरला. फोन मुदीरचा होता. या योगायोगाचे मनात आश्चर्य करीत मी फोन घेतला. मुदीर कामाची प्रगती विचारीत होता. काय सांगणार होतो मी! जमेल तितक्या सावधानतेने मी बोलत होतो. पण मुदीरला त्यातून कांही वास लागला असावा. तो स्वत:च इकडे येतो म्हणाला.

मुदीर कांही वेळात आलाच. मी झाला प्रकर सांगितला आणि मला दुसरे कामगार द्यावेत अशी विनंती केली. पण ते शक्य नव्हते. कारण नवीन कामगारांसाठी थेट मंत्रालयातून नव्याने परवानगी मिळणे दुरापास्त होते. अखेर याच कामगारांकडून काम करून घ्यावे लागणार होते. मात्र मला एक गोरा मदतनीस देण्याचे कबूल करून मुदीर परत गेला.

मी परत कामाच्या ठिकाणी गेलो तर तिथे आता आणखी नवाच प्रकार घडलेला.  करगृहाचे दोन आरक्षी आणि आमचे कामगार यात पुन्हा एक भांडण लागलेले. जुनी यंत्रे काढण्यापूर्वी नवी यंत्रे दाखवा अणि मगच जुन्या यंत्रांना हात लावा असा कांहीसा वेडगळ हट्‍ट घेउन ते आरक्षी पुन्हा महादूशी भांडत होते. त्यात त्यापैकी एकाने फुरफुरणार्‍या महादूला जरा मागे हटावण्याचा प्रयत्न केला काय अन्‌ महादू जो चवताळून  उठला तो एकदम त्या धिप्पाड, काळ्याकभिन्न नरपुंगवाशी झोंबाझोंबीच खेळू लागला. मी ती कशी बशी सोडविली आणि त्या दोघां आरक्षींना तेथून जाण्याची विनंती केली.
ते जाताच मी महादूला फैलावर घ्यायला सुरुवात केली. मी म्हणालो,

’ हे पहा कांबळी, तुम्ही इथे फक्त काम करण्यासाठी आलेले आहात. तुम्ही अजून नवीन आहात म्हणून तुम्हाला कांही माहिती नाही. एक लक्षांत ठेवा. तुम्ही इथल्या विमानतळावर उतरल्या उतरल्या तुमचा पासपोर्ट कंपनीकडे जमा झालेला आहे. तो तुमचा किमान दोन वर्षाच करार संपेपर्यंत तुम्हाला परत मिळणार नाही. आणि त्याच्याशिवाय तुम्ही परत भारतात जाऊही शकणार नाही. एकतर बर्‍या बोलाने मुकाट जे जमेल ते काम करा नाही तर दोन वर्षे पूर्ण होईतो याच जेलमधे सडत पडा. काय करायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. आजचा सगळा दिवस तुम्ही खराब केला आहे. उद्यापासून हा असला तमाशा मला चालणार नाही."

हे ऐकताच महादू हमसा हमशी रडूंच लागला आणि बडबडू लागला, " कपालच फुटला माजा सायबा. मला परत घरी जांव द्या. हा काम काय मला जमाचा नाय. तो एजंट बोलला का तुला डावरची नौकरी देतो. ऐश करशीन. कसचा डायवर आन्‌ कसची ऐश. तुमी तर आता मला जेलात घालायला निघाले."

" अरे, मी तुला काम कर म्हणालो. काम करशील तर काम शिकशील ना. आणि काही तरी शिकून काम करशील तर कोण तुला जेलात घालील. बघ बाबा. तु मराठी म्हणून मी जमेल तेवढी मदत करीन. बाकी मग तू जाणे अन्‌ तुझं नशीब जाणे." मीही जरा वैतागूनच बोललो.

केशव सुर्वे पुढे झाला. म्हणाला, " जाऊ द्या साहेब. माणूस नवीन नवीन असाच बावचळतो. उद्या पासून नीट काम करील तो. मी काळजी घेईन त्याची."

केशवने महादूलाच काय पण मलाही धीर दिला असेच मला वाटले. आता उद्या पासून एक गोराही आमच्यात सामील होणार होता. आता पर्यंत तरी ही झाकली मूठ सव्वा लाखाची होते असें म्हणावे अशी परिस्थिती होती. उद्यापासून मला तीन निरनिराळ्या रंगाची माकडे संभाळायची होती. तीन काळी. चार लाल मातीतली आणि एक थेम्सच्या कांठावरचा गोरा हुप्प्या.

क्रमश: