ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
काळी जादू (black magic) असा एक जादूचा प्रकार असतो हे मी ऐकून होतो. आता स्टुअर्ट कोणती ’गोरी जादू’ करतो तें पहायचे होते.
क्रमश:
--------------------------------------------------------------------
स्टुअर्ट आज काय शक्कल वापरून संयंत्र करागृहाच्या आवारात आणतो हे पहायची उत्कंठा जशी सगळ्यांना होते तशी ती मलाही होती. पण ’प्रतिकूल तेंच घडेल’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्याचा अनुभव मला अनेकवेळा आलेला होता. मी नेहमी नकारात्मक विचार करणारा, निराशावादी (specimistic) आहे अशी माझ्यावर अनेकदा टीकाही होत आली. त्यामुळे या माझ्या स्वभावाप्रमाणे स्टुअर्टची तथाकथित जादू चाललीच नाही तर काय करायचे हा विचार मनात घोळवीत मी बाकी चौकडीला कामाला लावले आणि कंटेनरजवळ जाऊन उभा राहिलो. कंटेनरचा चालक तिकडे इदी आणि कंपनीशी निवांत गप्पा मारीत बसला होता. जरा वेळाने इदी माझ्या दिशेने येतांना दिसला. स्वारी बसक्या आवाजांत कांही तरी, बहुदा स्वाहिली भाषेत, गात होती आणि हातवारेंही करीत होती. जवळ येतांच त्याने संभाषण सुरू केले,
"हेय् हरून, शुभप्रभात!"
" शुभप्रभात इदी! कसा आहेस तू?"
" मी छान आहे. तू कसा आहेस? पण जरा थांब. खूप छान आहेस असं म्हणू नकोस. तुझासाठी माझ्याकडें दोन बातम्या आहेत. एक चांगली आणि एक वाईट. कोणती आधी सांगू?"
" तू मला कांहीही सांगू शकतोस. ठीक आहे. आधी वाईट सांग."
" तुझा स्टुअर्ट पळाला"
" म्हणजे?" यावर इदी खांदे उडवत हसूं लागला.
" पळाला म्हणजे इंग्लंडला गेला"
" अरे, असा कसा पळू शकतो तो? काल तर तो इथे आपल्या बरोबर होता."
" काय अशक्य आहे या गोर्यांना. यांना जायला-यायला आपल्या सारखा परतीचा परवाना (exit visa) थोडाच लागतो. विमानात बसले की चालले मायदेशाला"
" बरं ते मरो. आता चांगली बातमी सांग."
" चांगली बातमी म्हणजे, तू एक मठ्ठ माणूस आहेस."
" हां, ही चांगली बातमी आहे खरी. पण त्याने काय फरक पडणार आहे?"
" तूं मठ्ठ अशाकरिता आहेस की कंटेनरमधे काय आहे हे तू नीट पाहिले नाहीस, त्या मूर्ख स्टुअर्टने नीट पाहिले नाही आणि सगळ्यात मोठा मूर्ख म्हणजे तो कंटेनरचा चालक, त्याने आणलेले ते यंत्र या कारागृहासठी नाहीच. तें दुसर्याच कोणासाठी आलेले आहे. मी त्याच्या जवळील चलान पाहिले तेंव्हा मला कळले."
आता हंसावे का रडावे हा प्रश्नही इदीने उरूं दिला नव्हता. तो मोठमोठ्याने हसत आणि गात होता. मी खजील झालो. मला त्या यंत्राच्या आकारावरून तरी समजायला हवे होते की एवढे मोठे यंत्र या कामासाठी कसें असेल. माझ्या बाबळटपणाची कमालच झाली होती.
स्टुअर्टने मात्र जादूच केली होती. रंगमंचावरून जादुगार जसा सगळ्यांदेखत गायब होतो तसा तो गायब झाला होता. हे गोरे ब्रिटिश आणि आम्ही भारतीय किंवा अन्य आशियाई लोक यांच्यात किती भेदभाव केला जात होता. यावरून कांही महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. सुभाष यादव नावाच्या एका भारतीय मजूराची आई त्याच्या गांवी अचानक मृत्यू पावली, तर त्याने रडून, भेकून, गयावया करून सुद्धा त्याला स्वदेशी जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती. भारतांत परत जाऊ द्यावे म्हणून तो येथील भारतीय वकिलातीच्याही पायी पडला. पण तेथेंही त्याला वाटाण्याच्या आक्षताच लावल्या गेल्या. ’तूं आता परत गेल्याने तुझी आई परत येणार आहे कां?’ असले निर्दयी प्रश्न विचारले गेले होते. शेवटी नाईलाजाने तो त्याच्या नौकरीच्या कराराची मुदत संपेपर्य़ंत विषण्ण मनाने येथेच राहिला. स्टुअर्ट मात्र दुखण्याचा बहाणा करून मायदेशी आरामात जाऊ शकला होता. ती घटना आज पुन्हा आठवून मी बेचैन झालो.
स्टुअर्ट मला काडीइतकीही मदत न करता परत गेला होता. मी खिन्न मनाने कामाच्या ठिकाणी आलो. सुर्वे खरोखर कामाचा माणूस होता. त्याने बाकी इतर तीन जणांच्या मदतीने खूपच चांगला संघ (team) बांधला होता. जुन्या डक्ट्स काढण्याचे काम त्याने चांगल्या प्रकारे मार्गी लावले होते. ते पाहून मला जर हायसे वाटले. मी झालेल्या कामाची पहाणी करीत होतो आणि पुढील कामाची मनांत आंखणी करीत होतो, इतक्यात महादू डोळे बारीक करून माझ्याकडे पहात आहे असें मला जाणवले. बहुदा त्याला कांही तरी बोलायचे असेल असें वाटून मी त्याला हातानेच ’काय’ म्हणून विचारले. चेहर्यावर एक प्रसन्न हसूं पसरवीत तो म्हणाला. म्हणाला कसला, त्याने विचारलेच,
" साहेब, तो गोरा कोठे गेला? आज आला नाय्!" मला हसूं आले. मी म्हणालो,
’ मला काय माहित. तूंच सांग ना. काय केलेस तू त्याचे?"
महादू चक्रावला. माझा प्रश्न त्याच्या डोक्यावरून गेला हे त्याच्या बावचळलेल्या चेहर्यावरून दिसत होतेच. बाकी तिघेंही आ वसून माझ्याकडे पहात होते. मी हसूं दाबण्याचा प्रयत्न करीत म्हणालो,
" तू त्याचा कोंबडा केलास ना! कुठे आहे तो कोंबडा?" महादू लाजून हसांयला लागला.
" काय सायेब. मजाक करता काय गरीबाची. सांगा ना. कुठे गेला गोरा."
" अरे, कुठे गेला ते मलाही माहिती नाही, आणि गेला तर गेला. तू आहेस ना? तू काय गोर्यापेक्षा कमी आहेस काय? काम नीट कर. "
" पण काय हो सायेब. एक विचारूं कां?" ही नांदी कशाची आहे हे माझ्या लक्षांत यायला वेळ लागला नाही. मी जर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर महादू सारा दिवस माझ्याशी गजाली करीत बसला असता. मी म्हणालो,
" कांबळी, तें गोर्याचा जांव द्या आता. कामाचा बगा आता. नाय तर तो काळा (इदी) माजा कोंबडा करील." आणि महादेवराव कांबळी कामाला लागले.
काम सुरळीत चाललेले पाहून मी इदीच्या कक्षाकडे गेलो. इदी रेडिओ लाऊन कसली तरी अगम्य गाणी ऐकत बसला होता. मला जरा गंमत सुचली. म्हणालो,
" इदी, माझ्या प्रिय मित्रा. तुझा देश फार अगत्यशील आहे असें मी ऐकले होते. पाहुण्यांना कांही कॉफी वगैरे विचारण्याची पद्धत आहे की नाही?"
" कॉफी काय मागतोस मित्रा. मी तर तुला काल त्याहीपेक्षा छान कांही देत होतो तर तूच चेहरा वांकडा केलास."
" मग आजही क्षमाकर मला. तूं पुन्हा तसाच पाहुणचार करणार असशील तर मी चाललो माझा कामाला."
पुढे होत इदीने माझा हात हातात घेतला मला एक हलकेसे आलिंगन दिले आणि कॉफी मशीन कडे वळाला.
क्रमश: