आखाती मुशाफिरी ( २६ )

तत्त्वज्ञ इदी
-----------------------
वधस्तंभाकडे निघालेल्या चारुदत्तासारखा मी पुन्हा कामाच्या ठिकाणी चालू लागलो.
-----------------------------------------------
                 संयंत्रापासून आत येणार्‍या सहा मुख्य वातवाहिका (main air-ducts) वगळता बाकी वातवाहिका जवळ जवळ बसवून झाल्या होत्या. शाखा-वात वाहिका (branch ducts) अजून लावायला सुरुवात झालेली नव्हती. माझ्या अंदाजाप्रमाणे ते काम आता सुरु व्हायला हेवे होते. पण इथे मुख्यवातवाहिकेपाशी केशव सुर्वे आणि वामन महाडिक कांहीतरी करीत होते. मात्र इतर मंडळी तिथे नव्हती. बॅटीही दिसत नव्हता. मी सुर्वेला  विचारलं,

" हां बोला सुर्वे. काय म्हणत होता मघाशी? माफ करा, मघाशी मी जरा एका  वैतागात होतो. त्यामुळे जरा ओरडलो तुमच्यावर. काय सांगत होता तुम्ही."
" त्याचे काय नाय साहेब. त्या ओपनिंगचा जरा वांधाच झाला आहे. तुम्ही  तर  वैतगणारच ना. बॅटीसाहेब बी थकले डोका खाजवून खाजवून."
" अरे हो! ते कुठे आहेत? आणि बाकी मंडळी?"
" ते सगले गेलेत परीकडे . ब्याटी साहेब बोलले, ते ओपनिंगला जबाब मिलेल तवा   मिलेल. तो परेंत (पर्यंत)
 इन्शुलिन तं  लावून घियाला चालू करू."

सुर्वेचे बोलणे ऐकून मला किंचित हसायला आले. सर्वसाधारणपणे बर्‍याचशा कोकणी माणसांना भरभर बोलायची आणि बोलताना गडबडीने शब्दांची उलटापालट किंवा मोडतोड (spoonerism) करायची संवय असते, तशी ती सुर्वेला होती. सुर्वे कप-बशीला गडबडीने पक्‌-गशी म्हणत असे. शिवाय ळ चा ल होणे तर सर्वसामान्य होते. कधीकधी ळ चा र ही होत असे. इथेही परीकडे म्हणजे कुणा परीकडे नव्हे तर पलिकडे (तिथे खरोखरच परी असती तर बाकी कुणी काय केले असते देव जाणे. पण मी तिची जादूची छ्डी घेऊन ओपनिंग मोठे केले अस्ते हे मात्र नक्की) आणि इन्शुलीन म्हणजे इन्सुलेशन. वातवाहिकेतून जाणार्‍या थंड हवेवर बहेरील हवेचा (सापेक्षतेने गरम हवा) परिणाम होऊ नये म्हणून तिच्यावर उष्णतानिरोधक आवरण चढवावे लागते. त्याला इन्शुलेशन (thermal insulation) म्हणत.
                  म्हणजे बॅटीने उपलब्ध मनुष्यबळाचे दोन गट केले होते. गजानन सावंत आणि महादू कांबळी या दोघांना घेऊन त्याने इन्शुलिन (?) चालू केले होते आणि बहुदा बाकी कामासाठी माझ्या मदतीला त्याने सुर्वे-महाडिक ही जोडी ठेवली. मला बॅटीचे मनोमनी कौतुक वाटले. त्याचे कुठेंच कांही अडत नव्हते. कामाच्या बाबतीत त्याचे तो निर्णय घेत होता. तितका तो सक्षम होता. अर्थात्‌ त्यामुळे त्याचे निर्णय योग्यच असायचे. पण ही जोडगोळी इथे काय करीत होती आणि सुर्वे कांही वेळापूर्वी मला कांही सांगू पाहात होता त्यावेळी मला त्याच्या चेहर्‍यावर चिंता दिसली होती. तो काय प्रकार असावा? की आणखी कांही समस्या?
                 सुर्वेने तो उलगडा केलाच. पुन्हा एक नवी समस्या. शेवटच्या सहा डक्ट‌स्‌ आकाराने बर्‍यापैकी मोठ्या असणारच होत्या तशा त्या होत्या पण त्या तयार करतांना दिलेले उभे जोड सुटले होते. सुर्वेच्या (कामगारांच्या) भाषेत पच्ची सुटाली होती.
हे जोड किंवा पच्ची यंत्राने जुळवलेले (मारलेले) असतात. वाहातुकीत, हलवाहलवीत ते सुटले होते. सुर्वेला हा प्रकार नवीन होता. त्यामुळे तो जरा घाबरला होता. पण मला तो प्रकार नवीन नव्हता. सुर्वेला मी ते जोड पॉप-रिव्हेटने जोडता येतील असे सांगितले. पण ते काम त्याला माहिती नाही असे तो म्हणाला. आणि जर सुर्वेला ते काम माहिती नव्हते तर महाडिकला तर ते माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. कारण तसाही तो हे सारे संभाषण चालू असतांना शांतपणे काडीने कान कोरण्यात मग्न होता. सुर्वेला मी विचारले की हे काम कसे करायचे हे मी दाखवले तर तो ते करील कां? तो अर्थात्‌ तयार होणार होताच. त्यासाठी लागणारे ड्रिलमशीन, रिव्हेट गन इद्यादि साहित्य आमच्या हत्त्यारांच्या संचात होतेच. ते मी त्याला भांडारातून घेऊन यायला सांगितले.
सुर्वे ते घेऊन आला.
                 असे अपघाताने सुटलेले जोड परत तसेच्या तसे बसवणे अवघड असते. त्यामुळे ते रिव्हेटने बसवणे हा एक मात्र सोपा वाटणारा उपाय असला तरी तसा तो किचकटच असतो. जोड पुर्ववत्‌ बसवून थोडा ठोकून घ्यायचा. त्याच्या मधोमध ड्रिलमशीनने एक छिद्र पाडायाचे आणि मग वरून गनने रिव्हेट बसवून पक्का करायचा. डक्टचा भाग साधारणपणे सहा ते आठ फूट लांबीचा असतो, दोन रिव्हेटमधे  कमाल अंतर चार इंच ठेवावे लागते त्यामुळे किमान २४ रिव्हेट बसवावे लागतात. या सार्‍या उपद्व्यापाचा जिकीरीचा भाग म्हणजे छिद्रे डक्टच्या आतून पाडावी लागतात आणि त्यावेळी वरच्या बाजूने दाब लावून ठेवावा लागतो. त्यासाठी बहुदा डक्टच्या आत झोपूनच हे काम करावे लागते.
                 आधी सुर्वेने माझ्या सूचने प्रमाणे डक्टच्या आतल्या बाजूने छिद्र पाडायचा प्रयत्न केला पण ते तसे जमणारे नव्हते. म्हणून मग मी डक्ट्च्या आत शिरलो आणि छिद्र कसे दाखवू लागलो. पण मग मीच छिद्रे पाडावीत आणि सुर्वेने वरून लगोलग पॉपरिव्हेट बसवावा असे ठरवले. त्या प्रमाणे चार सहा छिद्रे झाली असतील नसतील एवढ्यात सुर्वेची चाहूलच बंद झाली. काय झाले आहे म्हणून विचारले तर कुणी उत्तरच देईना. तेवढ्यात माझे पाय धरून कुणी तरी मला बाहेर ओढायला सुरुवात केली. मीही त्याला ओढू दिले. बाहेर येताच पाहतो तो इदी! माझ्या अवताराकडे पाहून खदखदा हसत होता.

" हा काय मूर्खपणाचा प्रकार आहे इदी?" मी तडकलो.
" भल्या माणसा असा डक्टध्ये लपून का बसला आहेस. तो तुझा काका बाहेर येऊन  बसला आहे.
  त्याला भेटायला  चल."
" इदी ही चेष्टेची वेळ नाही. इथे आणखीही एक लोचा झालेला आहे. तो मला निस्तरू  दे.
  कृपा करून मला काम करू दे."
               या कामाच्या नादात मुदीर येणार आहे हे मी  विसरूनच गेलो होतो. इतक्यात मुदीरच आमच्या दिशेने येतांना दिसला. डक्टच्या आत शिरुन काम करीत असल्याने माझा अवतार अगदीच प्रे़क्षणीय झालेला होता. कपडे आणि केस दोन्हीही कमालीचे विस्कटलेले. ते पाहून मुदीरच्या चेहर्‍यावरही मिस्किल हसू उमटले.

" तू कोणाशी मारामारी तर करीत नाहीएस ना?" मुदीरने मिस्किल स्वरात विचारले.
  मी कांही म्हणायच्या आत इदीच म्हणाला,
" तो काय मारामारी करेल. त्यालाच आता मार खायची वेळ आली आहे. निदान त्याला तरी तसंच वाटतंय.
  म्हणून तर तो डक्टमधे लपून बसला होता."

हे ऐकून मुदीरने हसून भिवया उंचावत माझ्याकडे पाहिले.

                       मुदीर आमच्या कंपनीच्या मालका नंतरचा सर्वेसर्वा होता. त्याच्या समोर इतक्या मोकळेपणाने बोलण्याचे साहस इदी करीत होता म्हणजे त्याचा दर्जाही तितकाच उंचीचा होता. पण एरवी तो त्याचे मोठेपणा अजिबात दाखवीत नसे. हे एक विशेषच होते.
                     हे कांहीसे सैलावलेले वातावरणदेखील मला सहन होईनासे झाले. माझी समस्या त्याला सांगून मी कधी मोकळा होतो असे झाले होते. मी विषयाला सुरुवात केली. काय झाले आहे ते सांगितले. पण त्यातील तंत्रिक तपशील ध्यानात  येत नाही असे लक्षात येऊन मुदीरनेच जिथे समस्या आहे तिकडे चलण्याचे सुचवले. आम्ही त्या जागेवर पोहोचलो. मी समस्येचा तपशील संगतवार समजाऊन सांगितला. त्याने तो शांतपणे ऐकून घेतला आणि त्यावर कांहीच न बोलता म्हणाला
" चला आलोच आहे तर बाकी काय काय झालंय ते तरी पाहू. "

                      मग आम्ही तिघे कामाची पाहणी करायला निघालो. कोणीच कांही बोलत नव्हते. मधे बॅटीच्या कामाजवळ आम्ही पोहोचलो तेंव्हा मुदीरने बॅटीचे अभिवादन हसतमुखाने स्वीकारले तेवढाच काय तो मुदीरच्या चेहर्‍यावरचा  बदल सोडला तर बाकी मुदीरचा चेहरा अगदी कोरा होता. अखेरीस जाता जाता मुदीर इतकेच म्हणाला की भिंतीचा हवा तितका भाग आम्ही तोडून काढावा आणि काम पूर्ण करावे. बाकी काय करायचे ते तो पाहून घेईल.

                     मुदीर निघून गेला तरी मी आणि इदी एकमेकाकडे पाहात तसेच कांहीवेळ उभे होतो. अखेर मी प्रश्नार्थक नजरेने इदीला खूण केली तेंव्हा मला मागोमाग येण्याचा इशारा करीत तो त्याच्या केबीनकडे निघाला. कांही कारणाने बॅटीही तिकडेच येत होता. त्यालाही इदीने खुणेने आमच्याकडेच बोलावून घेतले. इदी कॉफी तयार करू लागला आणि मी मुदीरचा विचार करीत बसून राहिलो. मुदीर कां आला होता हे बॅटीला माहिती नव्हते पण तसे त्याने कांही विचारलेही नसते. कारण आगंतुकपणे कांही विचारणे ब्रिटिश शिष्ठाचारात बसत नव्हते. अखेर मीच त्याला मुदीरच्या भेटीचे सांगितले. त्यालाही ते पटले असावे. कारण तशी त्याने समर्थनदर्शक मान हलवली. इदीने दिलेली कॉफी समोर आली तरी आम्ही तिघेही गप्पच होतो. मला मुदीरच्या वागण्याचा अर्थ लागत नव्हता. तो कांहीच न बोलता कां गेला असेल. अखेर इदीनेच शांतता भंग केली.
" तर मग मित्रा आता कसं वाटतं आहे तुला. की तू अजूनही अब्राहमचा विचार करतो  आहेस? "
 
इदी मनकवडाही होताच. मी हो म्हणालो. मग इदी बोलू लागला.

