ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
मी देखील धावत तिथे पोहोचलो तर स्टुअर्ट साहेब जमीनदोस्त झाले होते.
------------------------------------------------------------------------
स्टुअर्ट साहेब धडपडले खरे पण थोडक्यात बचावले. खांद्याला आणि डाव्या हाताच्या कोपराला मुका मार बसला एवढेच. पण या अपघाताचा बाकी इतर वाढाचार झाला तो मात्र तापदायक ठरला. इदी आणि त्याच्या अन्य सहकार्यांनी आमचे काम तात्काळ बंद केले. आता सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. असा अपघात होऊ शकतो असे आम्ही (कंपनीने) गृहित धरले होते किंवा नाही? तसे घडण्याची शक्यता गृहित धरली असेल तर खबरदारीचे काय उपाय योजले होते? जी माणसे काम करीत होती त्यांना विमा उतरवला होता की नाही..? एक ना दोन अनेक प्रश्नांना वाचा फुटली. मुदीर नुकताच मुख्यालयात पोहोचला होता त्याला तातडीने पुन्हा परत कारागृहाकडे धांव घ्यावी लागली त्यामुळे तो संतापला. कारागृहाच्या आरक्षींनी तर वेगळीच शंका उपस्थित केली ती म्हणजे हा अपघात होता की घातपात? त्यांनी त्यांच्या पद्धतीने निराळी चौकशी सुरू केली. चौकशीला सगळेच कामगार एका वेगळ्या खोलीत नेले गेले. तिथे काय चालले आहे ते पहावे म्हणून मी तिकडे गेलो तर महादूच्या अंगात संचार झालेला. पोलीसच ते. पोलीस भारतातला काय आणि आखातातला काय. सगळे पोलीस सारखेच. त्यांना दंडुका परजायची फक्त संधी मिळायला हवी. आणि त्यातल्या एका काळुबाचा महादूवर दात होताच. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. पण समजत नव्हती ती शब्दांची भाषा. बाकी दोघांचाही आवेश इतका जबरदस्त की, ’ शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ या मराठी गीताचा अर्थ नव्याने समजावा. मला पाहतांच महादू कडाडला,
" इच्या मारी. हा मेला आमच्यावर डाउट खातो का वामन्यान् त्या गोर्याला पारला. याला सांगा, कोकण्याच्या नादाला लागू नुको. कोकण्यान् धरला ना! तर पार कोंबडा करून टाकीन याचा. "
पण तेवढ्यात इदी स्टुअर्टला घेऊन तिथे आला. स्टुअर्टने, तो त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे पडला, त्यात कोणाचाही दोष नाही अशी जबानी दिली आणि एक काळा कोंबडा पाहण्याची आमची संधी गेली.
स्टुअर्टला दवाखान्यात पाठवण्याची सूचना त्याने स्वत:च फेटाळली आणि काम पूर्ववत् चालू ठेवायला तयार झाला. इतका तो खजील झाला होता. मुदीरनेही इदी आणि इतरांची समजूत काढली आणि काम पुन्हा सुरु होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मी मात्र कामाचे किती तास वाया गेले याचा हिशोब करीत बसलो.
कामाला पुन्हा सुरुवात करण्यापुर्वी सुर्वेने एक सुचवले ते असे की गवाक्ष-शीतक काढण्याचे काम जवळ जवळ संपत आले आहे. तेंव्हा सगळेच डक्ट काढण्याचे काम करतील. मी गोर्याला घेऊन नवीन संयंत्रे बसविण्याच्या कामाची आंखणी करावी कारण नवीन संयंत्रे संध्याकाळपर्यंत येउन ठेपणार होती. मी सुर्वेकडे पहातच राहिलो. हा माणूस मितभाषी होता. फारसा बोलत नसे. पण याची नजर चौफेर होती आणि हा एकटाच माणूस असा होता की ज्याला तेथील कामाचे स्वरूप बर्यापैकी लक्षांत आलेले होते. संयंत्रे कधी येतील हे त्याला माहिती होतेच पण माझ्या नकळत त्याने त्याच्या परीने कामाची योजनाही आंखली होती. मला एकदम हायसे वाटले. त्याच बरोबर मी त्या क्षणी किती थकलेलो आहे आणि मला अशाच आधाराची गरज आहे याची जाणीव झाली. मी पुढे होऊन त्याच्या खांद्यांवर माझी दोन्ही हात ठेवले आणि क्षणभर त्याच्याकडे टक लाऊन पाहिले. त्याच्या योजनेला शब्दांनी संमती देण्याची गरज नव्हती. माग सुर्वेनेच बाकी तिघांचा ताबा घेतला आणि मी स्टुअर्टला घेऊन इदीच्या कक्षाकडे वळालो.
मी, स्टुअर्ट आणि इदी असे तिघे कांही वेळ बोलत बसलो. मध्येच इदी उठला आणि बाजूच्या कपाटाच्या खालच्या कप्प्यातून एक बाटली काढून घेऊन आला. ती बाटली कशाची होती हे एखादे शेंबडे पोरही सांगू शकले असते. मी जरा चक्रावलोच. येथील धर्मसंस्थेच्या नियमांप्रमाणे मद्यपान निषिद्ध होते. अरबांना मद्यपान करण्याची मुभा नव्हतीच. ब्रिटिशांना तसेंच अन्य परदेशियांना कांही सवलतीचे परवाने दिले जात पण ते वैयक्तिक आणि घरगुती वापरासाठी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा तर गंभीर गुन्हा होता. माझ्या उडालेल्या गोंधळाकडे बुद्ध्याच दुर्लक्ष करीत इदी बोलू लागला, जणू तो स्वत:शीच बोलत होता,
" मला वाटतं आता या अशा प्रसंगी याची खरी जरुरी आहे. नाही कां मित्रांनो? बिचार्या स्टुअर्टला तर नक्कीच याची गरज असणार. आणि हो, हरून, तू आता माझ्याकडे असें भुतासारखे बघणे बंद कर. अरे, एरवी इथें आम्ही भुतासारखे जगतो. इथे फारसे कैदीही नाहीत, की ज्याने आम्हाला थोडातरी विरंगुळा मिळावा. तूच सांग कसा वेळ घालवणार मी."
