ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
मी खिशातून माझा बटवा काढून त्यांत होत्या नव्हत्या तितक्या नोटा काढून महंमदखानाकडे भिरकावल्या.
___________________________________________________________
वीजवाहिनी टाकण्याचे काम जसे अखेरच्या टप्प्यांत आले तशी पठाणांची कामाची लगलबग वाढूं लागली. काहीं पठाण उरलेले काम संपवण्याच्या मागे लागले तर कांहीनी आवरासावरीला सुरुवात केली. मी या कामावर तसा बराच उशीरा दाखल झालो असलो तरी पठाण या कामाच्या सुरुवातीपासून होते. त्यामुळे आवरासावर कशी करावयाची हें माझ्यापेक्षा त्यांना अधिक चांगले ठाउक होते. खरं म्हणजे या कामावरची माझी नेमणूक अगदी अंशकालीन असावयाला हवी होती. पण माझ्या देखरेखी खाली काम जरा सुरळीत चालली आहे म्हणतांच त्यात बदल झाला नाही आणि मीही असा कांही रमत गेलो की मलाही बदल व्हावासा वाटला नाही.
कामाची मोहीम ज्या गांवासाठी सुरू होती तें जसजसे जवळ येत चालले तसतशी कांही गांवकऱ्यांची तुरळक वर्दळही सुरू झाली. एकतर येथील स्थानिक लोकांना काम नसायचे. फार पूर्वी हे अरब बहुतेक भटके असायचे. कांही फिरस्तीचा व्यापार उदीम करायचे तर कांहीची गुजराण चांचेगिरीवर चालायची. सोळाव्या शतकाच्या आरंभास औद्योगिक क्रांती झाली आणि उद्योगासाठी, दळणवळणाच्या साधनांसाठी इंधनाची गरज निर्माण झाली. ते भूगर्भात तेलाच्या स्वरूपात मिळू शकते हे समजल्यावर तशा भूगर्भीय भूखंडांचा शोध घेतला गेला. सुरुवातीस तसें भूखंड दक्षिण अमेरिकेत सांपडले. पण त्यातून निघणार तेल, ते काढण्यासाठीं झालेल्या खर्चाच्या मानाने परवडण्यासारखें नव्हते. मग तेलाचा शोध सुरू झाला आणि वालुकामय तसेंच आखाती देश हे सोन्याची लंका ठरले. सर्वप्रथम ब्रिटिश, त्यांच्या पाठोपाठ फ्रेंच, त्यानंतर अमेरिकन असा तेलासाठी ओघ सुरूं झाला. त्यांनी तेलाच्या विहिरी जमिनीत खोदल्या तशा त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणांत किनाऱ्यालगतच्या सागरी पट्ट्यात खोदल्या. स्वत: मलई खाल्ली आणि ताकाची फुळकावणी या अशिक्षित मागास स्वकीयाच्या पदरांत पडली. पण ती फुळकावणीही या बुभुक्षितांना इतकी सकस आणि चविष्ट वाटू लागली की यांना उपजीविकेसाठीही श्रम करण्याची गरज उरली नाही. कालांतराने हे देश स्वायत्त झालें तें केवळ राजकीय नकाशावर. भौगोलिक आणि सामाजिक रेषा जराही इकडच्या तिकडे झाल्या नाही. सगळा देशच प्रकल्पग्रस्त आणि सारे स्वकीय समाज शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यावर पोसलेला. देशांवर सत्ता तशी तेथील शेखांची. पण ती नामधारी.
हिन्दुस्थानांत इंग्रजांनी व्यापाराच्या मिषाने प्रवेश केला आणि देशांतील राजसत्ता हळूहळू बळकावण्याचा प्रयत्न केला. पण आखाती देशांत त्यांनाच काय पण अन्यही गोऱ्यांना,प्रत्यक्ष राजसत्ता स्थापन करण्यात फारसे स्वारस्य नव्हते. अरबांना ऐशोआरामांत चैनीत आकंठ बुडवून ठेवले की मग ही मंडळी स्वत:च्या तुंबड्या भरायला मोकळी होती. या गांवातील परिस्थिती यापेक्षा कांही वेगळी नव्हती. गांवात, लाक्षणिक अर्थाने म्हणावेत असें बारा बलुतेदार होते पण ते अरबी नव्हेत. इतर देशातील. तेथील राजवट नस्लखोर (जातिवंत) अरबांना उदर निर्वाहासाठी तर तनखे पुरवीत होतीच इतरही सण समारंभांना भरघोस धन पुरवीत असे. अरबांने शादी केली, द्या दोन लाख डॉलर्स. त्याला मुलगा झाला, द्या पांच लाख डॉलर्स. राजाच्या-शेखच्या नातवाचा विवाह झाला, द्या माणशी हजार डॉलर्स. असली खैरात झाल्यावर काम कोण हरीचा लाल करील! आणि मग असें रिकामटेकडे संधी मिळेल तसें आमच्या कामाबद्धल कुतुहल दाखवीत कांही बाही प्रश्न विचारून भंडाऊन सोडीत. त्यांना तोंड देणे म्हणजे एक कठिण काम असे. त्यातले बहुतेक वात्रट असत मात्र कांही सज्जनही असत.
पठाणांनी दिलेल्या दावतीची खबर जेंव्हा मुख्यालयाला लागली होती त्यावेळी या पठाणाच्या घोळक्यात मुख्यालयाने एखादा हेर किंवा खबरी पेरून ठेवला असावा मला एक संशय आला होता. पण, माझा स्वभाव मुळातच थोडा भित्रा. अर्थात् अशा शंका मला नेहमीच येत आणि सहसा त्याची जाहीर टवाळी होत असें. त्यामुळे अशी शंका आली की लगेच ती अंगावर पडलेल्या पालीसारखी झटकून टाकायची मी स्वत:ला संवय लावून घेतली. पण हातातील काम संपवून त्या पुढील काम दुसऱ्या विभागाला सोंपविण्याची कार्यवाही सुरु असतांना मला अचानक मुख्यालयातून बोलावणे आले. तेंव्हा मात्र मनातली संशयाची सांवली गडद झाली. कारण मुखालायाकडून भेटीच्या कारणाचा स्पष्ट निर्देश मिळालेला होता आणि तो म्हणजे कालचा बुलडोजरचा अपघात. वास्तविक मी माहिती देई पर्यंत घडला प्रकार मुख्यालयापर्यंत पोहोचण्याची सर्वसामान्य शक्यता नव्हती. पण ती पोहोचली होतीच.
काल साय़ंकाळी परममित्र वसंत गडकरी आणि माधव महाबळ सहजच म्हणून माझ्या निवासावर आले होते आणि गप्पांच्या ओघात साईटवर झालेला महंमद खानाचा पराक्रम मी फुशारकीने सांगितला होता. अपेक्षेप्रमाणे वसंतराव भडकले होते आणि माधवरावांनी त्यांचे ’ गोष्टी सांगेन युक्तिच्या चार ’ हे ब्रीद सांभाळीत आमचे कान उपटले होतेच.
" भोट्या, हे फजूलचे झमेले कायले गयात घेतं बे? मरेना जाईना थो बुल्डोजर. थे म्हमद्या का कोन काय, थे तुले काय बी सांगतं, आन् तू बेट्या बैलावाणी गयातली घंटी वाजवीत राह्यतं. तू कोन बे, त्याहिले ऐसी हिकमत कराले देनेवाला?आन् मोठा बाश्शा झाला बे तू. पैशांची खैरात करून राह्यला. पैशे का तुह्या बापाचेहे रे? थे वैह्नीले आन् पोट्ट्यान्ले काय जबाब देशीन बे?" .......अशी वश्याने तासली.
आणि नंतर माधवरावांची मियॉंकी तोडी, " चिरंजीव, याला म्हणतांत अव्यापारेषेषु व्यापार. त्या पठाणांच्या बाबतीत आपण नेमस्त रहावें हें उत्तम. आपला मैत्रभाव, माणुसकी हें ठीक आहे. पण अतिपरिचयात् अवज्ञा होतें." आता या तीन वाक्यांत उच्चारित, अनुच्चारित, अध्याहृत असे सगळ्याप्रकारचे अनुस्वार घालून तें वाक्य पुन्हा मोठ्ठ्याने म्हणून पाहावे म्हणजे माधवरावांचे व्यक्तिमत्व (प्रोफाईल)
तर झाल्या प्रकाराचे पडसाद काय नि कसें उमटतील अशा विचारातच मी मुख्यालयात पोहोचलो. माझ्यावरील अभियान मुदीर साहेबांच्या कक्षांत सुरू झाले. बर्नार्ड साहेबांनी माझ्यावरील आरोप पत्र वाचून दाखवले. त्याला त्यांनी जवळ जवळ एक तास घेतला. त्या साठ मिनिटांच्या भाषणातून मला फक्त साठ सेकंदाचे भाष्य समजले. बर्नार्ड साहेबांचे आरोपपत्र वाचन चालू असतां मुदीरसाहेब त्यांना एकटक निरखीत होते. त्यांच्या चर्येवरून त्यांना हा फार्स फारसा आवडलेला नाही हे दिसत होते. पण ज्या शासनप्रणित कंपनीकडून ही कामाची कंत्राटे मिळाली होती, त्या कंपनीचा मुख्य साहेब एक ब्रिटिश होता आणि या बर्नार्ड साहेबांचा तिथे चांगला प्रभाव होता. त्यामुळेच तर ही कंत्राटे मिळालेली होती. तेंव्हा त्यांचे ऐकून घेणे मलाच काय पण मुदीरलाही भाग होते. ज्या खटल्याचा निकाल, खटला उभा राहण्याच्या आधीच लागलेला होता, तो लागला. उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते.
क्रमशः