            " माणसाचं मन मोठं विचित्र असतं. ते सारख्याच आतूरतेने चांगल्याची आणि वाईटाचीही वाट पाहू शकतं. चांगल्याचा आणि वाईटाचाही तितक्याच उत्कटतेने विचार करू शकतं. माझंच उदाहरण देतो. मी फ्रान्सला आयफेल टॉवर पहाण्यासाठी गेलो त्यावेळी आयफेल टॉवर विषयी माझ्या मनात प्रचंड कुतुहल होतं. तो अगदी जवळून पहातांना माझ्या मनात प्रचंड हर्ष होता. पण कांही क्षणातच हा आयफेल आत्ताच्या आत्ता कोसळला तर काय होईल असला वरकरणी अभद्र वाटणारा विचार मनात थैमान घालू लागला. जणू मला त्याच्या खाली चेंगरून मरायचंच होतं त्यावेळी.

           आणि आता या ओपनिंगची भानगडीतून असंच कांहींसं घडावं असं तुला वाटतंय. हे प्रकरण जास्तीत जास्त स्फोटक व्हावं, आब्राहम चिडावा, त्याने संतापून तुझ्यावर आगपाखड करावी, जमलंच तर तुला भारतात परत पाठवावं. ते तसं घडत नाहीए म्हणून तू वैतागला आहेस. नाही म्हणू नकोस. तुला तसंच वाटतं आहे.

           मलाही त्या वेळी आयफेल माझ्या डोक्यावर पडायला हवा होता. हे काय आहे? वाईटाचाच विचार करणं किंवा वाट पाहाणंच नाही कां? मग कां होतं असं? मी सांगतो. आपण वरकरणी ज्या मनाचा विचार करतो तो फक्त बाह्य मनाचाच. आपल्याला आणखीही एक मन पाठीमागे कुठे तरी (back of our mind) आहे, त्यातही काहींतरी सतत घडत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या बाह्य मनावर होतच असतो हे कधी आपण ध्यानात घेत नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट ही की बर्‍याचदा आंतर्मनात आपण कशाची तरी, कांही तरी घडाण्याची वाट पाहात असतो. ज्याची वाट आपण पाहात असतो ते व्यावहारिक जगाशी बहुदा सुसंगत नसतं. त्यामुळे  बाह्य मन ते सतत नाकारत असतं.  मात्र त्या वाटण्याला सभोवतालच्या परिस्थितीचं परिमाण असतं; सभोवतालच्या परिस्थितीमुळे झालेला तो एक परिणाम असतो. 

            आयफेल माझ्या डोक्यात पडावा असं मला ज्यावेळी वाटलं त्या वेळी मला मरायचं होतं. नुसतंच मरायचं नव्हतं तर मला माझ्या मरणाचं उदात्तीकरणही झालेलं हवं होतं. इदी जमीलला, जगातल्या एका आश्चर्याखाली चेंगरुन मेलेला इदी जमील हवा होता. इदी जमीलचे त्या अवस्थेतलं छायाचित्र लंडन टाईम्सने छपावं आणि ते सार्‍या जगाने पहावं. निदान कांही हजार लोक तरी म्हणतील, " होता असा एक इदी जमील", असं इदी जमीलला वाटात होतं.

            कारण माझ्या मित्रा इदी जमील जन्माला आल्या पासून दुरावस्थेचे आणि उपेक्षेचे घाव सोशीत आला. आयफेल समोर माझ्यासोबत माझी प्रेयसी-पत्नीही होती. जिच्यावर मी प्राणापलिकडे प्रेम केलं. मात्र तिला दुसरा कोणीतरी आवडला होता आणि घटस्फोटापूर्वीचा आमचा तो शेवटचा सहप्रवास होता.
                माझ्या मित्रा मुदीर कांही न बोलता परत गेला, आणि तो तसाच परत जाणार हेही मला माहिती होतं. मला तसं कुणी सांगीतलं नव्हतं पण तरीही मला ते माहिती होतं. याचं कारण म्हणजे या समस्येत कांही दमच नव्हता. या समस्येच्या परिणामी मुदीर तुला शिक्षा म्हणून परत भारतात पाठवेल ही तुझी भीति नव्हती तर तुलाच तसं व्हायला हवं होतं. कां ते तुझं तू मनाशी नीट विचार करून पहा.

              त्या रात्री मी बराच वेळ इदीचा आणि त्याच्या बोलण्याचाच विचार करीत.  होतो. खरंच कां मी त्या समस्येचा बागूलबुवा उभा केला होता? इदी म्हणाला मला कांही तरी हवं होतं. काय हवं होतं..........?

क्रमश: