आखाती मुशाफिरी (२)

त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला समजला नव्हता. तो नंतर कळाला.
----------------------------------------------------------------------
       त्यानंतर तो माणूस चक्क मला समजेल अशा भाषेत बोलू लागला तेंव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला.
     " मुआफ करना रफिक. पठानको अमरीकी बिल्कूल नापसंद. हरामी हमारा मुलुक बरबाद किया. तुम हिन्दी, या हबीबी ! हमारा दोस्त! इंद्रा (इंदिरा गांधी) हमारा दोस्त! मा फिकर." (काळजी करू नको)
      जिवात जीव आला. पठाण मोडकं तोडकं कां होईना पण मला समजेल असं उर्दू बोलू शकत होता. त्यांचा अमेरिकेवर राग होता हेही लक्षात आलं. तो स्वाभाविक असावा. कारण आंतराष्ट्रीय राजकारण थोडेफार सामान्यपणे मला महिती होते. महासत्ता बनण्याच्या हव्यासापायी अमेरिकेने इराण. इराक, अफगाणीस्तान अशा अनेक मुस्लिमी देशांत हस्तक्षेप केला होता. त्या कारवाईमुळे तेथील जनतेला नाहक भीषण परिस्थीतीला सामोरे जावे लागले होते. कायमची युद्धसदृष परिस्थिती,  अतिरेकी तालिबानींना आधी दिलेले प्रोत्साहन आणि नंतर त्यांचीच झालेली होरपळ हे मी वर्तमानपत्रातून वाचले होते. मी संभाषण वाढवायचं ठरवलं.
       " मेरा नाम हरून. इधरका रब्बानी साब दूसरा कामपे गया. अब हम काम देखेगा. तुम हमारी मदद करेगा." नकळत मी त्याचीच भाषा बोलू लागलो.
       "लाज़ीम,लाज़ीम रफिक" (अवश्य,अवश्य मित्रा) त्याने मला दिलासा दिला आणि नंतर बाकी पठाणांना संबोधून पुश्तु भाषेत कांहीतरी ओरडला. त्या सरशी तो जथ्था कामाच्या दिशेने सरकू लागला. पण तरीही बरेचसे पठाण मंद गतीने सरकत होते. मागे वळून वळून पाहात होते. आपसात कुजबुजत होते. जमीनीत चर खोदणारी चारचाकी ट्रॅक्टरसारखी यंत्रे सुरु झाली होती. भला मोठा केबलचा रीळ एका यंत्रावर ठेवलेला होता कांही पठाण ते यंत्र चालु करत होते. त्यावर स्वार होत होते. जवळच कार्यस्थळावरचे चाकावरचे कार्यालय होते.(मोबाईल पोर्टा कॅबीन) तिथे जाऊन मला रेडिओ फोनने मुख्यालयाला रिपोर्ट करावयाचा होता. मी त्या दिशेने वळणार इतक्यात असलेला प्यून माझाच दिशेने पळर्त आला आणि रेडिओ वाजत असल्याचे ओरडून सांगू लागला. मी धावतच केबीन गाठली आणि काम सुरु झाल्याची खबर देउ लागलो. ’कांही अडचण तर नाही ना?’ या पुन्हा पुन्हा विचारला गेलेल्या प्रश्नाला माझे ’नाही’ हे उत्तर मुदीरचे समाधान झालेसे वाटले नाही. पण मग ’सध्या तरी कांही समस्या नाही’ असे म्हणालो तेंव्हा रेडिओ बंद झाला. प्यूनने एव्हाना थंड पाणी आणि कॉफीचा कप समोर ठेवलेला होता.
       कॉफी संपवून कामाच्या आखणी-आलेखावर(प्रोग्रॅम चार्टवर) नजर टाकू लागलो. तेथील सारी कामे फार सूत्रबद्ध असतात, आलेखाप्रमाणे आमलात आणावीच लागतात. इथे तर काम चार दिवसांनी मागे पडलेले दिसत होते. तो बाजूला सारून मी कामाच्या ठिकाणावर जावे म्हणून केबीनच्या बाहेर पडलो तर मघाचा तो पठाण म्होरक्या समोर हजर आणि तिकडे मंडळी काम सोडून निवांत गप्पा छाटत बसलेली तर कांही शिवाशिवासारखा खेळ खेळण्यात गढलेली. त्या म्होरक्याला मी कांही विचारणार इतक्यात तो तीरासारखा कॅबीन मधे शिरला,  टेबलवरील ती वेताची छडी घेऊन त्या कामचुकार कामगारांवर धावत गेला आणि एकेकावर छडीचे वार करू लागला. मी सर्द होऊन पाहातच राहिलो. कांही पठाणांनी आपसात झोंबाझोंबी सुरु केली. मात्र कांही मिनिटातच, तो म्होरक्या पठाण मेंढपाळाने मेंढरं वळावीत असा आरडाओरडा करीत पळापळ करीत पठाण वळित होता आणि काम सुरु झालेलं होतं. सकाळपासून जे कांही पहिलं होतं,  अनुभवलं होतं त्याने डोकं गरगरायला लागलं होतं.

क्रमश: -