मी कांही म्हणेपर्यंत त्याने कपाटातून तीन ग्लास काढले आणि त्यात त्या बाटलीतले द्रव ओतलेसुद्धा. सुर्वेने माझी मन:स्थिती जरा ठिकाणावर आणली होती तिला इदीने हरताळ फासला. ती दोघे काय करतील ते करूं दे. आपल्याला काय त्याचे. असा विचार करून मी तेथून काढता पाय घ्यावा म्हणून निघालो तो पुन्हा इदी समोर आला. खुणेनेच मी त्यांच्यात सामील व्हावे म्हणून सांगू लागला. पण माझा स्पष्ट शब्दातला नकार ऐकून म्हणाला, ’ ठीक आहे. जशी तुझी मर्जी."
आमचे संभाषण कान देऊन ऐकणारा स्टुअर्ट मात्र ताडकन् तिथुन उठला आणि माझ्या मागोमाग येऊ लागला. मी त्याला म्हणालो,
" तुला काय करायचे असेल ते तू करू शकतोस. नाहीतरी तुला मार लागलेला आहे. तु आराम केलास तरी चालेल. " मी स्टुअर्टला म्हणालो.
पण त्याने माझ्या मागोमाग येण्याचे पसंत केले. त्यालाही इदीची ती कल्पना आवडणे शक्य नव्हतेच. कारण गोरे कसेही असले तरी त्यांच्या मनात वर्णभेद जन्मजात रुजलेला असतो हे एक कारण आणि जनमानसातल्या आपल्या प्रतिमेला ते फार जपतात. तो इतका वेळ कांही न बोलता इदीची गंमत तर पहात होताच पण त्याही पेक्षा तो माझी प्रतिक्रिया पहात होता. तसें त्याने नंतर एकदा बोलण्याच्या ओघात कबूलही केले.
आम्ही दोघे बोलत बोलत कामाच्या ठिकाणी जात होतो इतक्यात इदीचा एक माणूस मागून धावत आला. माझ्यासाठीं मुदीरचा फोन आला होता. आम्ही दोघांनी आमचा मोर्चा पुन्हा इदीच्या केबीनकडे वळवला. नवीन संयंत्रे घेऊन येणारे कंटेनर निघाले आहेत आणि ते थोड्याच वेळात कारागृहावर पोहोचतील असा त्याने निरोप दिला.
या कामाची जी योजना (schedule) तयार केली गेलेली होती त्यानुसार ती संयंत्रे फार लवकर येत होती आणि अर्थात्च ती उतरवून घेण्याची व्यवस्था केली गेलेली नव्हती. बरें मुदीरला ही अडचण सांगता येणार नव्हती. सांगून तो तरी काय करणार होता. मी काळजीत पडलेला पाहून स्टुअर्टने कारण विचारलेच. फोनवर काय बोलणे झाले याची मी त्याला कल्पना दिली. तो कुत्सितपणे हसला. म्हणाला,
" सारा मूर्खपणा आहे हा. आम्हाला (ब्रिटीश) तुम्ही सगळे नांवे ठेवता. पण आमच्याकडून आमची शिस्त तुम्ही कणभरही घेतली नाही. चला. पाहु आता काय होईल तें. "
आम्ही, ज्या ठिकाणी संयंत्रे बसवावयाची होती त्या ठिकाणाकडे वळलो. कंपनीच्या बांधकाम विभागाने संयंत्रासाठी जोते (plinth) बांधून ठेवलेले होते. त्यावर संयंत्र उतरऊन घेता येणार होते. आम्ही पुढील कामाची चर्चा करीत होतो तों ती माल वाहू मोटार येऊन ठेपली देखील. अमेरिकन क्लायमेट कंपनी कडून आलेल्या यंत्राला कसे उतरवून हे एक संकट आता पुढे उभे राहिले होते. कारण ते इतके अवजड होते की त्या साठी क्रेन आणावी लागली असती आणि सगळ्यात मोठे संकट म्हणजे कारागृहाच्या आवारातून मशीन हाऊस पर्यंत क्रेन येऊ शकत नव्हती. मी माझा उद्वेग लपवू शकलो नाही. पण स्टुअर्टने एकदा यंत्राची चारी बाजूने पाहणी केली आणि म्हणाला,
" कांही काळजी करू नकोस. आता नाही तरी संध्याकाळ होत आलेली आहे. या कंटेनर बाळाला आजची रात्र इथेंच झोपू दे. मी उद्या जादू करीन आणि हे यंत्र आपोआप जोत्याववर जाऊन बसेल."
काळी जादू (black magic) असा एक जादूचा प्रकार असतो हे मी ऐकून होतो. आता स्टुअर्ट कोणती ’गोरी जादू’ करतो तें पहायचे होते.
क्रमश: